महाराष्ट्राने सिंचनासाठी अर्थसंकल्पात तरतूद वाढवावी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

आंतरराष्ट्रीय सुक्ष्म सिंचन परिषदेचे उदघाटन
आंतरराष्ट्रीय सुक्ष्म सिंचन परिषदेचे उदघाटन

औरंगाबाद  : सिंचन क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या राज्यांना मदतीचे धोरण केंद्र सरकारने स्विकारले आहे. महाराष्ट्र व मध्य प्रदेशने कार्यक्षम पद्धतीने सिंचनासाठी पुढाकार घेतला आहे. कर्नाटक सरकारप्रमाणे महाराष्ट्राने अर्थसंकल्पात सिंचनासाठी तरतूद वाढवावी, असा विनंतीवजा सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाज आणि जलसंसाधन, नदीविकास गंगा पुनरुज्जीवनमंत्री नितीन गडकरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. 

औरंगाबाद येथील हॉटेल अजेंता ॲम्बेसिडर येथे बुधवारपासून (ता.१६) सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेच्या उद्‌घाटन समारंभात केंद्रीय मंत्री गडकरी बोलत होते.

या वेळी श्री. गडकरी म्हणाले, की महाराष्ट्र व मध्य प्रदेश सरकारने पाइपलाइनद्वारे शेतीला पाणीपुरवठ्यासाठी जो पुढाकार घेतला आहे त्याचा पाणी वाचविण्यासाठी फायदा होईल. सिंचनाचे क्षेत्र वाढावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. १५ ते २० वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्रातील १०८ प्रकल्पांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. टेंभू, म्हैसाळसारख्या प्रकल्पांमुळे अवर्षणग्रस्त व शेतकरी आत्महत्या होत असलेल्या भागांना फायदा होईल. कायम अवर्षणाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यासह देशभरातील विविध भागांसाठी केंद्राने ३० नदीजोड प्रकल्पांचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी पिंजार दमणगंगा व तापी नार पार हे दोन प्रकल्प महाराष्ट्रातील आहेत. यातील एका प्रकल्पामुळे मराठवाड्यातील सततच्या दुष्काळाने कायम पाण्याची तूट सहन करणाऱ्या जायकवाडी प्रकल्पातील पाणीसाठा ८० टक्‍क्‍यांपर्यंत नेण्यास मदत होईल. गावातील पाणी गावात, शेतातील पाणी शेतात जिरवण्यासाठी जलसंधारणाची कामे शासनाने हाती घेतली आहेत. पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी २०० ब्रीज कम बंधारे बांधले जाणार आहेत. त्यापैकी तीन लातूर जिल्ह्यात असतील, असे त्यांनी सांगितले. 

पीक उत्पादकता सातत्याने वाढत असल्याने प्रक्रियेला महत्त्व देण्याची गरज आहे. इथेनॉल निर्मिर्ती त्यापैकीच एक. तंत्रज्ञानात सातत्याने सुधारणा त्याचा परिणामकारक वापर होण्यासाठी आवश्‍यक आहे. अनुदान वेळेत मिळाल्यास सूक्ष्म सिंचन प्रणालीचा वापर वाढेल. वापर वाढला तर सूक्ष्म सिंचन प्रणालीचे दर कमी होण्यास मदत होईल. कृषिसाठी स्वंतत्र फीडरवरून वीजपुरवठा देण्याची तयारी, सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपांसाठी अर्थसहाय्य सिंचनासाठी विजेचा प्रश्न सोडवतील. इतर देशांतील वॉटर सोल्युबल खतांचा विचार करता ऑर्गेनिक सोल्यूबल खतांच्या वापरावर भर द्यावा लागेल. त्यामुळे उत्पादित मालाला निर्यातीची संधी उपलब्ध होईल. केवळ पाण्याचा कार्यक्षम वापर करून चालणार नाही, तर पीकपध्दतीतही आमुलाग्र बदल करण्याची गरज आहे. तीन दिवस चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेतून देशातील कृषीचे भवितव्य बदलविण्यासाठी नेमक काय करायला हवे, धोरणात नेमकी काय सुधारणा हवी याविषयी चिंतन करून सूचना अपेक्षित असल्याचे श्री. गडकरी यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेचे थाटात उद्‌घाटन औरंगाबाद ः येथे आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेचे बुधवारी (ता.१६) थाटात उद्‌घाटन झाले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाज आणि जलसंसाधन, नदीविकास गंगा पुनरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी, विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित असलेले फिजी सरकारचे कृषी, ग्रामीण समुद्री विकास, जलमार्ग आणि पर्यावरण मंत्री डॉ. महेंद्र रेड्‌डी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परिषदेचा उद्‌घाटन सोहळा पार पडला.

या वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय जलसंसाधन राज्यमंत्री अर्जून राम मेघवाल, मंत्री सत्येंद्र जैन, कर्नाटकचे मंत्री डी. के. शिवकुमार, एन. एच. शिवशंकर रेड्डी, सीडब्ल्यूसीचे अध्यक्ष एस. मसुद हुसेन, आयसीआयडीचे अध्यक्ष अभियंता फेलिक्‍स रिंडर्स, केंद्रीय जलसंसाधन सचिव यू. पी. सिंह उपस्थित होते. या वेळी यू. पी. सिंह यांनी परिषदेच्या आयोजनामागील भूमिका विषद केली.

आयसीआयडीचे अध्यक्ष फेलीक्‍स रिंडर्स म्हणाले, की परिषदेच्या निमीत्ताने विविध देशात सूक्ष्म सिंचन क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिनिधींमध्ये संवाद होईल. कमी पाण्यात जास्त उत्पादन घेण्याचे आव्हान पेलण्यासाठी व सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र वाढण्यासाठी या परिषदेची मोठी मदत होईल. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत सातशेंवर प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. यामध्ये भारत वगळता ५० देशातील शंभरावर प्रतिनिधी सूक्ष्म सिंचनाच्या अनुषंगाने सादरीकरण करणार आहेत. विविध विद्यापिठांचेही शंभरावर प्रतिनिधी तसेच जवळपास दहा ते बारा राज्यांतील शंभरावर शेतकरीही या परिषदेत सहभागी झाले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com