सोलापुरात वादळी पावसाचा द्राक्ष, कांदा पिकाला दणका

सोलापूर ः ‘कोरोना’ विषाणूचे संकट डोक्यावर घोंघावत असताना सोलापूर जिल्ह्यात शनिवारी (ता. १८) वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतीपिकांना मोठा फटका बसला. या पावसाने अनेक ठिकाणी बाजारात नेण्यासाठी काढून ठेवलेला कांदा शिवारातच भिजला. तर वाऱ्याच्या वेगाने अनेक ठिकाणी काढणीस आलेल्या द्राक्ष आणि केळीबागा भूईसपाट झाल्या. जिल्ह्यातील मोहोळ, उत्तर सोलापूर, करमाळा या तालुक्यात पावसाचा सर्वाधिक फटका बसला.
Stormy rain hit grapes, onion crop in Solapur

‘कोरोना’मुळे बाजार समित्या आधीच बंद असल्याने शेतकऱ्यांना शेतमाल बाजारात पाठवणे अवघड झाले असताना, वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसाने नव्या संकटाची भर टाकली आहे. गेल्या आठवड्यात दोनवेळा पाऊस झाला. आता पुन्हा एकदा त्याने हजेरी लावली. शनिवारी (ता. १८) वातावरणात एकदम बदल झाला होता. दिवसभर कडाक्याचे ऊन आणि प्रचंड उकाडाही वाढला होता. सायंकाळी पाचच्या सुमारास आणि रात्री उशीरा अनेक भागांत पावसाने कहरच केला. 

सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. बाजारपेठा बंद असल्याने शिवारात काढून ठेवलेला अनेक शेतकऱ्यांचा कांदा भिजला. तर काढणीस आलेले द्राक्ष, बेदाण्यासाठी शेडवर टाकलेले द्राक्ष भिजली. लिंबू, खरबूज, कलिंगड, आंबा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. विशेषतः मोहोळ तालुक्यातील पापरी, यावली, खंडाळी, पेनूर परिसर, उत्तर सोलापुरातील मार्डी, नान्नज, कारंबा, सेवालाल नगर, माढ्यातील कुर्डु, लऊळ, करमाळ्यातील पांडे, पंढरपुरातील तुंगत, देगाव या परिसराला पावसाने चांगलेच झोडपले. 

पापरीतील रविराज भोसले यांची दीडएकर द्राक्षबाग यामध्ये भूईसपाट झाली. तसेच याच भागातील सोमनाथ घागरे यांच्या केळी बागेचे नुकसान झाले. ही पूर्णपणे उन्मळून पडली. करमाळा, माढ्यातही असेच प्रकार झाले. काही घरावरील पत्रे उडून गेले. तर वीजेचे खांबही पडले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com