स्ट्रॅाबेरीला २.६६ लाखांपर्यंत विमा संरक्षण 

नैसर्गिक संकटात सतत सापडणाऱ्या स्ट्रॅाबेरी उत्पादक शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलासा दिला आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेत महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॅाबेरीचा समावेश करण्यात आला आहे.
strawberry
strawberry

साताराः नैसर्गिक संकटात सतत सापडणाऱ्या स्ट्रॅाबेरी उत्पादक शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलासा दिला आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेत महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॅाबेरीचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दोन लाख ६६ हजारांपर्यंत विमा संरक्षण देण्यात आले आहे. या निर्णयामुळे स्ट्रॅाबेरी पिकांतील अस्थिरता कमी होणार असून काही प्रमाणात का होईना शाश्वतता येणार आहे. राज्यात सर्वाधिक सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॅाबेरीचे पीक घेतले जाते. येथील स्ट्रॅाबेरीची चव चांगली असल्याने देशभरातून मागणी असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे स्ट्रॅाबेरी उत्पादक शेतकरी अडचणीत येत आहेत. मागील हंगामात लागवडीपूर्वी व लागवडीनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर कमी जास्त थंडी, वन्यप्राणी व हंगामाच्या अंतिम टप्प्यात कोरोनाचा आगमन यामुळे स्ट्रॅाबेरी हंगाम जवळपास वाया गेला होता. स्ट्रॅाबेरीचे मदरप्लांट हे परदेशातून येत असल्याने या पिकांस इतर पिकांच्या तुलनेत जवळपास दुप्पट भांडवल खर्च होते. त्यातच स्ट्रॅाबेरीचे आयुष्यमान कमी असल्याने वेळेत विक्री करणे गरजेचे असते. त्यातच इतर संकटे आली की शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडून कर्जबाजारीपणा वाढतो. यासाठी शेतकऱ्यांकडून स्ट्रॅाबेरीचा फळपीक विमा योजनेत सहभागी करण्याची मागणी केली जात होती.  दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाबळेश्वर येथील राजभवनात आले असताना स्ट्रॅाबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी भेट घेतली होती. या शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी स्ट्रॅाबेरी पिकांबाबतच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. या वेळी मुख्यमंत्र्यांनी स्ट्रॅाबेरीचा प्रस्ताव सादर करण्याच्या कृषी विभागास सूचना केल्या होत्या. या सूचनेनुसार कृषी विभागाने पाठविलेल्या प्रस्तावास मान्यता दिल्याने महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॅाबेरी पिकांचा समावेश करण्यात आला आहे.  या योजनेत कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येणार असून विमा उतारवयाचा आहे, त्या शेताचा सातबारा, खातेउतारा, राष्ट्रीयकृत अथवा जिल्हा बँकेत खाते आहे त्या ठिकाणी हप्ता भरावयाचा आहे. तसेच सुविधा केंद्र, विमा कंपनीच्या संकेत स्थळावरून विमा हप्ता भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी साहाय्यक, मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे.

असे मिळणार संरक्षण या निर्णयामुळे स्ट्रॅाबेरी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून स्ट्रॅाबेरी पिकातील धोके कमी होण्यास मदत होणार आहे. या योजनेत स्ट्रॅाबेरी पिकांस हेक्टरी दोन लाख ६६ हजारांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. यामध्ये कमी तापमान होणे, आर्द्रता कमी होणे, अवेळी पावसाने नुकसान झाल्यास हेक्टरी दोन लाख तर जानेवारी ते एप्रिल यामध्ये गारपिटीने स्ट्रॅाबेरीचे नुकसान झाल्यास ६६ हजार रुपये तसेच या दोन्ही संकटाने नुकसान झाल्यास हेक्टरी दोन लाख ६६ हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. शेतकऱ्यांचा विमा हिस्सा म्हणून हेक्टरी दहा हजार तर शासनाचा हिस्सा ९६ हजार भरावा लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com