सोलापूर बाजार समितीत शुकशुकाट

Solapur Market Committee stopped
Solapur Market Committee stopped

सोलापूर : ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर योग्य ती काळजी घेऊन बाजार समित्या सुरू ठेवा, असे पणन विभागाने सांगितले असले, तरी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी स्वतःहून शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नेहमी वर्दळ असणाऱ्या बाजार समितीत शुक्रवारी (ता.२०) भाजीपाला आणि कांदा विभागात शुकशुकाट राहिला. सुमारे दोन कोटी रुपयांहून अधिक रुपयांची उलाढाल यामुळे थांबली. 

सोलापूर बाजार समिती ही राज्यातील आघाडीवरील बाजार समित्यांपैकी एक आहे. विशेषतः कांद्यासाठी सोलापूरची बाजारपेठ अधिक प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यातून शेतकरी आणि व्यापाऱ्यांची मोठी आवक-जावक या बाजारात होते. सध्या कांद्याचा हंगाम सुरू आहे. शिवाय दरही बऱ्यापैकी टिकून आहेत; पण कोरोनाच्या प्रादुर्भावाचे संकट घोंगावत असल्याने व्यापाऱ्यांनी स्वतःहून पुढे येत गर्दी कमी व्हावी, यासाठी शुक्रवार आणि शनिवार असे दोन्ही दिवस व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. 

यासंबंधी शेतकऱ्यांनाही पूर्वकल्पना दिली गेल्याने बाजार समितीत शेतमालाची आवक होऊ शकली नाही. भुसार भागात मात्र काही किरकोळ गाड्यांची आवक-जावक राहिली. भुसार बाजारातही अशीच स्थिती राहिली. या विभागातही दोनशेहून अधिक व्यापारी आहेत. बाजार समितीत सुमारे दोन कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल ठप्प झाली. 

प्रशासकीय कामकाज सुरूच

बाजार समितीतले व्यवहार बंद असले, तरी बाजार समितीचे प्रशासकीय कार्यालय मात्र सुरूच होते. त्यातही तुरळक कर्मचारी होते. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर दिले जात होते. बाजार समितीच्या आवारातही पूर्णपणे शुकशुकाट असल्याने स्वच्छताही करण्यात येत होती. शुक्रवारी आणि शनिवारी दोन दिवसाचा बंद आणि रविवारची साप्ताहिक सुटी असे तीन दिवस व्यवहार बंद राहणार आहेत. आता सोमवारी (ता.२३) पुन्हा व्यवहार सुरू होतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com