प्री कुलिंग, रिफर व्हॅनद्वारे स्ट्रॅाबेरी पोचली देशभरात

Strawberries are shipped to different cities of country via Reefer vans
Strawberries are shipped to different cities of country via Reefer vans

महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी देशभरात प्रसिद्ध आहे. या स्ट्रॉबेरीची टिकवणक्षमता वाढवण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी संघाच्या माध्यमातून ‘प्री कुलिंग’ व रीफर व्हॅन यांची यंत्रणा उभारली आहे. त्याद्वारे विविध राज्यांत स्ट्रॉबेरी पाठवणे शक्य होऊ लागले आहे. त्यातून स्ट्रॉबेरीला चांगला दर व बाजारपेठा मिळवणे शक्य झाले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील (जि. सातारा) स्ट्रॉबेरीचा गोडवा सर्वांनाच भुरळ पाडणारा आहे. या स्ट्रॉबेरीला देशभरातून सर्वाधिक मागणी असते. तालुक्यात या हंगामात सुमारे अडीच ते तीन हजार एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड आहे. तर जावली, पाटण, वाई, कोरेगाव, सातारा तालुक्यांत सुमारे एक हजार ते १२०० एकर क्षेत्रांवर लागवड झाली आहे. हंगाम सुरू झाला की सुरुवातीच्या काळात कमी उत्पादन उपलब्ध होत असले तरी ताज्या स्ट्रॅाबेरीचे आकर्षण राहते. सुरुवातीच्या काळात स्थानिक बाजारपेठेत चांगली मागणी राहात असल्याने चांगला दरही मिळतो. उत्पादनात वाढ जास्त होईल तसतसा दरही कमी होत जातो. टिकवणक्षमतेचा विचार

  • कोणतेही फळ तसे नाशवंतच असते. त्याचा टिकवणकाळ वाढवणे गरजेचे असते. नेहमीच्या पद्धतीत स्ट्रॉबेरी तोडली की लगेच कोरूगेटेड बॅाक्स व पनेटमध्ये पॅकिंग करून बाजारपेठेत पाठवली जायची. ती साधारण दीड ते दोन दिवस टिकायची. त्यामुळे दूरवरच्या बाजारपेठांपर्यंत पोचण्यात अडचणी येत होत्या. यात एकाचवेळी स्ट्रॅाबेरी बाजारात येत असल्यामुळे दरही नियंत्रणात राहात नव्हते. साहजिकच ती आहे त्या दरात विकण्याशिवाय पर्याय नव्हता. ही समस्या दूर करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी तालुक्यातील शेतकरी व संघांनी प्री कुलिंग व रेफर व्हॅन्स यांचा आधार घेण्यास सुरुवात केली.
  • अशी होते प्रक्रिया

  • काढणीनंतर कोरूगेटेड बॉक्समध्ये पॅक केलेली स्ट्रॉबेरी प्री कुलिंग यंत्रणेत ० ते ४ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत ठेवली जाते.
  • ही प्रक्रिया साधारणपणे दोन ते चार तास होते.
  • प्री कुलिंगमध्ये बॉक्स व फळातील उष्ण हवा बाहेर काढली जाते. फळांचा तजेलदारपणा टिकून राहतो.
  • त्याद्वारे स्ट्रॉबेरीची टिकवणक्षमता दुप्पट म्हणजे चार दिवसांपर्यंत मिळते.
  • २५० ग्रॅम पनेट पॅकिंग करून स्ट्रॅाबेरी रीफर व्हॅनमध्ये दोन अंश सेल्सिअस तापमानात कोलकता, जयपूर, चेन्नई, दिल्ली, बंगळूर, अहमदाबाद, हैदराबाद, सुरत, आदी दूरवरच्या बाजारपेठांमध्ये पाठवणे शक्य झाले आहे.
  • प्रति किलो प्री कुलिंग व वाहतुकीसाठी मिळून २० रुपये खर्च होतो. हा खर्च वाढला असला तरी फळाचा टिकाऊपणा वाढल्याने त्यास अधिक बाजारपेठ मिळवणे शक्य झाले. परदेशातही काही प्रमाणात निर्यात करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
  • अशी आहेत प्रक्रिया केंद्रे

  • महाबळेश्वर तालुक्यात प्रतिदिन आठ ते दहा टन स्ट्रॉबेरीवर प्रक्रिया होऊन ती बाजारपेठेमध्ये पाठवली जात आहे.
  • सध्या भिलार येथील श्रीराम फळप्रक्रिया सहकारी संस्थेची प्रत्येकी पाच व १० टन क्षमतेची दोन प्री कुलिंग युनिट्स आहेत. त्यांनी दोन रीफर व्हॅन्स भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत.
  • महाबळेश्वर सहकारी फळे, फुले, भाजीपाला खरेदी विक्री संघाची तीन प्री कुलिंग यंत्रणा आहेत.
  • संघाचे अध्यक्ष किसनशेठ भिलारे यांचे वैयक्तिक प्री कुलिंग युनिट आहे.
  • एकूण हंगामापैकी १५ ते २० टक्के उत्पादन प्री कुलिंग करून रिफर व्हॅनद्वारे अन्य राज्यात पाठविण्यात येत असावे.
  • चार व सहा टन अशी रीफर व्हॅन्सची क्षमता आहे.
  • या तंत्रज्ञानाचे झालेले फायदे

  • भिलारे व पार्टे सांगतात, की काढणीनंतर स्ट्रॉबेरीची टिकवणक्षमता ४० तासांची असते. प्री कुलिंग व रीफर व्हॅनच्या आधारामुळे ती १०० तासांवर नेणे शक्य झाले आहे. या तंत्रामुळे अनेक कंपन्या या भागात येऊन स्ट्रॉबेरी खरेदी करू लागल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मार्केटपर्यंत जाण्याची गरज उरलेली नाही.
  • कमी टिकवणक्षमतेमुळे पूर्वी स्ट्रॉबेरीचे होणारे नुकसान आता टळू लागले आहे. अनेक कंपन्यांना मालाची उपलब्धता समजू लागली. त्यानुसार खरेदीचे नियोजन करता येऊ लागले.
  • प्रतिक्रिया- फळे साठवणूक तंत्रज्ञानाचा आम्ही अत्यंत बारकाईने व शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करतो आहोत. जागतिक बॅंक पुरस्कृत केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत कर्ज घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचे कोल्ड स्टोरेज उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या दोन रेफर व्हॅन भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. - गणपत पार्टे - ९४२३०३३८०९ (अध्यक्ष श्रीराम फळप्रक्रिया सहकारी संस्था, भिलार.) काढणीनंतर स्ट्रॉबेरी अधिक टिकविण्याच्या उद्देशाने आम्ही प्री कुलिंग यंत्रणेची युनिट्स उभी केली आहेत. यातून दैनंदिन चार टन प्री कुलिंग केले जाते. अगदी दूरवरच्या बाजारपेठेतील ग्राहकांपर्यंत ताजी व दर्जेदार स्ट्रॉबेरी पोचवणे त्यामुळे शक्य झाले आहे. - किसनशेठ भिलारे- ९४२२०३८४७४ (अध्यक्ष, महाबळेश्वर सहकारी फळे, फुले, भाजीपाला खरेदी विक्री संघ, महाबळेश्वर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com