खानदेशात पेरण्यांच्या कामात शेतकरी व्यस्त

खानदेशात पेरण्यांची कामे सुरूच
खानदेशात पेरण्यांची कामे सुरूच

जळगाव ः खानदेशात पेरण्यांची कामे जळगावमधील चोपडा, भडगाव आणि धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा भागात सुरू आहेत. चोपडा तालुक्‍यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने या भागात पेरणी आणखी सात-आठ दिवस सुरू राहणार आहे. कापसाची लागवड मात्र सर्वत्र आटोपली असून, क्षेत्र अंदाजित चार लाख ९० हजार हेक्‍टरपर्यंत पोचले आहे.  दुबार पेरणीची वेळ धुळ्यातील लामकानी, शिरूड भागात आली होती. तसेच जळगावमधील पारोळा, अमळनेरातही मागील आठवड्याच्या सुरवातीला पाऊस कमी असल्याने पेरणी वाया जाण्याची भीती होती; परंतु मागील गुरुवारपासून (ता. ४) खानदेशात सर्वत्र पाऊस आला. यानंतर पेरणीनेही गती घेतली. धुळे जिल्ह्यात सुमारे चार लाख हेक्‍टरवर, नंदुरबारात सुमारे पावणेतीन लाख हेक्‍टरवर, तर जळगाव जिल्ह्यात आठ लाख १० हजार हेक्‍टरवर पेरण्या होतील, असा अंदाज आहे. यात धुळ्यात ९० टक्के, नंदुरबारात ८० टक्के, तर जळगाव जिल्ह्यातही ८० टक्‍क्‍यांवर पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. सर्वाधिक लागवड कापसाची असून, धुळ्यात सुमारे दोन लाख, नंदुरबारात एक लाख ११ हजार आणि जळगाव जिल्ह्यात चार लाख ९० हजार हेक्‍टरवर कापसाची लागवड झाली. यापाठोपाठ खानदेशात तृणधान्य, कडधान्याची पेरणी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.  बोदवड, पाचोरा, जामनेर, शिरपूर भागांत काही दिवस अतिपाऊस झाला. यात शेतातील माती व बियाणे वाहून गेल्याचे प्रकारही झाले. अशा क्षेत्रात नांग्या भरणे, पुन्हा पेरणीची कामे सुरू आहेत. ही कामे या आठवड्यात पूर्ण होतील.  खानदेशात जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या १९ टक्के, धुळ्यात १७ टक्के तर नंदुरबारात २१ टक्के पाऊस झाला आहे. नवापूर, अक्कलकुवा, धडगाव, धुळ्यातील शिरपूर, साक्री, जळगावमधील बोदवड, मुक्ताईनगर, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव या भागांत पावसाचा जोर बऱ्यापैकी राहिल्याचे सांगण्यात आले.

आमच्या भागात पेरणी जवळपास पूर्ण झाली असून, कापसाची लागवड अधिक आहे. काही शेतकरी पूर्वहंगामी कापूस पीक व इतर पिकांमध्ये नांग्या भरण्याचे काम करीत आहेत. - रोहित पटेल, शेतकरी, वडछील (ता. शहादा, जि. नंदुरबार)   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com