राज्य सरकार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना करणार मदत : महसूलमंत्री पाटील

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई  : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारला निवेदन पाठवले आहे. मात्र, केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारही मदत देण्याबाबत सकारात्मक आहे. मदत वाटपासाठी दुष्काळग्रस्त शेतकरी, त्यांचे धारण क्षेत्र आदी आवश्यक सर्व माहिती तयार करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. येत्या एक फेब्रुवारीपर्यंत पहिल्या टप्प्यात कोरडवाहू शेतकऱ्यांना ही मदत वितरित केली जाईल, अशी शक्यता आहे. 

मंत्रालयात मंगळवारी (ता. १५) झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत त्यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. राज्यात येत्या फेब्रुवारी-मार्च महिन्यांत निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईची शक्यता विचारात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी उपाययोजना सुरू कराव्यात अशा सूचना बैठकीत मंत्री पाटील यांनी दिल्या.

ते म्हणाले, की आवश्यक तेथे पिण्याच्या पाण्याचे टँकर्स सुरू करावेत. पाण्यासाठी नागरिकांना कोणताही त्रास सहन करावा लागू नये. त्यासोबतच टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी पर्यायी उपाययोजनाही सुरू केल्या जाव्यात. विविध कारणांमुळे प्रलंबित, अर्धवट राहिलेल्या नळपाणीपुरवठा योजनांना राज्य, विभाग आणि जिल्हा स्तरावर मान्यता देण्यात यावी. बिल भरले नसल्याने खंडित पाणीपुरवठा योजनांची ५ टक्के बिले भरून त्यांना तातडीने कनेक्शन देऊन योजना पूर्ववत सुरू कराव्यात. दुरुस्तीसाठी बंद असलेल्या योजनांची तातडीने दुरुस्ती करून अशा योजनाही लवकर सुरू कराव्यात. जेणेकरून भविष्यात पाणीटंचाई जाणवली तरी दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना टँकर्सवर अवलंबून राहावे लागणार नाही, अशी व्यवस्था तयार करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  

दुष्काळी स्थिती आणि उपाययोजनांचा दैनंदिन आढावा घेण्यासाठी येत्या आठवड्याभरात राज्यस्तरीय वॉररूम कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. त्याच धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यातही असा कक्ष सुरू करावा, असे निर्देश मंत्री पाटील यांनी  दिले.    चारा छावण्यांसाठी लवकरच मार्गदर्शक सूचना  येत्या काळात संभाव्य चाराटंचाई आणि उपलब्ध चाऱ्याचे नियोजन याचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. त्यानुसार दुष्काळी भागात मंडळ स्तरावर चाऱ्याची सुविधा निर्माण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच चारा छावण्या सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना लवकरच जारी केल्या जाणार आहेत. दुष्काळग्रस्त भागात सध्या चाराटंचाई नसली तरी, येत्या काळात टंचाईची स्थिती ओळखून तयारी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com