राज्य कृषी पुरस्कार वितरणाची जय्यत तयारी

राज्य कृषी पुरस्कार वितरणाची जय्यत तयारी
राज्य कृषी पुरस्कार वितरणाची जय्यत तयारी

पुणे  : कृषी खात्याचे राज्यस्तरीय शेतकरी पुरस्कार वितरण सोहळ्याची कृषी आयुक्तालयात जय्यत तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे प्रत्येक पुरस्कारार्थी शेतकऱ्यासाठी एक संपर्काधिकारी नियुक्त करण्यात आला आहे.  गेल्या काही महिन्यांपासून सतत लांबणीवर पडलेले कृषी खात्याचे पुरस्कार वाटण्यासाठी अखेर मुहूर्त सापडला आहे. १४ फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलमधील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. कृषी व फलोत्पादन क्षेत्रात राज्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार दिले जातात. कृषी खात्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनादेखील पुरस्काराने गौरविले जाते.  कृषी खात्याच्या या पुरस्कारांबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता असते. मात्र, २०१५ आणि २०१६ चे पुरस्कार वाटले गेले नव्हते. कृषी सचिव एकनाथ डवले यांनीच पुढाकार घेत पुरस्काराच्या संकल्पनेला पुढे नेण्यासाठी हालचाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सोहळ्यासाठी राज्यपाल सी विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. नवे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी पदभार घेताच सर्वांत आधी या सोहळ्याच्या पूर्वतयारीची माहिती घेतली.  आयुक्तांनी बालेवाडीत जाऊन अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. कृषिमंत्री चंद्रकांतदादा पाटील व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे दोघेही या सोहळ्याचे निमंत्रक आहेत. याशिवाय अन्न व नागरी पुरवठा आणि संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे आणि मदत व पुनर्वसनमंत्री दिलीप कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.  २०१५ मधील ५५ आणि २०१६ मधील ५७ पुरस्कारार्थी शेतकरी या सोहळ्यासाठी उपस्थित असतील. त्यासाठी कृषी विभागाने प्रत्येक पुरस्कारार्थीला थेट गावापासून बालेवाडीपर्यंत आणि तेथून पुन्हा गावापर्यंत एक संपर्काधिकारी दिला आहे. पुरस्कारार्थी शेतकरी १३ फेब्रुवारीला दुपारी पुण्यात दाखल होणार आहेत. कृषिमंत्री, कृषिसचिव तसेच कृषी आयुक्तांसोबत शेतकरी स्नेहभोजन घेणार आहेत. राज्यपालांच्या हस्ते मानचिन्ह, शाल, श्रीफळ तसेच साडीचोळी, कुंकवाचा करंडा देत शेतकऱ्याचा सपत्नीक सत्कार केला जाणार आहे. तसेच, विविध पुरस्कारानुसार २५ ते ७५ हजारांपर्यंत रक्कम शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com