राज्यात कडकडीत बंद

वसमत रस्त्यावर कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर भजन आंदोलन करण्यात आले.
वसमत रस्त्यावर कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर भजन आंदोलन करण्यात आले.

पुणे : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने गुरुवारी (ता.९) पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मात्र, समाजाच्या समन्वयकांनी शांततेचे आवाहन करूनदेखील अनेक भागांत दगडफेक, जाळपोळीचे प्रकार झाले. एसटी महामंडळाने प्रथमच राज्यातील सर्व बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. ठाणे, मुंबई, नवी मुंबईला बंदमधून वगळल्याने व्यवहार सुरळीत सुरु होते.  पुण्यात सकल मराठा क्रांती मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. या वेळी तरुण आंदोलकांनी जिल्हाधीकाऱ्यांनी निवेदन स्विकारण्याचा आग्रह धरला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुणे शहरात लक्ष्मी रोडवर आंदोलकांनी बसवर दगडफेक केली. बंदच्या राज्यव्यापी स्वरूपाबाबत मतभेद होते. कारण मराठा क्रांती मोर्चाच्या मुंबई भागातील समन्वयकांनी ‘बंद’ऐवजी ‘ठिय्या’ आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती. मात्र, औरंगाबादला झालेल्या बैठकीत इतर समन्वयकांनी ‘बंद’ची घोषणा केली होती. काही जिल्ह्यांमध्ये परिस्थितीनुसार ‘बंद’ की ‘ठिय्या’चा निर्णय घ्यावा, असेही घोषित करण्यात आले होते. परंतु, ठिय्या आंदोलनाऐवजी बंदचे संदेश काल रात्रीपासून राज्यभर फिरले. यामुळे अनेक जिल्ह्यांमधील शाळा, महाविद्यालये बंद होती. राज्यभर शांतता आणि संयमाने आंदोलन करण्याचे सकल मराठा समाज मोर्चाने आवाहन केले गेले होते. तरीही काही जिल्ह्यांमध्ये पेटवा पेटवी झालीच. सोलापूरच्या माढा, जालन्यात भोकरदन रस्त्यावर, हिंगोलीत ओंढा तालुक्यात तसेच नगरच्या राहाता भागात आणि लातूरच्या साखरपाटी भागात टायर जाळण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे प्रमुख जिल्हा मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली.  व्हिडिओ क्लिप, सीसीटीव्ही फुटेजवर नजर ठेवून समाजकंटक दिसल्यास वेळीच रोखा, अशा सूचना केंद्रीय गृह खात्याने राज्य प्रशासनाला दिल्या होत्या. राज्यात रॅपिड ॲक्शन फोर्सच्या सहा कंपन्या तैनात केल्या गेल्या. साध्या वेशातील पोलिस मोठ्या प्रमाणात आंदोलकांमध्ये होते. तसेच यंदा ड्रोनची देखील मदत पोलिस घेत होते. पुणे जिल्ह्यात पोलिस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली होती. ७००० पोलिस, ९०० होमगार्ड, एसआरपीच्या तीन तुकड्या रस्त्यावर उतरवल्या गेल्या. आंदोलक हाताबाहेर गेल्यास नियंत्रणासाठी २० शीघ्र कृती तुकड्या पुणे जिल्ह्यातील संवेदनशील भागात तैनात करण्यात आल्या होत्या.  बंदच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील शाळा, महाविद्यालयांसह सार्वजनिक आणि अभिमत विद्यापीठे बंदचा निर्णय जिल्हा प्रशासनानेच घेतला होता. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय झाली नाही. मात्र, आंदोलकांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग बंद पाडला. लोणावळ्यात रेल्वेदेखील रोखून धरण्यात आली.  सातारा जिल्ह्यात कडकडीत बंद ठेवला गेला. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. कराड-विटा राज्यमार्गावर मराठा बांधवांनी जनावरांसह रास्ता रोको केला. कराडला कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमावर मराठा बांधवांनी सामूहिक मुंडण आंदोलन केले. सोलापूरला आंदोलकांनी दगडफेक केली.  उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड भागातील शाळा, महाविद्यालये बंद होती. नांदेडच्या मालेगाव, धामदरी, सावरगाव, उमरी येथे सकाळी चारपासून रास्ता रोको सुरू झाले होते. जालन्यातील राजूर-फुलंब्री मार्गावर तळेगावाला सकाळपासून चक्का जाम सुरू झाला होता. औरंगाबादला धूत हॉस्पिटल चौकात आंदोलक ठाण मांडून बसले होते. विदर्भात बंदला अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यात सकाळपासूनच जोरदार प्रतिसाद मिळाला. नागपूरला मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढला गेला.  नाशिकला ठिय्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या राजकीय नेत्यांवर चपला भिरकावल्या. बंदमुळे नगर जिल्ह्यात एसटी सेवा पूर्णतः ठप्प झाली होती. नगर-पुणे मार्ग ठप्प झाला. मात्र, रुग्णवाहिकांना आंदोलकांकडून रस्ता तात्काळ मोकळा करून दिला जात होता. नाशिक-मुंबई महामार्गावरदेखील तुरळक वाहतूक झाली. नाशिकमध्ये चांदवड येथे आंदोलकांनी रिंगण करत मुंबई-आग्रा महामार्ग रोखून धरला होता. 

बाजारपेठा, लिलाव ठप्प बंदला प्रतिसाद देण्यासाठी बहुतेक जिल्ह्यातील बाजारपेठा बंद होत्या. राज्यातील विविध बाजार समित्यांमधील लिलाव विस्कळित झाले. मुंबईला जाणारा भाजीपाला पुरवठादेखील थांबला होता. ठिकठिकाणी झालेल्या ठिय्या आंदोलनामुळे बससेवादेखील कोलमडून पडली. औरंगाबाद, पुणे, बाजार समितीमधील व्यवहार ठप्प होते. 

इंटरनेटसेवा बंद  पोलिसांनी बुधवारपासूनच सोशल मीडियावरील असंख्य संदेशांचा अभ्यास करणे चालू केले होते. या संदेशांमधील मजकूर तसेच स्थानिक स्थिती असे दोन्ही मुद्दे विचारात घेत काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली. यात पंढरपूरसह पुणे जिल्ह्यातील बारामती, मावळ, दौंड, भोर, खेड, शिरूरसह औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली भागातील इंटरनेट सेवादेखील स्थगित करण्यात आली. 

शरद पवार यांच्या घरासमोर आंदोलन  पुणे जिल्ह्यात आंदोलकांनी थेट माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या घरासमोर ठिय्या दिला होता. श्री. पवार यांच्या माळेगावमधील गोविंद बागेसमोर आंदोलक बसल्यामुळे पोलिसांची धावपळ झाली. विशेष म्हणजे आंदोलक घोषाबाजी करीत असताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः बाहेर येत आंदोलनात सहभाग नोंदविला.  आंदोलनातील घडामोडी

  • अनेक जिल्ह्यांमध्ये एसटी बंद 
  • अनेक ठिकाणी तोडफोड, जाळपोळीच्या घटना
  • राज्यभरातील रस्ते, महामार्ग अडविले
  • रुग्णवाहिकांना रस्ता मोकळा करून दिला 
  • अनेक ठिकाणी रेल्वेसेवाही विस्कळीत
  • पुणे, ओरंगाबाद, कोल्हापूर, सांगली भागातील इंटरनेट सेवा बंद
  • अनेक बाजार पेठा, बाजार समित्या ठप्प
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com