वादळी पावसाचा इशारा

अतितीव्र कमी दाब क्षेत्रामुळे (डिप्रेशन) महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. आज (ता. २९) उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Storm warning in the state
Storm warning in the state

पुणे : गुलाब चक्रीवादळ ओसरले असले, तरी त्याच्या प्रभावामुळे असलेल्या अतितीव्र कमी दाब क्षेत्रामुळे (डिप्रेशन) महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. आज (ता. २९) उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

महाराष्ट्रातील वादळी प्रणाली आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा विखुरला गेला आहे. उत्तर कोकणापासून आंध्र प्रदेशापर्यंत असलेला पूर्व आणि पश्‍चिम दिशेने वाऱ्यांचा कमी दाबाचा पट्टा वादळी प्रणालीच्या चक्राकार वाऱ्यांमध्ये मिसळून गेला आहे.

अरबी समुद्राकडे सरकत असलेल्या वादळी प्रणालीमुळे आज (ता. २९) उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर दक्षिण कोकण, उर्वरित मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातही जोरदार पावसाचा, तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गुलाब चक्रीवादळाची तीव्रता ओसरत असून, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. दुपारी ही प्रणाली नागपूरपासून दक्षिणेकडे २५० किलोमीटर, तर परभणीपासून उत्तर पूर्वेकडे ६० किलोमीटर अंतरावर होती. रात्री उशिरा ही प्रणाली निवळून ठळक कमी दाब क्षेत्रात रूपांतर होणार आहे. त्यानंतर ही प्रणाली अरबी समुद्रात जाऊन, पुन्हा तीव्र होण्याचे संकेत दिले आहेत.

जोरदार वादळी पाऊस (ऑरेंज अलर्ट) ः पालघर, ठाणे, रायगड, धुळे, नंदुरबार, नाशिक. वादळी पाऊस, (येलो अलर्ट) ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नगर, पुणे, सातारा, औरंगाबाद.  विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) ः कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com