पुणे विभागात गहू काढणीस प्रारंभ

पुणे विभागात गहू काढणीस सुरवात
पुणे विभागात गहू काढणीस सुरवात

पुणे ः उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्याने रब्बी हंगामातील गहू काढणीला येत आहे. गेल्या आठवड्यापासून पुणे विभागातील अनेक ठिकाणी गव्हाची काढणी सुरू झाली. पुढील आठवड्यापासून या काढणीला चांगलाच वेग येणार असून, पुढील महिनाअखेर ही काढणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. पाणीटंचाईमुळे काही भागात उत्पादनात जवळपास ४० ते ५० टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता आहे. 

परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जमिनीत पुरेशी ओल राहिली नाही. त्यामुळे अनेक शेतकरी गव्हाची पेरणी करावी की नाही, या चिंतेत होते. तरीही पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन गव्हाची पेरणी केली. पुणे विभागात गव्हाचे सरासरी एक लाख ५४ हजार ८४२ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ७५ हजार ६६४ हेक्टर म्हणजेच ४९ टक्के पेरणी झाली होती. यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात देशीवाणासह, संकरित यासारख्या वाणाची पेरणी केली होती. 

यंदा गहू उत्पादक शेतकऱ्यांनी आर्थिक परिस्थिती नसताना पीककर्ज घेऊन रब्बीची तयारी केली होती, परंतु परतीचा पुरेसा पाऊस न झाल्याने मोठा परिणाम झाल्याने अनेक शेतकऱ्यांना पेरणी करता आली नाही. परिणामी विभागात जवळपास ७९ हजार १७८ हेक्टर क्षेत्र पेरणीपासून दूर राहिले आहे.  

रब्बी हंगामात पाण्याची सुविधा असलेल्या काही शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली, परंतु पुरेसा पाऊस न झाल्यामुळे विहिरी कोरड्या पडू लागल्याने पिकांना पाणी देण्यास अडचणी तयार झाल्या. पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम झाला असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. याशिवाय पाणीटंचाईमुळे कोरडवाहू भागात पुरेशा प्रमाणात गव्हाच्या पेरण्या होऊ शकल्या नाहीत. त्याचा परिणामही उत्पादनावर होणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. सध्या गव्हाची काढणी सुरू झाली असली तरी त्याला मजूरटंचाईचा मोठा फटका बसत आहे. त्यावर पर्याय म्हणून बहुतांशी शेतकरी यांत्रिकीकरणाद्वारे थेट काढणी करण्यास प्राधान्य देऊ लागला आहे. विभागातील अनेक भागांत गहू काढणी यंत्राला (हार्वेस्टर) अवलंब करत असून, त्यासाठी शेतकऱ्यांना एकरी दीड ते दोन हजार रुपये मोजावे लागत आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com