आजपासून अर्थसंक्लपीय अधिवेशन...

आजपासून अर्थसंक्लपीय अधिवेशन...
आजपासून अर्थसंक्लपीय अधिवेशन...
   मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (ता.२५) सुरूवात होत आहे. सहा दिवसाच्या अधिवेशनात आगामी एप्रिल ते जुलै २०१९ अशा चार महिन्याच्या अत्यावश्यक खर्चाला मंजुरी, महत्त्वाची विधेयके आणि राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा असे महत्त्वाचे कामकाज होणार आहे. लोकसभा निवडणुकीचे घोडामैदान जवळ आल्याने अधिवेशनात सत्तारूढ आणि विरोधी पक्षात राजकीय डावपेच रंगण्याचीही चिन्हे आहेत.     २७ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाईल. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प मांडताना सरकारकडून कोणतीही नवी घोषणा अपेक्षित नाही. कारण विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी फडणवीस सरकारचे आणखी एक अधिवेशन होईल. साधारणत: येत्या मे महिन्याच्या शेवटच्या किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात होणारे अधिवेशन हे युती सरकारचे शेवटचे अधिवेशन असेल. त्यावेळी नव्या घोषणांना वाव असावा म्हणून अंतरिम अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणा टाळण्याकडे सरकारचा कल आहे.     आज (ता.२५) सकाळी ११ वाजता विधिमंडळ सदस्यांच्या संयुक्त बैठकीतील राज्यपाल सी. विद्यासागर राव अभिभाषणाने अधिवेशनाला सुरूवात होईल. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या मांडून शोकप्रस्ताव चर्चेला घेतला जाईल. पुरवणी मागण्यांवर दुसऱ्या दिवशी म्हणजे २६ फेब्रुवारीला चर्चा होईल. २७ फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प सादर केला जाईल. विधानसभेत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार तर विधानपरिषदेत वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर अर्थसंकल्प मांडतील. २८ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा होऊन तो मंजूर केला जाईल आणि त्याचदिवशी पुरवणी विनियोजन विधेयक मांडण्यात येईल.    या अधिवेशनात प्रश्नोत्तरे, लक्षवेधी सूचना चर्चेला येणार नाहीत. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन सत्तारूढ आणि विरोधी पक्षाकडून १ मार्च रोजी नियम २९३ अन्वये एकच प्रस्ताव चर्चेला ठेवला जाईल. दुष्काळाची वाढती व्याप्ती लक्षात घेता दोन दिवस चालणारी ही चर्चा वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com