देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

मंत्रिमंडळ विस्तार हिवाळी अधिवेशनापूर्वी

मुंबई ः राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असून, तो हिवाळी अधिवेशनापूर्वी होईल. या वेळी काही जुन्या मंत्र्यांना वगळून नव्यांना संधी देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "सकाळ'ला दिली. मंत्रिमंडळात नारायण राणे यांचा समावेश करणार असून, खाते देताना त्यांचा योग्य सन्मान करण्यात येईल, असे सांगताना फडणवीस यांनी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला चांगलेच टोले लगावले. येत्या 31 ऑक्‍टोबर रोजी राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर "वर्षा' निवासस्थानी अनौपचारिक चर्चा करताना ते बोलत होते.  मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी करणार असून, त्यात काही जुन्या मंत्र्यांना वगळण्याचे सूतोवाच फडणवीस यांनी केले. या वेळी काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येईल. ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली असून, त्यांनी "एनडीए'मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होईल आणि चांगले खाते देऊन त्यांचा योग्य सन्मान करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले. 

शिवसेनेच्या भूमिकेमुळे राज्य सरकार अस्थिर आहे का आणि भविष्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे समर्थन घेणार का, असा प्रश्‍न विचारला असता फडणवीस म्हणाले, की राष्ट्रवादी कॉंग्रेसचे समर्थन सरकारला असण्याबाबत अनेक अफवा आहेत. याबाबत उलटसुलट राजकीय चर्चाही अधूनमधून सुरू आहेत. मात्र या चर्चांमध्ये काडीमात्र तथ्य नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे समर्थन घेण्याबाबत भाजप किंवा राज्य सरकारच्या स्तरावर कोणताही प्रस्ताव किंवा चर्चाही नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन होणारच असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्‍त केला. समृद्धी महामार्गासाठी 60 टक्‍के शेतकऱ्यांनी संमती दिली असून, 50 टक्‍के जमीन नोव्हेंबर अखेरपर्यंत संपादित होईल. उर्वरित जमीन डिसेंबर अखेरपर्यंत संपादित करण्यात येणार असून महामार्गाचे काम जानेवारी 2018 मध्ये सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, बुलेट ट्रेनचा राज्याला फायदा होणार असून तो कसा होईल, याचे महत्त्व जनतेला पटवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.  फडणवीस म्हणाले... 

  • समृद्धी महामार्गाला कोरिया सरकारचे अर्थसाहाय्य 
  • "हुडको'कडून चार हजार कोटी प्राप्त 
  • बुलेट ट्रेनला जपानचे नगण्य व्याजदरात अर्थसाहाय्य 
  • बुलेट ट्रेनमुळे 25 हजार कायमस्वरूपी, तर तीन लाखांपर्यंत तात्पुरती रोजगारनिर्मिती 
  • शाश्वत शेतीवर पुढील दोन वर्षांत फोकस 
  • शिवसेना स्वतःच संपणार  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझे चांगले संबंध आहेत. मात्र, पक्ष म्हणून शिवसेनेची भूमिका योग्य नाही. शिवसेनेला सत्तेत राहून सत्ताधारी आणि विरोधक अशी दुहेरी भूमिका बजावायची असल्याने त्यांचे राजकीय नुकसान होत असल्याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले. यासाठी त्यांनी नांदेड आणि अन्य स्थानिक निवडणुकांचा दाखला दिला. नांदेडमध्ये आमच्या मतांची टक्‍केवारी वाढल्याचे सांगताना शिवसेनेचे मोठे नुकसान झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच, गेल्या वर्षभरात झालेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेचे मोठे नुकसान झाल्याचे सांगताना याला शिवसेनेची दुटप्पी भूमिका कारणीभूत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही दगडांवर पाय ठेवणाऱ्या शिवसेनेचे काय झाले हे स्पष्ट असताना त्यांना कुणी संपवायची गरजच नसून ते स्वतः संपणार असल्याचे ते म्हणाले. 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com