स्ट्रॅाबेरी हंगाम लांबणीवर

कोरोनामुळे जिल्ह्यात स्ट्रॉबेरीची मातृरोपे परदेशातून येण्यास विलंब झाला. त्यामुळे रोपे निर्मितीस झालेला उशीर व लागवडीच्या काळात पावसाच्या थैमानामुळे लागवडीसही उशीर झाला.
strawberry
strawberry

सातारा ः कोरोनामुळे जिल्ह्यात स्ट्रॉबेरीची मातृरोपे परदेशातून येण्यास विलंब झाला. त्यामुळे रोपे निर्मितीस झालेला उशीर व लागवडीच्या काळात पावसाच्या थैमानामुळे लागवडीसही उशीर झाला. परिणामी, स्ट्रॉबेरीचा हंगाम पुढे जाणार असल्याने यंदाची दिवाळी स्ट्रॉबेरीविना साजरी करण्याची वेळ आली आहे. याचा स्ट्रॅाबेरीच्या अर्थकारणास मोठा फटका बसणार आहे.  राज्यात महाबळेश्‍वर तालुक्‍यातील पोषक हवामानामुळे येथील स्ट्रॉबेरीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. स्ट्रॉबेरी लागवडीसाठी परदेशातून मातृरोपे आणली जातात. ग्रीन हाउसमध्ये या मातृरोपांद्वारे शेतात लागवडीसाठीच्या रोपांची निर्मिती केली जाते. साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात मातृरोपे येतात. यानंतर तीन महिन्यांत स्ट्रॉबेरीचे रनर तयार होऊन रोपे तयार होतात. सप्टेंबर पहिल्या आठवड्यापासून लागवडीस प्रारंभ होतो. मात्र हा हंगाम सुरुवातीपासून अडचणीचा झाला आहे.  स्ट्रॅाबेरीची मातृरोपे सर्वाधिक अमेरिका व इटलीतून येतात. मात्र याच देशात कोरोनाने थैमान घातल्याने रोपे येण्यास तब्बल एक महिना उशिरा झाला. जूनमध्ये येणारी मातृरोपे जुलैमध्ये आली. त्यानंतर रोपेनिर्मिती करण्यात आली. सप्टेंबरमध्ये होणारी लागवड ऑक्टोबर महिन्यात झाली. या लागवडीच्या काळात महाबळेश्‍वर तालुक्‍यात परतीच्या पावसाने झोडपून काढले. यामुळे लागवड रखडण्याबरोबर लागवड केलेली रोपे खराब झाली. यामुळे साधारणपणे एक महिना जास्त काळ लागवड पुढे गेलेली आहे. लागवडीनंतर साधारणपणे ५५ ते ६० दिवसांनंतर स्ट्रॉबेरीचा बहर सुरू होण्यास सुरुवात होते. या वर्षी दिवाळी सणापर्यंत लागवडच सुरू असल्याने दिवाळीत स्ट्रॉबेरी उपलब्ध होणार नाही. याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. कोरोना बाधितांची संख्या घटत असल्याने दिवाळीच्या सुट्टीत पर्यटक महाबळेश्‍वर, पाचगणी फिरण्यासाठी येण्याची शक्यता आहे. मात्र या काळात स्ट्रॅाबेरी नसल्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडण्याबरोबरच पर्यटकांची निराशा होणार आहे. 

दुसऱ्या लाटेची धास्ती कोरोनामुळे मातृरोपे निम्मीच आली आहेत. एकट्या महाबळेश्‍वर तालुक्यात अडीच ते तीन हजार एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड होते. यंदा ती १५०० ते २००० एकर झाल्याचा अंदाज आहे. लागवड पुढे गेल्याने दिवाळीचा हंगाम वाया गेला आहे. साधारणपणे डिसेंबर ते जानेवारी महिन्यांत हंगाम सुरू होणार आहे. या काळात कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या बातम्या सुरू झाल्या आहेत. या लाटेची धास्ती स्ट्रॅाबेरी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये बसली आहे. दुदैवाने ही लाट आलीच तर स्ट्रॅाबेरी फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ शकते. तसे झाल्यास शेतकऱ्यांच्या कर्जाचा बोजा वाढणार आहे.

प्रतिक्रिया स्ट्रॅाबेरीच्या हंगामाच्या सुरुवातीपासून अडचणी सुरू झाल्या आहेत. मातृरोपे उशिरा आल्याने लागवड उशिरा झाली. त्यामुळे दिवाळीचा सण हातातून गेला आहे. हंगाम सुरू झाल्यावर कोरोनाची दुसरी लाट आली, तर स्ट्रॅाबेरीस ग्राहक मिळणे कठीण होणार असल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडणार आहे. - किसनराव भिलारे, अध्यक्ष महाबळेश्‍वर सहकारी फळे,  फुले, भाजीपाला खरेदी विक्री संघ, महाबळेश्‍वर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com