‘भारत बंद’ला राज्यात प्रतिसाद

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनाला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
State response to 'Bharat Bandh'
State response to 'Bharat Bandh'

पुणे ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनाला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पुणे, नाशिक, सांगली, कोल्हापूर, अकोला, नांदेड, परभणी आदी ठिकाणी विविध संघटनांनी सरकार विरोधात आंदोलने केली. अनेक जिल्ह्यांमध्ये बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. 

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील विविध कामगार संघटनांसह आडते आणि व्यापारी संघटनांनी बाजार समिती बंद ठेवत सरकारचा निषेध केला. सांगली येथे संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा म्हणून सांगलीतील जुन्या स्टेशन चौकात सोमवारी (ता. २७) धरणे आंदोलन करण्यात आले. 

केंद्र सरकारने आपल्या पाशवी बहुमताच्या जोरावर तीन कृषी कायदे आणि केंद्रीय श्रम संहिता कायदा मंजूर केला आहे. कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. परंतु अजूनही सरकारने शेतकरी नेत्यांच्याबरोबर चर्चा करून मार्ग काढण्याची भूमिका घेतलेली नाही. म्हणून संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने भारत बंदचे आवाहन केले होते. त्याला पाठिंबा देण्यासाठी सांगलीत आंदोलन झाले. 

परभणी येथे पुकारलेल्या भारत बंद दरम्यान जिल्ह्यात विविध ठिकाणी निदर्शने, रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हमाल, कामगार बंदमध्ये सहभागी झाल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमाल खरेदीचे व्यवहार बंद होते. बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य कॉ. राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली परभणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली.

कोल्हापूर येथे झालेल्या आंदोलनात शेतकरी आणि कामगारांच्या विरोधातील केंद्रातील भाजप सरकारला २०२४च्या निवडणुकीत गाडण्याचा निर्धार ऐतिहासिक बिंदू चौकात करण्यात आला. भाजप वगळता सर्वपक्षीय भारत बंदला कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बाजार समितीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले. सुमारे २०हून अधिक विविध संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com