महिला बचत गटाने सुरू केली बियाणे बँक

आमचा आदीवासी भाग. या भागातील लोकांना अनेक अडचणीला तोंड द्यावे लागते. आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी आम्ही महिला बचत गट सुरू केला. दोन वर्षांपासून गटामार्फत विविध पिकांच्या देशी बियाणांचे तसेच जैववैविधतेचे संवर्धन होण्यासाठी बियाणे बॅंक सुरू केली. गटाची व्यापी अजून वाढवणार आहोत. - सकूबाई त्रिंबक धराडे, ७०३८७०३५९२, ९४०४२०६८९९ (अध्यक्ष, कावेरी महिला स्वयंसहाय्यता बचत गट)
बचत गटातील महिला एकत्र बसून कामाचे नियोजन करतात.
बचत गटातील महिला एकत्र बसून कामाचे नियोजन करतात.

पाटीलवाडी (धामणवन) (ता. अकोले, जि. नगर) या आदीवासी भागातील गावात चौदा महिलांनी एकत्र येऊन कावेरी महिला स्वयंसहाय्यता बचत गट स्थापन केला. हा गट भात शेती विकसित करण्याचे काम करतो. बचत गटाने दोन वर्षांपासून विविध पिकांच्या देशी बियाण्यांची बॅंक सुरू केली. बियाणे बॅंकेतून महिलांनी १२० प्रकारच्या बियाणांचे अडीचशेच्यावर शेतकऱ्यांना किफायतशीर दरात वितरण केले आहे.

नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्‍यात बहुतांश गावे आदिवासी बहूल आहेत. सर्वाधिक पाऊस पडणारा तालुका म्हणून अकोल्याची ओळख आहे. या भागात भात हेच मुख्य पीक. येथील आदिवासीचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासन तसेच विविध समाजिक संस्था काम करतात. संगमनेर येथील लोकपंचायत ही सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून या भागात दिवासीसाठी काम करत आहे. त्यांच्या पुढाकारातून पाटीलवाडी (धामणवन) येथील चौदा आदिवासी महिलांनी तीन वर्षांपूर्वी कावेरी महिला स्वयंसहाय्यता बचत गट सुरू केला. या गटामध्ये सखुबाई धराडे (अध्यक्ष), शशिकला धिंदळे (सचीव), कमल धिंदळे, उषा धिंदळे, ललिता धिंदळे, गंगुबाई धिंदळे, सीताबाई करवंदे, रुक्मिणी धराडे, कांता धराडे, सुगंधा करवंदे, सुरेखा धिंदळे, उषा धराडे, कविता भांगरे, सविता धिंदळे यांचा समावेश आहे. या महिला दर महिन्याला १०० रुपये बचत करतात. सध्या गटाकडे सुमारे पन्नास हजार रकमेची बचत झाली आहे.

अकोले तालुक्‍याच्या आदिवासी पट्ट्यात फारशी उत्पन्नाची साधने नाहीत. भातशेती व्यतिरिक्त अन्य पिकांची फारशी लागवड होत नाही. त्यामुळे या भागातील महिला, पुरुष नगर व पुणे, नाशिक जिल्ह्यांत मजुरीसाठी जातात. काही मजूर त्या भागातच बटाईने शेती करतात. या परिस्थितीवर मात करण्यासाठी पाटीलवाडी (धामणवन) येथील महिलांनी बचत गट सुरू केला. गटाचा या महिलांना चांगला आधार मिळू लागला आहे. आता येथील शेतकरी पैश्‍यासाठी जमीन गहाण ठेवत नाहीत. कृषी विभागाकडूनही गटाला विविध योजनांचा लाभ दिला जात आहे, अशी माहिती आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक बाळनाथ सोनवणे यांनी दिली.

देशी जातींची बियाणे बॅंक   अकोले आणि त्याला जोडून असलेल्या ठाणे, नाशिक, पुणे जिल्ह्यांत पावसाचे जास्त प्रमाण असलेल्या डोंगरपट्ट्यात खरिपात भात हे महत्त्वाचे पीक. रानभाज्या आणि रब्बीत अन्य पिकांकडेही आता कल वाढू लागला आहे. मात्र अलीकडच्या काळात भातांसह अन्य पिकांच्या देशी जातींची लागवड कमी होऊ लागली आहे. हे लक्षात घेऊन पाटीलवाडीच्या महिलांनी बचत गट स्थापन करीत लोकपंचायत संस्थेच्या सारंग पांडे यांच्या पुढाकारातून देशी बियाणांच्या संवर्धनासाठी ‘बियाणे बॅंक' सुरू केली. आता या बॅंकेने नावलाैकिक मिळवला आहे.  गटातील महिला दीडपट परतीच्या अटीवर परिसरातील शेतकऱ्यांना बियाणे देतात. उत्पादनानंतर परत आलेले बियाणे योग्य असल्याची खात्री करून आवश्‍यकतेनुसार साठवण केली जाते. भाताच्या बियाणांत काही त्रुटी आढळल्या तर ते बियाणे न ठेवता तांदूळकरून विक्री केली जाते. त्यातूनही महिलांची आर्थिक मिळकत वाढते आहे. आतापर्यंत दीडशेच्यावर शेतकऱ्यांना बियाणे वाटप केले आहे. या महिला गटाचा राजूर येथे आदिवासी विभागामार्फत होणाऱ्या डांगी पशु प्रदर्शनात उत्कृष्ट महिला गट म्हणूनही गौरव झाला आहे, अशी माहिती आत्माचे जिल्हा कार्यालयातील समन्वयक प्रवीण गोरे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी दिली.

