बागलाण तालुक्यातील वादळाने द्राक्ष बागांना मोठा फटका

वादळ वाऱ्याने हजारो एकरांतील द्राक्ष बागांना फटका
वादळ वाऱ्याने हजारो एकरांतील द्राक्ष बागांना फटका

नाशिक : पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादकांचा भाग म्हणून ‘बागलाण’ तालुक्याने फक्त भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळविली आहे. दरवर्षी येथील शेतकरी प्रयोगशीलतेने द्राक्ष उत्पादन घेतात. देशातून सुरू होणारी पहिली द्राक्ष निर्यात याच भागातून सुरू होते. त्यामुळे देशाला मोठे परकीय चलन मिळवून देण्यात या भागाचा व द्राक्ष पिकाचा मोठा वाटा आहे. मात्र, या वर्षी झालेल्या वादळी वाऱ्याने येथील काढणीसाठी आलेल्या द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे. सतत पाऊस सुरू असल्याने माल खराब होऊन प्रतवारी ढासळली आहे. परिणामी, या वर्षी येणारे उत्पादन ५० % घटण्याचा अंदाज असून शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.  

पूर्वहंगामी द्राक्षबागा अडचणीत  राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या वार्षिक वेळापत्रकानुसार द्राक्ष हंगाम ऑक्टोबरपासून सुरू होतो; मात्र बागलाण तालुक्यात प्रमुख्याने पिंगळवाडे, दसाने, भुयाने, करंजाड, आसखेडा, जायखेडा, पारनेर, डोंगरेज, वायगाव, बिजोटे, कोड्बेल, गोराणे, तळवाडे, द्याने, श्रीपूरपाडे आदी गावांमधील शेतकरी प्रयोगशीलतेला कष्टाची जोड देत पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादन घेतात. ज्या वेळी इतर भागांतील द्राक्ष सुरू होतात. त्या वेळी येथील हंगाम संपलेला असतो. तालुक्यामध्ये जवळपास ३ हजार एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. त्यापैकी येथील शेतकऱ्यांनी मागील वर्षी ६९८ हेक्टर क्षेत्रावर हॉर्टनेट प्रणालीमध्ये निर्यातीसाठी नोंदणी केली होती. त्यामुळे मागील वर्षी विक्रमी निर्यात झाल्यानंतर यावर्षी देखील उत्पादन वाढण्याची मोठी शक्यता असताना शनिवारी (ता. ५) पावसाच्या तडाख्यात माल खराब होऊन मोठे नुकसान झाले आहे. शास्रज्ञ व तज्ज्ञ मंडळींपेक्षा या भागातील द्राक्ष उत्पादक काळाच्या पुढे गेले आहेत. मात्र, आता हंगाम आणि त्याचे नियोजन नैसर्गिक संकटामुळे कोलमडले आहे.

सरकारने, विचारात घेतलंच नाही  साहेब, आमच्या द्राक्ष पिकाला विमा नाही, मोठी मेहनत घेऊन आणि त्याचबरोबर बागा तयार करण्यासाठी लाखो रुपये खर्च करतो. मात्र, या लहरी निसर्गामुळे आम्ही अडचणीत सापडलो आहोत. आम्ही विक्रमी उत्पादन घेतो, रोजगार मिळवून देतो, परकीय चलन पण देशात आणतो, मात्र आमच्याकडे सरकार कधीच वेळेवर लक्ष देत नाही. आम्हांला हवामानाचे अंदाज मिळत नाहीत, पंचनामे वेळेवर होत नाहीत. त्यामुळे आम्ही आता कस करायचं? आता तुम्हीच सांगा असा उद्विग्न सवाल येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार जितेंद्र इंगळे यांच्यासमोर उपस्थित केला. कृषी सहायक या ठिकाणी आले मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे त्यांच्याकडे नव्हाती. लोकप्रतिनिधी, तहसीलदार, कृषी विभाग आला अन्‌ पाहणी करून गेला, मात्र नुसत्या भेटीपलीकडे जाऊन आमचा विचार होणार की नाही असा सवाल शेतकऱ्यांनी बोलून दाखवला. कष्ट अन्‌ प्रयोगशीलता झाली मातीमोल  मोसम खोऱ्यातील पिंगळवाडे येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी वेडू जिभाऊ भामरे यांची दोन एकर द्राक्षबाग वादळ वाऱ्याने जमीनदोस्त झाली. याअगोदर तीनदा आणि आता चौथ्या वेळेस त्यांच्या बागेत पाणी साचून राहिल्याने द्राक्ष बाग जमीनदोस्त झाली. त्यामुळे भामरे यांचे २५  ते ३०  टन द्राक्षाचे नुकसान होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गट नं. २४३ मध्ये क्लोन २ या जातीच्या द्राक्षांची त्यांनी लागवड केली होती.  

जूनमध्ये गोड्या छाटणी केलेले प्लॉट काढणीसाठी तयार झाले. मात्र, पावसामुळे द्राक्ष मण्यांना तडे जाणे, बुरशीमुळे घड खराब होणे हे प्रमुख नुकसान आहे. त्यामुळे उत्पादन घटण्यासह मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर सुद्धा बागांमध्ये पाणी असल्याने मशागती, फवारण्या करताना अडचणी येत आहेत.  - खंडेराव शेवाळे, प्रयोगशील द्राक्ष उत्पादक शेतकरी, भूयाने, ता. बागलाण

पावसामुळे आत्तापर्यंत तीन वेळेस बाग पडली. आत्ता परत एकदा माझ्यावर वेळ आली आहे, काय करणार? मात्र मी अन्‌ माझे घरचे सदस्य खचलेलो नाहीत. सरकार आमच्याकडे कधीच पाहत नाही, आम्हाला कुठलीही मदत नाही, विमा नाही. पण पुन्हा कष्ट करू अन्‌ जिद्दीने उभे राहू. - वेडू जिभाऊ भामरे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, पिंगळवाडे, ता. बागलाण

द्राक्ष बागांमधील प्रमुख अडचणी 

  •     तयार द्राक्षांच्या घडांना तडे जाणे
  •     बुरशीचा प्रादुर्भाव वाढल्याने घडांची प्रतवारी ढासळत आहे.
  •     पावसाच्या तडाख्यात द्राक्ष घड खराब झाल्याने उत्पादकतेत घट
  •     पोंगा अवस्थेतील घड जिरण्याची समस्या वाढली.
  •     फुलोरा अवस्थेतील घडांची कुज 
  •     वेलींच्या मुळ्या काम करत नाहीत, त्यामुळे मण्यांची वाढ थांबली आहे.
  •  बागेत पाणी साचून असल्याने औषधे फवारणी करताना अडचणी.
  • बागलाण तालुक्यातील द्राक्ष बागांची स्थिती 

  •     तालुक्यातील एकूण द्राक्ष लागवड : ३ हजार एकरच्या पुढे
  •     मागील वर्षी निर्यातक्षम बागांची कृषी विभागाकडे नोंदणी : ६९८ हेक्टर
  •     एकरी सरासरी मिळणारे उत्पादन : १० ते १२ टन
  •     सध्या मिळत असलेला बाजारभाव : ८० ते १०० रुपये प्रतिकिलो
  •     लागवड केलेले द्राक्ष वाण : एसएसएन, सुपर सोनाका, क्लोन २, शरद सीडलेस
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com