गव्हाची पेरणी आता थांबवा ः तोटावार

गव्हाची पेरणी आता थांबवा  ः  तोटावार
गव्हाची पेरणी आता थांबवा ः तोटावार

वाशीम  ः ‘गहू लागवडीचा कालावधी उलटला असून, आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी करू नये’, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एम. तोटावार यांनी केले आहे. जिल्ह्यात पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांच्या लागवडीकडे लक्ष केंद्रित करावे, असेही त्यांनी म्हटले आहे. श्री. तोटावार यांनी म्हटले की, गहू पीक हे जिल्ह्यातील मुख्य रब्बी पिकांपैकी एक आहे. जिल्ह्यात गव्हाचे सरासरी क्षेत्र जवळपास २८४१७ हेक्टर असून, या वर्षी खरीप हंगामात सरासरी पर्जन्यमान चांगले झाल्यामुळे ३४ हजार ७५२ हेक्टर क्षेत्रावर पिकाची पेरणी झाली. सिंचनाचे स्रोत मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र असे असले तरी उपलब्ध स्रोतातील पाण्याचा अपव्यय न करता आता गहू पिकाची पेरणी करू नये. गहू या पिकास सिंचनासाठी इतर रब्बी पिकांपेक्षा; तसेच इतर उन्हाळी पिकांपेक्षा पाणी जास्त प्रमाणात लागते. या परिस्थितीत उशिराने करण्यात येणाऱ्या गहू लागवडीचा खर्च व नफा ताळमेळ पाहता त्यास लागणारा लागवड खर्च व मिळणारे उत्पन्न इतर पिकांपेक्षा कमी असते.  कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार गहू पिकाची उशिरात उशिरा पेरणी ही १५ डिसेंबरपर्यंत करावी. या तारखेनंतर गव्हाची पेरणी करू नये. यामागील कारणे म्हणजे गहू पिकास पोषक असे ठरणारे १०० थंडीचे दिवस हवे असतात. उशिराने पेरणी झाल्यास हा थंडीचा कालावधी गहू पिकास मिळत नाही. त्यामुळे उशिराने पेरणी केलेल्या गव्हापासून चांगले उत्पन्न मिळू शकत नाही.  उन्हाळी पिकांवर लक्ष केंद्रित करा  शेतकऱ्यांनी उशिराने गव्हाची पेरणी करण्यापेक्षा उपलब्ध असलेल्या पाण्याचा योग्य तो वापर करावा. यासाठी उन्हाळी तीळ (एकेटी १०१, पीकेव्ही एनटी ११) उन्हाळी भुईमूग (टीएजी २४), उन्हाळी मूग (पूसा, वैशाखी, पूसा ९५३१) पेरावा, असा सल्ला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. तोटावार व वाशीम कृषी संशोधन केंद्रातर्फे देण्यात आला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com