‘कोयने’त शंभर टक्के पाणीसाठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  ः राज्याच्या वीजनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले कोयना धरण फुल्ल झाले आहे. धरणात १०५.२५ टीएमसी म्हणजेच शंभर टक्के भरले आहे. धरणाचे सहा वक्र दरवाजे तसेच पायथा वीजगृहातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.

कोयना धरणाची १०५.२५ टीएमसी क्षमता आहे. जून महिन्यात पाऊस लांबल्याने जिल्ह्यातील धरणे भरणार की नाही या अनेक शंका निर्माण होत होत्या. मात्र त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व चित्रच बदलून गेले आहे. कोयना धरण क्षेत्रात अनेक दिवस मुसळधार पाऊस झाल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली होती. धरणातील पाणीसाठा नियंत्रित राहण्यासाठी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धरणाचे १६ फुटांवर दरवाजे उचलून एक लाख २२ हजार ४७५ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.

यामुळे कोयना नदीस महापूर आल्याने कराड, पाटण तालुक्यातील अनेक गावांतील शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना कोट्यावधींच्या नुकसानीला समोरे जावे लागले आहे. यानंतर पावसाचा जोर कमी जास्त होत गेल्याने त्यानुसार पाण्याचा विसर्ग कमी जास्त करण्यात आला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीस पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागल्याने धरणाचे सहा वक्र दरवाजे दहा फुटांवर उचलण्यात आले होते. पावसाचा जोर ओसरला तरी पायथा वीजगृहातून पाण्याचा विसर्ग सुरू ठेवला जात होता.

कोयना धरणात पाणी साठवण क्षमतेच्या दुप्पटीपेक्षा जास्त म्हणजे २११.४३ टीएमसीपेक्षा अधिक पाण्याची आवक झाली आहे. धरणाची जलपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या सहा वक्र दरवाजांतून आतापर्यंत १०७.१६ टीएमसीपेक्षा अधिक पाणीसाठा विनावापर सोडावे लागले आहे. मंगळवारी मात्र सहा वक्र दरवाजे तसेच पायथा वीजगृहातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला. सध्या धरण शंभर टक्के भरले आहे. धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. धरण क्षेत्रात पाऊस बंद झाला असला तरी, प्रतिसेकंद दहा हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. धरण भरल्यामुळे वीजनिर्मितीच्या दृष्टीने तसेच  सिंचनासाठीही फायदेशीर ठरणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com