शेतात अजूनही कपाशी उभीच; बोंड अळीला आमंत्रण?

शेतात अजूनही कपाशी उभीच; बोंड अळीला आमंत्रण?
शेतात अजूनही कपाशी उभीच; बोंड अळीला आमंत्रण?

औरंगाबाद : कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रचंड प्रादुर्भाव झाला. त्यावर नियंत्रणासाठी उपाययोजनांचा, त्याविषयी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. परंतू तरीही यंदा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यानंतर जालना, औरंगाबाद जिल्ह्यांतील काही भागांतील शेतात कपाशीचं पीक वा पऱ्हाटी तशीच उभी असल्याचे चित्र आहे. 

गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण करण्यासाठी डिसेंबर किंवा फार तर जानेवारी अखेरपर्यंत शेतातील कपाशीचं पीक संपवून टाकणे आवश्‍यक आहे. त्यामुळे दोन पिकात किमान चार महिन्यांचा खंड पडून गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम खंडित होण्यास मदत होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागरणही केले गेले. परंतू तरीही काही भागांतील शेतांमध्ये अजूनही कपाशीचे पीक उभे असल्याचे चित्र आहे. 

काही ठिकाणी तुरळक बोंड फुटलेली तर काही ठिकाणी केवळ पऱ्हाट्या शेतात उभ्या असल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे अशा असलेल्या उभ्या पिकाचा भविष्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्यास मदत होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे कृषी विभाग, कृषी विद्यापीठांच्या विस्तार कार्यातील यंत्रणेने कपाशीचे पीक वा पऱ्हाट्या उभ्या असलेल्या भागात जाऊन जागरूक करण्याची गरज आहे.

पुढील हंगामात गुलाबी बोंड अळी प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजघडीला शेतात उभी असलेली कपाशी तत्काळ काढून टाकावी. तसे न केल्यास गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव पुन्हा होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. - डॉ. किशोर झाडे, प्रभारी कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com