राज्यात भेंडी प्रतिक्विंटल १४०० ते ५००० रुपये

राज्यात भेंडी प्रतिक्विंटल १४०० ते ५००० रुपये
राज्यात भेंडी प्रतिक्विंटल १४०० ते ५००० रुपये

सोलापुरात प्रतिक्विंटल ४५०० रुपये सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात भेंडीला चांगली मागणी राहिली. भेंडीला प्रतिक्विंटल सर्वाधिक ४५०० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात या सप्ताहात भेंडीची आवक रोज ७ ते १० क्विंटलपर्यंत झाली. दर प्रतिक्विंटल किमान १५०० रुपये, सरासरी ३००० आणि सर्वाधिक ४५०० रुपये असा दर मिळाला. या आधीच्या सप्ताहात हाच दर प्रतिक्विंटल किमान १२०० रुपये, सरासरी २००० आणि सर्वाधिक ३५०० रुपयांवर होता. तर आवक रोज १० ते २० क्विंटलपर्यंत होती.जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आवक एकदमच कमी ५ ते ७ क्विंटलपर्यंत झाली. तेव्हापासून आवकेत अशीच चढ- उतार होते आहे. पण दर टिकून आहेत. सध्या हा दर प्रतिक्विंटल किमान २००० रुपये, सरासरी ३५०० रुपये आणि सर्वाधिक ४५०० रुपये इतका मिळतो आहे. आवक कमी राहिल्यास हा दर आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

अकोल्यात प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये अकोला ः येथील बाजारात भेंडीच्या दरांमध्ये मागील काही दिवसांपासून तेजी अाली अाहे. सध्या भेंडी कमीत कमी १५०० ते कमाल २५०० रुपये क्विंटलपर्यंत विकत अाहे. सरासरी २००० रुपयांचा हा दर मिळत अाहे. येथील बाजारात भेंडीची अावक सध्या एक टनापर्यंत अाहे. तुलनेने दरसुद्धा चांगला मिळत अाहे. बाजारात भेंडी अधिक प्रमाणात अकोला जिल्ह्यातून विक्रीसाठी येत अाहे. त्यासोबत काही अावक बुलडाणा, वाशीम अाणि लगतच्या जिल्ह्यातूनही होत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. बाजारात ग्राहकांना भेंडी सध्या ४० रुपयांपेक्षा अधिक दराने खरेदी करावी लागत अाहे. अाणखी काही दिवस हे दर कमी होण्याची शक्यता नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे होते. इतर भाजीपाल्याप्रमाणे भेंडीच्या दरात सुधारणा दिसून येत अाहे.

जळगावात प्रतिक्विंटल ३५०० रुपये जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भेंडीची आवक मागील दोन महिन्यांपासून रखडत सुरू आहे. गुरुवारी (ता. २४) सात क्विंटल आवक झाली. भेंडीला प्रतिक्विंटल १४०० ते ३५०० व सरासरी २१५० रुपये दर मिळाला. आवक जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, एरंडोल, धरणगाव व जळगाव तालुक्‍यातून होत आहे. भेंडीसाठी प्रसिद्ध असलेल्या धरणगावमधील धार, पथराड व परिसरात दुष्काळी स्थितीमुळे लागवडच झालेली नसल्याने आवक रखडत आहे. एरंडोलात लागवड बऱ्यापैकी आहे, परंतु तेथून मुंबई, ठाणे भागात भेंडी खरेदीदारांच्या माध्यमातून जात आहे. यामुळे जळगाव बाजार समितीमधील आवक रखडत सुरू आहे. महिनाभरापासून दर टिकून आहे. सरासरी दर २००० रुपयांपेक्षा कमी मिळालेले नसल्याचे सांगण्यात आले.

परभणीत प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे- भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. २४) भेंडीची १५ क्विंटल आवक होती. भेंडीला प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. सध्या येथील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये परभणी, पूर्णा तालुक्यांतून भेंडीची आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येकी गुरुवारी भेंडीचे ८ ते १५ क्विंटल आवक झाली. त्या वेळी सरासरी १५०० ते ३५०० रुपये दर  मिळाले. गुरुवारी (ता. २४) भेंडीचा १५ क्विंटल आवक असताना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये होते. तर घाऊक विक्री प्रतिकिलो ४० ते ६० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

