केंद्राचा आयात कांदा राज्य सरकारने नाकारला

Onion
Onion

मुंबई: केंद्र सरकारने आयात केलेला कांदा उचलण्यास राज्य सरकारने नकार दिला असून, राज्यातीलच कांद्याची आवक वाढल्याने दर घसरले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारचा आयात महागडा कांदा महाराष्ट्राला नको, असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांना पाठवले आहे. यामुळे केंद्र सरकारने आयात केलेल्या कांद्याचा नवा पेच निर्माण झाला आहे. त्यातच केंद्राने आयात केलेल्या कांद्याला कोंब फुटले असल्याने तो खराब झाल्याचेही सांगण्यात येते.  केंद्र सरकारने इजिप्त, तुर्की आणि इतर काही देशांतून डिसेंबरमध्ये कांदा आयात केला होता. १७ डिसेंबरला केंद्र सरकारने राज्य सरकारला पत्र पाठवून आयात कांदा राज्याचे उचलण्याची शिफारस केली होती. ६ डिसेंबरला नाफेड ने राज्य सरकारला १०० टन कांदा उचलण्याचे कळवले. त्यासाठी राज्य सरकारने जेएनपीटीच्या माध्यमातून टेंडर प्रक्रिया सुरू केली. १ किलोची पाकिटे तयार करून केंद्राच्या दराप्रमाणे प्रतिकिलो ८० रुपये हा कांदा विकण्याचे नियोजित होते. या काळात कांद्याचे दर शंभर रुपयांच्या पेक्षाही जास्त झालेले होते.  मात्र, दरम्यानच्या काळात महाराष्ट्राच्या बाजारात राज्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेला कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे कांद्याचे खरेदी दर देखील कमी झाले. साधारणत: ३७ ते ६७ रुपयांच्या दरम्यान कांद्याचे दर कमी झाल्याने केंद्र सरकारचा ८० रुपये प्रतिकिलोचा कांदा घेण्यास राज्य सरकारने नकार कळवला आहे.  मुख्यमंत्र्यांच्या अगोदर राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने देखील केंद्राला महाराष्ट्राला आयात कांद्याची आवश्‍यकता नसल्याचे कळवले आहे. मात्र, केंद्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने राज्य सरकारने आयात कांदा उचलण्यासाठी विनंती केली आहे. केंद्राच्या तुलनेत बाजारात कमी दर राज्यात कांदा उत्पादन वाढले असून शेतकऱ्यांनी साठवणूक केलेला कांदादेखील बाजारात आणल्याने ही स्थिती निर्माण झाली. आता केंद्राचा आयात कांदा उचलला तर कांद्याचे भाव कमालीचे गडगडतील. शिवाय निकृष्ट प्रतिचा कांदा ग्राहकांच्या माथी मारावा लागेल, असे राज्य सरकारचे मत आहे. त्यामुळे, केंद्राचा आयात कांदा उचलू नये, असे स्पष्ट धोरण राज्याने घेतले आहे. साधारणत: ३७ ते ६७ रुपयांच्या दरम्यान कांद्याचे दर कमी झाल्याने केंद्र सरकारचा ८० रुपये प्रतिकिलोचा कांदा घेण्यास राज्य सरकारने नकार कळवला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com