राज्यात वांगी प्रतिक्विंटल १५०० ते ६००० रुपये

राज्यात वांगी प्रतिक्विंटल १५०० ते ६००० रुपये
राज्यात वांगी प्रतिक्विंटल १५०० ते ६००० रुपये

अकोल्यात प्रतिक्विंटल २००० ते ३५०० रुपये  अकोला ः स्थानिक बाजारात सध्या वांग्याला चांगले दर मिळत आहेत. आवक कमी व मागणी असल्याने दर वाढले आहेत. सध्या वांग्याची २००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटलदरम्यान विक्री होत आहेत. किरकोळ बाजारात वांगी ४० ते ६० रुपये प्रतिकिलोने विकली जात आहेत. येथील जनता भाजी बाजारात अकोला जिल्ह्यातून वांग्यांची आवक होत असते. सध्या एक ते दीड टनापेक्षा अधिक आवक होत आहे. दुय्यम दर्जाची वांगी २००० ते २५०० रुपयांदरम्यान विक्री होत आहेत. तर उत्तम दर्जाची वांगी २५०० ते ३५०० रुपयांदरम्यान विक्री होत असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. या भागात पाऊस नसल्याने भाजीपाला आवक कमी झाली आहे. त्यात वांगीसुद्धा आहेत. त्यामुळे दरात तेजी सुरू आहे. हे दर आगामी काही दिवस टिकून राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

परभणीत प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपये परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. २०) वांग्यांची २५ क्विंटल आवक होती. वांग्याला प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातील सिंगणापूर, बोरवंड, कोक आदी गावांतून वांग्याची आवक होत आहे. गत महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी वांग्याची २० तो ३० क्विंटल आवक होती. त्या वेळी प्रतिक्विंटल सरासरी २५०० ते ५००० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २०) वांग्यांची २५ क्विंटल आवक असताना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपये होते. तर किरकोळ विक्री प्रतिकिलो दराने ६० ते ८० रुपये दराने सुरू होत आहे, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

रत्नागिरीत प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये रत्नागिरी ः येथील बाजार समितीमध्ये वांग्याची आवक ५८ क्विंटल इतकी झाली आहे. क्विंटलला १५०० ते २००० रुपये एवढा दर मिळाला आहे. कराड, मुंबई, सातारा, सांगली येथून रत्नागिरीत वांग्याची आवक होते.पावसाळा सुरू झाला असला, तरीही अद्याप वांग्याची आवक बऱ्यापैकी असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. मंगळवारी (ता. १८) वांग्यांची आवक ३४ क्विंटल झाली. त्यास १५०० ते २५०० रुपये दर मिळाला असून, सर्वसाधारण दर २००० रुपये मिळाला. सोमवारी (ता. १७) ४७ क्विंटल आवक झाली असून, दर २५०० ते ३००० रुपये मिळाला. १५ व १६ जूनला वांग्यांची आवक झाली नव्हती. १३ जूनला २४ क्विंटलची आवक झाली. तर दर ५०० ते १५०० रुपयांपर्यंत मिळाला होता. सर्वसाधारण दर १००० रुपये होता.

सांगलीत प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये सांगली : येथील शिवाजी मंडईत वांग्याची आवक कमी झाली आहे. गुरुवारी (ता. २०) वांग्याची ८० ते ९० क्रेट (एक क्रेट २० किलोचे) आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोस ३०० ते ४०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंडईत वांग्याची आवक पलूस, मिरज, तुंग, दुधगाव, कवठेपिरान, आष्टा या भागांतून होते. ढगाळ वातावरण असल्याने वांग्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने वांग्याची आवक कमी झाली असल्याने व्यापारीवर्गाने सांगितले. बुधवारी (ता. १९) वांग्याची आवक ९० ते १०० क्रेट आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोस ३०० ते ४०० असा दर होता. मंगळवारी (ता. १८) वांग्याची आवक ७० ते ८० क्रेट झाली असून, त्यास प्रति दहा किलोस २५०ते ३५० असा दर मिळाला. सोमवारी (ता. १७) वांग्याची आवक ९० ते १०० क्रेट आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोस ३०० ते ४०० असा दर होता. रविवारी (ता. १६) वांग्याची आवक ७० ते ८० क्रेट आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोस २५० ते ३५० असा दर होता. पुढील सप्ताहात वांग्याची आवक कमी होण्याची शक्यता असून, दरात वाढ होईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

पुण्यात प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २०) विविध वाणांच्या वांग्याची सुमारे ४ टेंपो आवक झाली होती. या वेळी दहा किलोला २०० ते २५० रुपये दर होता. सध्या आवक आणि मागणी कमी असल्याने दर स्थिर असल्याचे अडत्यांनी सांगितले. वांग्याची आवक प्रामुख्याने पुणे विभागातील विविध जिल्ह्यांमधून होत आहे. तर पुण्यालगतच्या खडकवासाला परिसरातूनदेखील वांग्याची आवक होत आहे.

सोलापुरात प्रतिक्विंटल ३००० रुपये सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांग्याची आवक कमीच राहिली. पण, मागणी असल्याने दरातील तेजी टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. वांग्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ३००० रुपये इतका दर मिळाला. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांग्याची रोज ५० ते ६० क्विंटल आवक झाली.  वांग्याची सर्व आवक स्थानिक भागातूनच होती. वांग्याला प्रतिक्विंटलला किमान ५०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही वांग्याची आवक अगदीच जेमतेम ४० ते ५० क्विंटल इतकी आवक होती. तर दर प्रतिक्विंटलला किमान ६०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक २८०० रुपये इतका दर होता. जूनच्या पहिल्या पंधरवड्यातही वांग्याची आवक ७० ते १०० क्विंटलपर्यंत वाढली होती. पण दर टिकून होते. वांग्याला प्रतिक्विंटलला किमान ५५० रुपये, सरासरी १७०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये असा दर मिळाला.

नाशिकमध्ये प्रतिक्विंटल ३७०० ते ६००० रुपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १९) वांग्याची आवक १६४ क्विंटल झाली होती. त्यास प्रतिक्विंटल ३७०० ते ६००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४३५० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंगळवारी (ता. १८) वांग्याची आवक १६० क्विंटल झाली. तिला ३५०० ते ६५०० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ४००० रुपये होता. सोमवारी (दि. १७) वांग्याची आवक १६७ क्विंटल झाली. तिला ३००० ते ६५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ४००० मिळाला. शनिवारी (ता. १५) वांग्याची आवक १६७ क्विंटल झाली. तिला २००० ते ४७५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३६०० होते. शुक्रवारी (ता. १४) वांग्याची आवक १८५ क्विंटल झाली. तिला २६०० ते ४५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २८५० होते. गुरुवारी (ता. १३) वांग्याची आवक १८६ क्विंटल झाली. तिला २५०० ते ४२५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २८५० होते. मागील आठवड्यापासून बाजार समितीत वांग्याची आवक सर्वसाधारण होती. गेल्या चार दिवसांत आवक कमी झाली असून, त्यानुसार दर सर्वसाधारण आहेत. बाजारात होत असलेल्या आवकेच्या कमी जास्त प्रमाणामुळे वांग्याच्या बाजारभावतही चढ उतार दिसून आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com