गोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांची

गोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांची
गोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांची

नरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी सोशल मीडियावर स्वार होत. त्याचा निवडणुकीच्या धुमाळीत बिनचूक वापर करून विरोधकांना नामोहरम करत त्यांनी सत्ता मिळवली. तथापि, २०१९ च्या निवडणुकीपर्यंत विरोधकांनीही हे अस्त्र अवगत केल्यानं आता पुढं काय? हा प्रश्‍न आहेच.

भ्रष्टाचारी काँग्रेसची दहा वर्षांची सत्ता उलथवून टाकायला छप्पन्न महिन्यांपूर्वी, २०१३ मधल्या सप्टेंबरच्या अखेरीस दिल्लीत झालेलं नरेंद्र मोदींचं देवदुर्लभ स्वागत अनेकांना आठवत असेल. ते दिल्लीकडे निघाले, विमानतळावर पोचले, स्वागताच्या कमानी, दुतर्फा कार्यकर्त्यांची गर्दी अन्‌ त्यांनी पाहिलं, ते बोलले अन्‌ त्यांनी राजधानी जिंकली जणू. एखाद्या दिग्विजयी सेनापतीच्या थाटात. सेनापतीच ते... पुढे जगातला सर्वांत मोठा राजकीय पक्ष बनलेल्या भारतीय जनता पक्षाचे अन्‌ बहुचर्चित डिजिटल आर्मीचेही.

सिलिकॉन व्हॅलीपासून भारतातल्या छोट्या-मोठ्या आयटी कंपन्यांमधील हजारो तंत्रज्ञांची डिजिटल आर्मी. जोडीला कार्यकर्त्यांची फळी. डॉ. मनमोहनसिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी आदींचे प्रतिमाभंजन, यथेच्छ निंदानालस्ती आणि दुसरीकडे, मोदींच्या महिमामंडनाची सुनियोजित मोहीम सोशल मीडियावर आधीच सुरू झाली होती. नेहरू, गांधी खानदानाचे मूळ वगैरेंपासून धार्मिक दंगलीत होरपळलेल्या गुजरात विकासाच्या मॉडेलचे कर्तेधर्ते, भल्या पहाटे फोनवर पदार्थविज्ञानाच्या शंकांचे निरसन करणारा तज्ज्ञ, केदारनाथवरून हजारो गुजराती भाविकांची सुटका करणारे कुशल प्रशासक. इतकेच कशाला, भारत-चीन युद्धावेळी मेहसाना रेल्वेस्थानकावर जवानांना चहा पाजणारा देशप्रेमी अन्‌ वडनगरच्या शर्मिष्ठा तलावात मगरींना न भीता पोहणाऱ्या शूर बाल नरेंद्रांपर्यंत बरेच काही!

सोशल मीडियाचे ब्रह्मास्त्र घेऊन मोदी रणांगणात अवतरले. रोमांचित देश लाटेवर स्वार झाला. युवक भारावले. सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे घेऊन कुणी परमेश्‍वरच अवतरल्याचे चित्र निर्माण झाले. ‘अच्छे दिन’साठी हवा तापली. ‘अब की बार...’ने निवडणुकीच्या वातावरणात भर घातली. पक्षाचा मीडिया सेल, आयटी सेल, कॉल सेंटर्स कार्यान्वित झाले. ट्विटर, फेसबुक ओसंडून वाहिले. तोंडओळख होत असलेल्या व्हॉट्‌सॲपवर पोस्ट्‌सचा माराच. काँग्रेस पुरती भांबावली. सोशल मीडियावर हल्ला कुठून होतो, हेच समजे-उमजेपर्यंत आधी दिल्लीतली आणि नंतर एकामागोमाग एक राज्ये काँग्रेस, संयुक्‍त पुरोगामी आघाडीच्या हातून निसटली. नितीशकुमारांचा संयुक्‍त जनता दल आणि लालूप्रसाद यादवांचा राष्ट्रीय जनता दल यांच्या मदतीनं मिळालेल्या बिहारमधल्या यशाचा थोडा दिलासा. नंतर पंजाब हाती आलं. गोवा, मणिपूरमध्ये इज्जत वाचली, पण पारडं भारी आहे ते भाजपचंच. त्यामागं आहे सोशल मीडियाचा प्रभावी वापर. त्याची शक्‍तिस्थळे आहेत- इतिहास, देशाची वाटचाल, नेते व पक्षांच्या पूर्वेतिहासाचे प्रचंड संशोधन. आकडेवारीचा खेळ. विविध मुद्यांवर भाजपची भूमिका तपशिलाने मांडणाऱ्या वॉररूममधील पोस्ट. त्या तळागाळापर्यंत पोचविणारी सूत्रबद्ध यंत्रणा. व्हॉट्‌सॲपचे हजारो-लाखो ग्रुप, लाखो ट्विटर हॅंडल्स अन्‌ तितकीच फेसबुक पेजेस. त्यावर विरोधकांना नामोहरम करणारा जोरदार प्रचार. ‘पप्पू’ राहुल गांधी हे त्याचं ठळक उदाहरण.

