`महानंद'मधील गैरव्यवहाराची चौकशी सुरू

`महानंद'मधील गैरव्यवहाराची चौकशी सुरू
`महानंद'मधील गैरव्यवहाराची चौकशी सुरू

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ अर्थात महानंद डेअरीच्या तत्कालीन संचालकांना २००९ ते २०१५ या काळात केलेल्या उधळपट्टीचा जाब आता द्यावा लागणार आहे. या संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे महानंदचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह ५८ जणांना या संदर्भात सहकार विभागाने नोटीस जारी केली आहे.  महानंदवर निवडणुकीच्या माध्यमातून संचालक मंडळ अस्तित्वात आहे. २००५ ते २०१५ या काळात महानंदमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि अपहार झाल्याच्या तक्रारी आहेत. या अनुषंगाने झालेल्या लेखापरीक्षण अहवालात सुमारे बारा विषयांवर ठपका ठेवण्यात आला आहे. प्रवास, वाहन भत्ता तसेच घरभाड्यावर वारेमाप खर्च केल्याचे सरकारच्या लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर संचालकांनी आर्थिक मनमानी करत भूम तालुका दूध संघाला नियम डावलून ६५ लाख रुपये विशेष उचल संचालकांनी मंजूर करुन दिले आहेत, अर्थात त्यासाठी सर्वसाधारण सभेची किंवा सहकारी निबंधकांच्या परवानगी संचालकांनी घेतलेली नाही. हा संघ केवळ अडीच लाख रुपयांच्या विशेष अग्रीमास पात्र होता. तसेच भूम तालुका दूध संघ २०१३ पासून अवसायनात गेला असून, तेव्हापासून ही रक्कम थकीत आहे. सहकार कलम ८३ नुसार करण्यात आलेल्या चौकशीतही ही बाब उघडकीस आली आहे. महानंदकडून भूम तालुका संघाच्या मागणीला कार्योत्तर परवानगी देतेवेळी संघाकडून महानंदला दूध पुरवठाही होत नव्हता. तसेच त्यानंतरही भूम संघाने महानंदला दुधाचा पुरवठा केलेला नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांत सतत आर्थिक डबघाईला आलेल्या महानंदला रसातळाला पोचवण्याचे काम तत्कालीन संचालकांनी केल्याचा आरोप आहे. प्रवास खर्चासाठी बिले सादर न करताच ६८ लाख खर्च केले गेलेले आहेत. तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालकांच्या निवासस्थानांसाठी तब्बल ३२ लाख रुपये खर्च केले गेलेले आहेत. डेअरीच्या उत्पादनांव्यतिरिक्त अन्य जाहिरातींवर ५ लाखांचा खर्च दाखवण्यात आला आहे. तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी या प्रकरणी विधानसभेत चौकशीची मागणी केली होती, या संदर्भात उपस्थित प्रश्नावर विधिमंडळात चर्चा ही झाली होती, आता या पावणेदोन कोटी रुपयांच्या उधळपट्टीसाठी सहकार विभागाने तत्कालीन संचालकांना जबाबदार धरले आहे, या आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी सहनिबंधक सहकारी संस्था यांनी सहायक निबंधक डी. बी. गोस्वामी यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे महानंदचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे दिसत असून, त्याला तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक आणि संचालक मंडळ जबाबदार असल्याचे दिसत असल्याचे गोस्वामी यांनी सांगितले, त्यामुळे सर्व संबंधितांना नोटीस पाठवण्यात आल्याचे डी. बी. गोस्वामी यांनी सांगितले. २० फेब्रुवारीपर्यंत या नोटीसला उत्तर देण्यास संबंधितांना सांगण्यात आले आहे, त्यानंतरच पुढील कारवाई काय असेल हे ठरवण्यात येईल, असेही गोस्वामी यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com