लोहाऱ्यात वादळी पाऊस

लोहारा, जि. उस्मानाबाद : शहरासह तालुक्यातील अनेक भागात बुधवारी (ता. ५) दुपारी सव्वादोनच्या सुमारास मेघगर्जनेसह सुमारे पाऊणतास जोरदार वादळी पाऊस झाला. यावेळी तीन ठिकाणी वीज कोसळून तीन जनावरे दगावली.
Stormy rain in the Lohara
Stormy rain in the Lohara

लोहारा, जि. उस्मानाबाद : शहरासह तालुक्यातील अनेक भागात बुधवारी (ता. ५) दुपारी सव्वादोनच्या सुमारास मेघगर्जनेसह सुमारे पाऊणतास जोरदार वादळी पाऊस झाला. यावेळी तीन ठिकाणी वीज कोसळून तीन जनावरे दगावली. 

मागील पंधरा दिवसांपासून तालुक्यातील वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. दररोज दुपारपर्यंत उन्हाची तीव्रता अधिक असते. मात्र त्यानंतर सायंकाळच्या सुमारास आभाळ भरून वादळी वारे सुटते. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. २५ एप्रिलला जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे पावसाळ्यासारखी स्थिती आहे. बुधवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास अचानक पावसास सुरवात झाली. त्यानंतर पावसाचा वेग वाढत गेला.

मेघगर्जनेसह पाऊणतास वादळी पाऊस झाला.  दरम्यान, तालुक्यातील जेवळी येथील बसस्थानक परिसरात झाडाखाली बांधलेल्या खोंडावर वीज कोसळली. त्यामुळे ते जागीच ठार झाले. जेवळी पूर्वतांडा येथील शेतात झाडाखाली बांधलेली म्हैस, तर भोसगा येथील शेतात वीज कोसळल्याने गाय जागीच ठार झाली. तालुक्यातील मार्डी, कास्ती, नागराळ, बेंडकाळ, माकणी, धानुरी,  जेवळी, वडगाव, आष्टाकासार, कानेगाव, मोघा, हिप्परगा (रवा), माळेगाव, लोहारा, (खुर्द), उंडरगाव आदी भागात पाऊस झाल्याचे वृत्त आहे. 

पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. बस्थानका जवळील परिसराला तलावाचे स्वरूप आले होते. अनेक ठिकाणच्या रस्त्यावरून पाणी वाहते झाले. या वादळी पावसाचा फळबागांसह काढून ठेवलेल्या कडब्याच्या गंजीचे नुकसान झाले. सध्या आंबे उतरण्यास सुरवात केली असतानाच वादळी पाऊस झाल्याने कैऱ्या गळून पडल्या. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

जेवळी परिसरात गेल्या चार, पाच दिवसांपासून अधून मधून वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. बुधवारी (ता.५) दुपारी मात्र प्रचंड मेघगर्जनेसह अर्धा तास जोरदार पाऊस झाला.  

फळे, पिकांचे नुकसान

जेवळी येथे बस स्थानक परिसरात भर वस्तीत झाडाखाली बांधण्यात आलेली भास्कर दुधभाते यांचे खोंड, जेवळी पूर्व तांडा येथील बाबू जाधव यांची शेतात झाडाखाली बांधलेली मुरा जातीची म्हैस, तर भोसगा येथील लक्ष्मण जळकोटे यांच्या शेतात झाडाखाली बांधलेली गाय वीज पडून ठार झाली आहे, अशी माहिती जेवळी येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. हणमंत जगताप यांनी दिली. या वेळी पावसाबरोबरच मोठ्या प्रमाणात मेघगर्जना झाली. या पावसाने परिसरात फळपिकांचे नुकसान झाले. गावातील रस्त्यावरून काही प्रमाणात पाणी वाहिले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com