कापूस खरेदीची कोंडी फोडा; जावंधियांचे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना पत्र

खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीबाबत कोणताही निर्णय सरकार पातळीवर होताना दिसत नाही.
vijay jawandhiya
vijay jawandhiya

नागपूर : खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीबाबत कोणताही निर्णय सरकार पातळीवर होताना दिसत नाही. त्यामुळे कापूस खरेदीची कोंडी फोडत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी शेती प्रश्‍नाचे अभ्यासक व शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी या विषयावर पत्र लिहिले आहे.  जावंधिया यांच्या पत्रानुसार, ‘पावसाळा सुरू व्हायला जेमतेम एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. अशावेळी खरिपाच्या पेरणीकरिता शेतकऱ्यांना पैशाची गरज लागणार आहे. परंतु कापूस घरातच पडून असल्याने पैशाची सोय करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. त्यातच उन्हाची तीव्रता वाढीस लागल्याने घरातील कापसाची जोखीमही वाढते. त्यामुळे सीसीआय, नाफेडच्या माध्यमातून कापसाची खरेदी व्हावी. २००८ साली कापूस उत्पादकांसाठी ऐनवेळी खरेदीचा निर्णय घेण्यात आला होता. याबाबत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना माहिती आहे. त्याचप्रमाणे यावर्षी सोमवार (ता.२०) पासून कापूस खरेदीचा निर्णय व्हावा. त्याकरिता प्रसंगी जीनिंग प्रेसींग कारखाने अधिग्रहीत करण्याबाबतचा निर्णयही सरकारने आपल्या पातळीवर घ्यावा.’ नगर जिल्ह्यात कापसाची शेकडो वाहने अडकून पडल्याचे वृत्त आहे. परिस्थितीमुळे शेतकरी आंदोलनही करण्यास समक्ष नाही. त्यामुळे कापूस खरेदीची कोंडी लवकर फोडावी, अशी मागणी जावंधिया यांची आहे. हमीभावाने करा खरेदी कोरोनामुळे जागतिक मंदी आली आहे. परिणामी न्युयॉर्क कापूस बाजारात रुईचे भाव घसरले आहेत. ७५ ते ८० सेंट प्रती पाउंड असलेले रुईचे दर आज ६० ते ६२ सेंटपर्यंत खाली आले. असाच परिणाम सरकी आणि सरकी ढेपेच्या भावावरही झाला आहे. कापसाप्रमाणेच तूर हरभरा, सोयाबीन, गहू या शेतमालाच्या विक्रीचा आणि दराचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. या जिनसाची देखील हमीभावाने खरेदी करावी अशी मागणी विजय जावंधिया यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com