पुणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार सरी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, मावळ, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या तालुक्यांमध्ये शनिवारी (ता. ५) दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी बसरल्या. फुलोऱ्यात आलेल्या भात पिकासाठी रब्बी परेण्यांसाठी हा पाऊस लाभदायक ठरणार आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यांत झालेल्या वादळी पावसाने कांदा रोपे, सोयबीन, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. काढणीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना पावसाने दणका दिल्याने नुकसान वाढणार आहे. 

जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात सलग दोन दिवस झालेल्या पावसाने शेतीमालाचे नुकसान झाले. उगवून आलेली कांदा रोपे या मुसळधार पावसाने वाया जाणार असून, लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. सोयाबीनच्या उत्पादनातही मोठी घट होणार आहे. कारण, पावसाचे पाणी शेतात साठून सोयाबीन सडू लागले आहेत. काकडी, मिरची, कोबी, फ्लॉवर, मेथी, कोंथिबीर, झेंडू, शेवंती व इतर फुले यांचेही मोठे नुकसान झाले आहे. काही भागांत वादळी वाऱ्यात झाडे पडून काही काळ वाहतूक विस्कळित झाल्याच्या घटना घडल्या आहेत.मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक परिसराला विजेचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह आलेल्या पावसाने चांगलेच झोडपले. कामावरून घरी परतणाऱ्या कामगारांची आणि रानात गुरे चारणाऱ्या गुराख्यांची मोठी तारांबळ उडाली.

दिवसभर वातावरणात गारवा होता. सायंकाळी साडेचारच्या सुमारास विजेच्या कडकडाटात पावसाला जोरात सुरवात झाली. पावसाचा तासभर जोर होता. कामशेत शहर व परिसरात शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास विजेचा कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. सुमारे पाऊण तास झालेल्या पावसामुळे रस्त्यावर तसेच शेतात पाणीच पाणी झाले. सध्या भाताचे पीक हे ओंब्या बाहेर पडण्याच्या स्थितीत आहे. भातासाठी तसेच उसाला हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. शुक्रवारी (ता. ४) हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबा येथे दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास वीज कोसळून शिवाजी विलास टकले यांच्या दोन बकऱ्या आणि अकरा शेळ्या ठार झाल्या.    रविवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटर) (स्रोत - महसूल विभाग)  : घोटावडे १४, माले ३१, आंबवडे ११, वडगाव मावळ ३०, जुन्नर ११, बेल्हे ६१, राजूर १०, आपटाळे ३५, ओतूर १०, घोडेगाव २०, आंबेगाव (डिंभे) १७, शिरूर १०, बारामती ३५, माळेगाव ४७, पणदरे ४०, वडगाव ३५, लोणी भापकर ३५, मोरगाव १०, अंथुर्णे २५, रावणगाव ११, सासवड १५, परिंचे १३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com