देशातील पहिल्या कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प उभारणीस प्रारंभ

पहिल्या कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प उभारणीस प्रारंभ
पहिल्या कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प उभारणीस प्रारंभ

पुणे : खर्चिक आयात इंधनाला पर्याय देण्यासाठी पावणेदोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून देशात पाच हजार ‘कॉम्प्रेस्ड बायोगॅस’ अर्थात सीबीजी प्रकल्प उभे करण्याचे ध्येय केंद्र शासनाने ठेवले आहे. या उपक्रमाला मार्गदर्शक ठरणाऱ्या देशातील पहिल्या ‘सीबीजी डेमो’ प्रकल्पाच्या कामाला प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या उपस्थितीत नुकतीच सुरुवात झाली. 

जागतिक दर्जाच्या ‘प्राज’ इंडस्ट्रीजकडून पुण्याजवळील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या आवारात उभारल्या जाणाऱ्या या ‘इंटिग्रेटेड सीबीजी डेमो प्लॅन्ट’च्या भूमिपूजनासाठी केंद्र शासनाचे ‘हायड्रोकार्बन’ विषयाचे सल्लागार डॉ. काकोडकर आवर्जून उपस्थित होते. कॉम्प्रेस्ड बायोगॅस हे सध्याच्या सीएनजीला पर्यायी इंधन म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे. 

‘‘देशाच्या जैव ऊर्जा निर्मितीला दुसऱ्या पिढीतील तंत्रज्ञानातून चालना मिळाली आहे. त्यात प्राजचा वाटा मोलाचा आहे. प्राजच्या पथदर्शक प्रकल्पात वापरली जाणारी उच्च दर्जाची अभियांत्रिकी कौशल्ये वाखाणण्याजोगी आहेत. बायो इथेनॉल हे द्रव इंधन आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅस हे वायूइंधन यांची परस्परपूरक निर्मिती करण्याची कल्पना चांगली आहे. त्यात जैविक कचऱ्याचा भरपूर वापर करून घेता येईल. यामुळे हायड्रोकार्बन्सची आयात कमी होईल,’’ असे डॉ. काकोडकर यांनी स्पष्ट केले. 

‘प्राज’चे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी पत्रकारांना या प्रकल्पाची माहिती दिली.  ‘प्राज’ने इथेनॉल निर्मितीसाठी उभारलेला ‘सेकंड जनरेशन इंटिग्रेटेड बायो रिफायनरी डेमो’ प्रकल्पदेखील म्हस्कोबा कारखान्याच्या आवारातच उभारला गेला आहे. श्री. चौधरी म्हणाले, “प्राजकडून घेतल्या गेलेल्या या आघाडीमुळे दोन आनंददायक बाबी घडणार आहेत. सीबीजीसाठी लागणारा कच्चा माल हा शेतातील काडीकचरा असल्यामुळे शेतकऱ्यांना सध्या फेकावा किंवा जाळाव्या लागणाऱ्या कच-याला किंमत मिळणार आहे. सीबीजी किंवा बायोएनर्जीवर जगात एकाच वेळी अशा प्रकारचे संशोधन करणारी प्राज ही आघाडीची कंपनी आहे. त्यामुळे जगाचे लक्ष सध्या महाराष्ट्राकडे असून, विविध देशांचे शास्त्रज्ञ, प्रतिनिधी या प्रकल्पाला भेटी देत आहेत. भविष्यात या क्षेत्राचे जागतिक नेतृत्व करण्याची संधी भारताला मिळणार आहे.’’

प्राजच्या सीबीजी प्रकल्पात बायोमास, शेतातील काडीकचरा, कागद गिरणीची कचरा यांपासून सीबीजी कसा तयार करता येईल, याविषयी चाचण्या घेतल्या जाणार आहेत. या वेळी प्राजचे व्यवस्थापकीय संचालक शिशिर जोशीपुरा, मुख्य वित्त अधिकारी सचिन रावळे, विपणन उपाध्यक्ष डॉ. रवींद्र उटगीकर, बायोएनर्जीचे अध्यक्ष अतुल मुळे, संशोधन तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष घनशाम देशपांडे, आधुनिक जैवइंधन विभागाचे अध्यक्ष वासुदेव जोशी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com