महिलांनी सुरू केलेल्या बियाणे बॅंकेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडीत लोणारे, आत्माचे तत्कालीन प्रकल्प संचालक भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्यासह पुणे, हरियाणा, नगर, जळगाव, बंगलोर, मुंबई, बिहार आदी भागांतील शेतकरी, महिलांनी भेटी दिल्या आहेत.

यंदा तरलाय देशी भात यंदा अकोले तालुक्‍यात पुरेसा पाऊस नाही. भाताचे पीक ऐन बहारात आले असताना पाऊस पडलाच नाही. पहिल्यांदाच असे झाले आहे. त्यामुळे भातशेती करपली आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी भाताच्या देशी जातींची लागवड केली, त्यांची शेती काही प्रमाणात तरली आहे. संकरित जातींपेक्षा देशी जाती पाऊस नसला तरी बऱ्यापैकी जगतो. काही प्रमाणात उत्पादन मिळते. महिला बचत गटाने देशी जातींची बियाणे बॅंक केल्यामुळे परिसरातील शेतकरी या जातीची लागवड करत आहेत, अशी माहिती दगडू धिंगळे यांनी दिली.

 बॅंकेतील देशी जातीचे बियाणे     भात ः काळभात, टायचन भात, इंद्रायणी, आंबेमोहर, ढवूळ, तामकुडाई, वरगळ, खडक्‍या, रायभोग, कोळपी.    नाचणी ः मुटकी, फरंगाडी, शितोळी.    गहू ः कल्याण सोना, बक्षी, बोटका.    भुईमूग ः कुंड्या, घुंगऱ्या, लाल्या, एरंड्या.    वाटाणा ः काळा, हिरवा, ढवळा.    उडीद ः उडदया, उडीद.    ज्वारी ः  उतावळी ज्वारी.    चवळी ः पांढरी व लाल.    वाल ः कडूवाल, गोडवाल, काळावाल.     घेवडा ः श्रावणी, पेरवेल, पतडा, आबई, काळाघेवडा, वाडवल, गुडघ्या.    औषधी वनस्पती ः कोंबडकंद, अमरकंद, अर्जुन सादडा, रगत रेहडा, सतापा, बाळ हिरडा, बेहडा, गावरान तुळस.

     याचबरोबरीने हावरी (तीळ), पपई, मोहरी, सूर्यफुल, मिरची, कारले, चंदन बटवा, दोडका, डांगर,काकडी, बळुक, भेंडी, गोरानी गवार, कोंबडीभाजी, तेरा भाजी, कुरडूभाजी, बडदा, धापा, फांदीची भाजी, भोकरभाजी, काटेरी वांगी, घोसाळे, खुरासणी, वरई, राळा, भादुली, हरभरा, मसूर, हुलगे यांचेदेखील बियाणे उपलब्ध आहे.

बचतगटाची वैशिष्ट्ये 

  • आठ दिवसांसाठी गटातील एका महिलेवर बियाणे बॅंकेची जबाबदारी.
  • शेतकऱ्याने बियाणे नेल्याची तसेच अन्य बाबींची वहीमध्ये नोंद.
  •  बियाणे बॅंकेमार्फत परिसरातील पाचनई, आंबीत, शिरपुंजे, कुमशेत, शेलविहीरे, देवगाव आदीसह अन्य भागातील शेतकऱ्यांना बियाणे दिले आहे. याचबरोबरीने गटातील दहा महिलांनी बीज संवर्धनासाठी प्रत्येकी दहा गुंठ्यावर काळभाताची लागवड केली आहे.
  •  महिलांनी गटामार्फत आर्थिक बचत केल्याने आणि त्यातून कर्ज मिळू लागल्याने आर्थिक बळकटी आली. त्यांची मुले आता गावातील शाळेत शिकतात. या गावातील तीन जण पदवीधर झाले आहेत.
  • बियाणे बॅंकेसाठी पाटीलवाडीत एक खोली उपलब्ध. त्यांचे मासिक भाडे लोकपंचायत देते.
  •  गटातर्फे तांदळाची जिल्हा परिषदेच्या प्रदर्शनात विक्री.
  •  कृषी विभागाकडून या महिला बचतगटाला तेलबियांपासून तेल काढण्याचे यंत्र, तसेच तांदूळनिर्मिती यंत्राच्या खेरदीसाठी पन्नास हजारांचा फिरता निधी देण्यात येणार आहे.
  • देशी जातींचे बियाणे मिळाले

    आमच्या भागातील शेतकऱ्यांना पिकांच्या देशी जातींची लागवड करायची असेल तर आधी बियाणे शोधावे लागत होते; पण आता महिलांनी सुरू केलेले बियाणे बॅंकेमुळे सोय झाली आहे. देशी जातींचे संवर्धन होतेय, त्यातून महिलांना आर्थिक फायदा होत आहे.   - दगडू धिंदळे, शेतकरी, पाटीलवाडी  

    बचतगटासाठी विविध योजना पाटीलवाडी येथील महिला बचत गटाचे काम चांगले आहे. त्यांना कृषी विभागाकडून पाठबळ दिले जात आहे. गटाच्या विकासासाठी आम्ही पीक प्रात्यक्षिके केली. आता नवीन योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. - पंडित लोणारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नगर

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com