डिजिटल आर्मीचा उलगडा होत गेला. मोदी यांनी आयटी सेलमधल्या निवडक दीडशे लोकांची बैठक घेतली. त्यांपैकी ज्यांना ट्रोल म्हणता येईल असे तेजिंदर बग्गा दिल्लीत पक्षप्रवक्‍ते झाले. आयटी सेलप्रमुख अमित मालवीय राष्ट्रीय प्रवक्ते बनले. दरम्यान, स्वाती चतुर्वेदी यांचं ‘आय एम अ ट्रोल : इनसाइड द सिक्रेट वर्ल्ड ऑफ बीजेपीज्‌ डिजिटल आर्मी’ हे पुस्तक आलं. कुणी अभिषेक मिश्रा छोट्या छोट्या व्हिडिओंमधून भाजपच्या सोशल मीडियातल्या यशाची उकल करत राहतो. भाजपचे नेते किंवा मंत्री जे दावा करतील, त्यातील सत्य तपासणाऱ्या फॅक्‍टचेकर वेबसाइट एकामागोमाग एक सुरू झाल्या. पोस्टकार्ड आणि अन्य वेबसाइटवरून दिल्या जाणाऱ्या बातम्यांची पोलखोल होऊ लागली.

खरंतर म्हणायला हवं, की थॅंक्‍यू मिस्टर प्राइम मिनिस्टर! प्रचाराच्या नव्या आयुधांसह त्यांनी चार वर्षांत बरंच काही दिलं. ५६ इंच छाती, पेड प्रचारक, ट्रोल, भक्‍त, पिद्दी वगैरे शब्द ओठांवर खेळले. लोकप्रियता फॉलोअर्समध्ये मोजली गेली. विरोधक सक्रिय बनले. मध्यरात्रीही सोशल मीडियाचा विचार करू लागले. सगळ्या पक्षांचे आयटी सेल, सोशल मीडिया टीम तयार झाल्या. त्यांचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण झालं. साडेतीन वर्षे वैयक्तिक ट्विटर हॅंडलसाठी राहुल गांधींची हिंमत झाली नाही. मे २०१७ मध्ये काँग्रेसनं कन्नड अभिनेत्री रम्या किंवा दिव्या स्पंदनाला आयटी सेलचं प्रमुख नेमलं. तेव्हा विरोधकांचा रथ सत्ताधाऱ्यांच्या पातळीवर आला. ‘फेकू’ हे ‘पप्पू’ला उत्तर आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं ट्विटरवर चालविलेल्या वीस हॅशटॅगची इम्प्रेशन्स होती ३५ कोटी, तर ताज्या कर्नाटक निवडणुकीत सोळा हॅशटॅग पोचला तब्बल ८७ कोटींपर्यंत. तरीही ट्‌विटरवर ४ कोटी २६ लाख, तर फेसबुकवर ४ कोटी ३० लाख फॉलोअर्स असलेले सेनापती मोदी अजूनही प्रबळ आहेत. अश्‍वमेधाच्या घोड्यांचा लगाम विरोधकांनी धरलाय हे नक्‍की, पण केवळ घोडे रोखून भागत नाही. रणांगणात युद्ध जिंकावं लागतं. प्रतीक्षा आहे, डिजिटल घोडे रोखण्याचं दुःसाहस दाखविणाऱ्यांशी पुढच्या वर्षी होणाऱ्या भाजपच्या प्रत्यक्ष लढाईची. - shrimant.mane@esakal.com  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com