लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ३९३ उमेदवारांचे अर्ज दाखल

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील १४ मतदारसंघात गुरुवारी १९७ उमेदवारांनी, तर एकूण ३९३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. 

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील १४ मतदारसंघात २८ मार्चपासून अर्ज स्वीकारण्यात येत होते. गुरुवारी (ता. ४) तिसऱ्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या गुरुवारच्या शेवटच्या दिवशी भाजपने जळगाव मतदारसंघातील उमेदवार बदलला. शेवटच्या क्षणी स्मिता उदय वाघ यांची उमेदवारी रद्द करून भाजपने चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. पाटील यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नाराजीमुळे भाजपला उमेदवार बदलण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे समजते.

भाजपने २६ मार्च रोजी प्रसिद्ध केलेल्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत स्मिता वाघ यांच्या नावाचा समावेश होता. विद्यमान खासदार ए. टी. नाना पाटील यांना डच्चू देत भाजपने विधान परिषद सदस्य स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वाघ यांनी प्रचाराला सुरवात केली होती. मात्र, वाघ यांच्या उमेदवारीवर भाजपमधील एक गट नाराज होता. या नाराजीची दखल घेत पक्षाने वाघ यांच्या उमेदवारीचा निर्णय मागे घेतला.

काही वर्षांपूर्वी विधान परिषदेवर निवडून आलेल्या स्मिता वाघ या जिल्ह्यातील नेते एकनाथ खडसे यांच्या निकटवर्ती म्हणून ओळखल्या जात होत्या. खडसे यांचा राजकीय विजनवास सुरू झाल्यानंतर स्मिता वाघ यांनी गिरीश महाजन यांच्या गटात सामील होणे पसंत केले. मात्र, वाघ कधीच महाजन यांच्या गुडबुकमध्ये नव्हत्या. जळगावमधून उद्योजक प्रकाश पाटील यांना उमेदवारी द्यावी असा महाजन यांचा आग्रह होता. पक्षातंर्गत वादात जळगावची जागा अडचणीत येऊ नये म्हणून भाजपने अखेरच्या क्षणी उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. स्मिता वाघ यांनी एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज भरलेला असतानाही त्यांना उमेदवारी मागे घेण्याचा आदेश पक्षाकडून देण्यात आल्याने जिल्ह्यातील वाघ समर्थकांमध्ये संताप आहे.

मतदारसंघनिहाय गुरुवारी दाखल आणि कंसात एकूण अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या  अशी आहे. जळगाव मतदारसंघात गुरुवारी १४ (एकूण २२ उमेदवार), रावेर ९ (१६), जालना १८ (३९), औरंगाबाद १६ (४२), रायगड १५ (२७), पुणे ३४ (४७), बारामती १८ (३१), नगर १९ (३१), माढा १२ (४१), सांगली ११ (२१), सातारा ३ (१२), रत्नागिरी-सिंधुदुर्ग ६ (१३), कोल्हापूर ९ (२६) आणि हातकणंगले मतदारसंघात १३ उमेदवारांनी तर एकूण २५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com