लॉकडाउनमध्ये १४ लाख क्विंटल फळ, भाजीपाल्याची शेतकऱ्यांकडून थेट विक्री

लॉकडाउनमध्ये राज्यातील सुमारे तीन लाख शेतकऱ्य़ांनीलॉकडाउनच्या काळात १३ लाख ८० हजार क्विंटल फळ, भाजीपाल्याची थेट ग्राहकांना विक्री करून एक नवीन पर्याय शोधला.
Steps of self-reliance by three lakh farmers
Steps of self-reliance by three lakh farmers

लातूर ः ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये राज्यातील सुमारे तीन लाख शेतकऱ्य़ांनी आत्मनिर्भरतेचे पाऊल टाकले. कृषी विभागाची त्यांना खंबीर साथ मिळाली. मध्यस्थ, व्यापाऱ्यांना बाजूला सारत या शेतकऱ्यांनी लॉकडाउनच्या काळात १३ लाख ८० हजार क्विंटल फळ, भाजीपाल्याची थेट ग्राहकांना विक्री करून एक नवीन पर्याय शोधला. यात शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळाला. तसेच ग्राहकांनादेखील वाजवी किंमतीत भाजीपाला मिळाला. दुहेरी उद्देश यातून साध्य होण्यास मदत झाली आहे.

सौदे करून फिरवली पाठ कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून मार्चपासून राज्यात लॉकडाउन सुरू झाला. त्यापूर्वी शेतकऱ्यांच्या फळे, भाजीपाल्याचे सौदे झाले होते. पण लॉकडाउनमध्ये व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली. ना पैसे दिले ना माल उचलला. त्यामुळे हे फळे, भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. नाशवंत माल असल्याने करायचे काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता.

उभी ठाकली पर्यायी व्यवस्था लॉकडाउनमध्ये भाजीपाला मार्केट बंद राहिली. त्यामुळे कृषी विभागाने पुढाकार घेत राज्यात ग्राहकांना थेट विक्रीचा शेतकऱ्यांसमोर पर्याय ठेवला. याला राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला. राज्यात याकरिता तीन हजार ७९० शेतकरी कंपन्या, शेतकरी गट, शेतकरी संस्था पुढे आल्या. यामाध्यमातून अंदाजे तीन लाखांवर शेतकरी या उपक्रमात सहभागी झाले.

कृषी विभागाने केली मध्यस्थी लॉकडाउनमध्ये शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी कृषी विभागाचा महत्त्वाचा पुढाकार राहिला. यात कृषी सहायकांपासून ते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच अधिकारी, कर्मचारी कामाला लागले. शेतकऱ्यांना भाजीपाला विक्री करण्यासाठी सोसायट्यात जाऊन मध्यस्थाची भूमिका त्यांनी बजावली. इतकेच नव्हे, तर राज्यात तीन हजार २१२ आउटलेट उभी केली. यातून ही विक्री करण्यात आली.

मध्यस्थ, व्यापाऱ्यांना फाटा फळे, भाजीपाल्यात मध्यस्थ, व्यापाऱ्यांचेच फावले जाते. तेच पैसे कमावून निघतात. पण या लॉकडाउनच्या काळात मात्र थेट विक्रीचा पर्याय समोर आल्याने शेतकऱ्यांना शेतीमालासाठी अपेक्षित दर मिळाला. दुसरीकडे ग्राहकांनादेखील वाजवी किमतीत फळे, भाजीपाला खरेदी करता आला.

आकडे बोलतात...
विभाग थेट विक्री झालेला भाजीपाला (क्विंटल)
पुणे २,९३,५७९
कोल्हापूर २,७६,१०६
अमरावती २,२२,४२९
नाशिक २,२१,५८६
औरंगाबाद १,२२,४२०
लातूर १,०८,९४९
नागपूर ९८,५३१
ठाणे ३९,६९०
एकूण १३,८३,२९०

लॉकडाउनमध्ये फळे, भाजीपाला उत्पादक शेतकरी अधिक अडचणीत आले होते. सुरुवातीला अडचणी आल्या; पण मार्ग काढत शेतकऱ्यांकडील फळे, भाजीपाला थेट ग्राहकांना विकण्यासाठी कृषी विभागाने मध्यस्थी केली. यात शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला आणि ग्राहकांनादेखील वाजवी दरात भाजीपाला मिळाला आहे. व्यापाऱ्यांची मधली फळी तोडण्यात यश आले. - टी. एन. जगताप, सहसंचालक, कृषी विभाग, लातूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com