साताऱ्यात प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरूवारी (ता. २४) भेंडीची आठ क्विंटल आवक झाली असून भेंडीस प्रतिक्विंटलला ३००० ते ४००० असा दर मिळाला आहे. जानेवारी महिन्याच्या सुरवातीपासून भेंडीचे दर स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे. भेंडीची सर्वाधिक आवक फलटण तालुक्यातून होत असून कोरेगाव, खटाव तालुक्यांत काही प्रमाणात आवक होत आहे. २४ जानेवारी भेंडीची ११ क्विटंल आवक होऊन क्विंटलला ३००० ते ३५०० असा दर मिळाला आहे. तीन जानेवारी भेंडीची १२ क्विंटल आवक होऊन क्विंटलला ३००० ते ४००० असा दर मिळाला आहे. गेले तीन सप्ताहापासून भेंडीस क्विंटलला ३००० ते ४००० रुपये दरम्यान स्थिर आहेत. भेंडीची ६० ते ७० प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे.

पुण्यात दहा किलोला २०० ते ४०० रुपये पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २४) भेंडीची सुमारे ५ टेम्पो आवक झाली होती. या वेळी दहा किलोला २०० ते ४०० रुपये दर होता. राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे भेंडीचे उत्पादन घटल्याने सरासरीपेक्षा  कमी आवक होत असल्याने दर वाढलेले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. बाजारातील होणारी आवक ही प्रामुख्याने राज्याच्या विविध भागांतून होत आहे.

सांगलीत प्रतिदहा किलोला ५०० ते ६०० रुपये सांगली ः येथील शिवाजी मंडईत भेंडीच्या आवक कमी झाली आहे. यामुळे दरात वाढ झाली आहे. गुरूवारी (ता. २४) भेंडीची २० ते २५ बॉक्स (एक बॉक्स १५ ते २० किलोचे) आवक झाली होती. त्यास प्रतिदहा किलोस ५०० ते ६०० रुपये असा दर मिळाला. येथील शिवाजी भेंडीची आवक वाळवा, आष्टा, मिरज, पलूस तालुक्यांसह कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातून आवक होते. बुधवारी (ता. २३) भेंडीची २० ते २५ बॉक्सची आवक झाली असून त्यास प्रतिदहा किलोस ४५० ते ५०० रुपये असा दर होता. मंगळवारी (ता. २२) भेंडीची १५ ते २० बॉक्सची आवक झाली होती. त्यास प्रतिदहा किलोस ५०० ते ६०० रुपये असा दर मिळाला. सोमवारी (ता. २१) भेंडीची २० ते २५ बॉक्सची आवक झाली होती. त्यास प्रतिदहा किलोस ५०० ते ६०० रुपये असा दर होता. थंडीत भेंडीचे पिकाची अपेक्षित वाढ होत नाही. त्यामुळे शेतकरी भेंडीची लागवड करण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे भेंडीची आवक कमी झाली आहे, असे भेंडी उत्पादक शेतकरी बाबासाहेब शिलेदार यांनी सांगितले. गेल्या महिन्यात भेंडीचे दर ३०० ते ३५० रुपये प्रती असा दर होता. गेल्या पंधरवड्यात भेंडीची आवक कमी झाली असून भेंडीच्या दरात प्रतिकिलोस २० ते ३० रुपयांनी वाढ झाली आहे, अशी माहिती व्यापारी वर्गाने सांगितली.

नगरला प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. २४) भेंडीची १२ क्विंटल आवक झाली आणि प्रतिक्विंटलला २००० ते ५००० व सरासरी ३५०० रुपये दर मिळाला. नगर बाजार समितीत भेंडीला चांगली मागणी आहे. तरीही गेल्या महिनाभरापासून दर स्थिर आहेत. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत भेंडीची मराठवाड्यातील बीड, सोलापूर, पुणे भागातून आवक होत असते. भेंडीच्या आवकेवर काहीसा परिणाम दिसत असला तरी गेल्या महिनाभराच्या तुलनेत आवक आणि दर स्थिर आहे. १७ डिसेंबरला १६.६३ क्विंटल भेंडीची आवक झाली आणि प्रतिक्विंटलला २००० ते ५००० व सरासरी ३५०० रुपयांचा दर मिळाला. १० डिसेंबरला १७.०५ क्विंटल भेंडीची आवक झाली आणि प्रतिक्विंटलला २००० ते ५००० व सरासरी ३५०० रुपये दर मिळाला. ३ डिसेंबरला १३.३८ क्विंटलची आवक झाली आणि २००० ते ६००० व सरासरी चार हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com