कृषी पथदर्शक राज्य साकारण्याची संधी : राज्यपाल

भडसावळे, बोरसे यांच्यासह ११२ जणांना कृषी पुरस्कार प्रदान
भडसावळे, बोरसे यांच्यासह ११२ जणांना कृषी पुरस्कार प्रदान

पुणे : “शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक शेती तंत्र पोचवून देशाच्या कृषी नकाशावर एक पथदर्शक राज्य साकारण्याची संधी आणि क्षमता महाराष्ट्राकडे आहे. त्यासाठी शेतीला शाश्वत विकासाकडे घेऊन जात शेतमाल निर्यात, फलोत्पादन, विस्तार आणि आधुनिक शेती क्षेत्रात भक्कम काम करावे लागेल,” असे प्रतिपादन राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केले.  राज्यपालांनी सन्मानाचा डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार चंद्रशेखर भडसावळे व शिवनाथ बोरसे यांना दिला.   बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये कृषी व फलोत्पादन क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शेतकरी व उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या राज्य कृषी विभागाच्या पुरस्कारांचे वितरण गुरुवारी (ता. १४) दिमाखदार सोहळ्यात झाले. त्या प्रसंगी राज्यपाल श्री. राव बोलत होते. व्यासपीठावर कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे,  मदत व पुनर्वसनमंत्री दिलीप कांबळे, कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुहास दिवसे, महसूल आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर होते.  या वेळी ११२ शेतकऱ्यांसह संलग्न क्षेत्रातील व्यक्तींना गौरविण्यात आले. २०१५ मधील ५५ आणि २०१६ मधील ५७ पुरस्कार्थी शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. पुरस्कार्थींमध्ये अग्रोवनचे प्रतिनिधी गणेश कोरे, संदीप नवले व सूर्यकांत नेटके यांचाही समावेश होता. राज्यपाल श्री. राव म्हणाले, “शेतकऱ्यांमुळेच या देशाला अन्नधान्य मिळते. दूध, फलोत्पादन आणि अन्नधान्यात देशाला स्वयंपूर्ण करण्याचे महान कार्य शेतकरी करीत आहेत. इसवी सन १७५० पर्यंत जगात सर्वात भरभराटीला आलेली आपली संस्कृती ब्रिटिशांच्या वसाहतवादी साम्राज्याने नष्ट केली. त्या वेळी हा देश आणि शेतकरी समृद्ध होता. मात्र, आतादेखील कौशल्य विकास आणि आधुनिक तंत्राच्या आधारे समृद्ध भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन आपण करू शकतो,” रोहयो संकल्पना शेतीत आणू ः पाटील कृषिमंत्री पाटील म्हणाले, “आम्हाला शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे आहेच, पण त्याच बरोबरीने खते, बियाणे, कीटकनाशकांवरील खर्चदेखील कमी करायचा आहे. त्यासाठी रोजगार हमी योजनेतील संकल्पना शेतीसाठी वापरल्यास शेतकऱ्यांना खर्चात दिलासा मिळेल. या संकल्पनेवर आमचे काम सुरू आहे. शेतीचा विकास हा मातीच्या आरोग्याशी निगडित असल्याचे आम्ही मानतो. त्यामुळेच भविष्यात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दोन मिनिटात संगणकीय माती परीक्षण अहवाल देण्याचा मानस आहे,” असे ते म्हणाले. काबूल-मुंबई कार्गो सेवा १५ दिवसांत सुरू केली “कृषी विकासाचा हेतू ठेवून आमच्या चर्चा सतत होत असतात. अफगाणिस्तानच्या उपाध्यक्षांबरोबर मी चर्चा करीत असताना काबूल-मुंबई कार्गो सेवा उपलब्ध नसल्याचे लक्षात आले. मी लगेच देशाच्या विमान वाहतूक मंत्र्यांशी बोललो. त्यामुळे १५ दिवसात कार्गो सेवा सुरू झाली. परिणामी काबूलमधून विमानाने सफरचंद येत आहेत. त्याबदल्यात द्राक्ष, टोमॅटो व इतर शेतमालाची निर्यात सुरू झाली आहे. याच पद्धतीने निर्यातीचे अजून काही ठिकाणे शोधता येतील. त्यामुळे शेतकऱ्यांना नव्या बाजारपेठा उपलब्ध होतील,” असे राज्यपालांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com