महापूर, अतिवृष्टीसंदर्भात केंद्रीय पथकासमोर सादरीकरण
महापूर, अतिवृष्टीसंदर्भात केंद्रीय पथकासमोर सादरीकरण

महापूर, अतिवृष्टीसंदर्भात केंद्रीय पथकासमोर सादरीकरण

पुणे : महापूर व अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी केंद्रीय पथकाच्या तीनदिवसीय दौऱ्याला सुरवात झाली आहे, अशी माहिती महसूल आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.  “पथकाच्या दौऱ्याला सुरवात झाली असून सातारा, सांगली, कोल्हापूर भागाला प्रत्यक्ष भेटी देऊन माहिती घेतली जात आहे. या पथकासमोर निधीबाबत मांडलेल्या प्रस्तावाची माहिती तूर्त देता येणार नाही. मात्र, ३१ ऑगस्ट रोजी कोकणचा दौरा आटोपल्यानंतर या मुद्याबाबत चर्चा होईल, असे डॉ. म्हैसेकर यांनी अग्रोवनला सांगितले.  राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे सहसचिव डॉ. थिरुपुगाज या पथकाचे नेतृत्व करीत आहेत. मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी पथकासमोर सादरीकरण केले. कोकणचे विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड, कृषी आयुक्त सुहास दिवसे या वेळी उपस्थित होते. “या आपत्तीच्या काळात प्रशासनाने बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर केले. कोकण व पुणे विभागात अतिवृष्टी होत असताना भीमा व कृष्णा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली,” असे राज्य शासनाच्या वतीने पथकाला सांगण्यात आले.  राज्यात पूर परिस्थितीमुळे सात लाखांहून अधिक लोकांना स्थलांतरित करण्यात आले. एक हजारहून अधिक मदत केंद्रे उघडण्यात आली होती. बाधित झालेल्या ग्रामीण कुटुंबाला प्रत्येकी १० हजार तर शहरी भागातील कुटुंबांना १५ हजार रुपयाचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले, अशी माहिती केंद्रीय पथकाला देण्यात आली. एकटया पुणे विभागात ५८ तालुक्यांपैकी ३८ तालुक्यांमधील ७२७ गावांना पूर व अतिवृष्टीचा फटका बसला. पुणे विभागात एक लाख ८० हजार ४४८ कुटुंबातील सात लाख ५९ हजार ५९५ लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. या आपत्तीत ६० लोकांचा मृत्यू झाला त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील १०, सातारा जिल्ह्यातील ६, सांगली जिल्ह्यातील २८, सोलापूर जिल्ह्यातील ३ तर कोल्हापूर जिल्ह्यातील १३ लोकांचा समावेश आहे, असेही पथकाला सांगण्यात आले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com