नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ कडकडीत ‘बंद’

नाशिक : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी देशभर वातावरण तापले आहे. मंगळवारी (ता.८) पुकारलेल्या ‘भारत बंद’ला समर्थन देण्यासाठी नाशिक शहरासह ग्रामीण भागात सर्वच घटकांचा प्रतिसाद मिळाला.
 Strictly 'closed' in Nashik district in support of farmers
Strictly 'closed' in Nashik district in support of farmers

नाशिक : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी देशभर वातावरण तापले आहे. मंगळवारी (ता.८) पुकारलेल्या ‘भारत बंद’ला समर्थन देण्यासाठी नाशिक शहरासह ग्रामीण भागात सर्वच घटकांचा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे दुपारपर्यंत सर्व ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आल्याचे  पाहायला मिळाले.

जिल्ह्यात सकाळपासूनच अनेक व्यावसायिकांनी बंदला पाठिंबा देत व्यवहार बंद ठेवले. भाजप सरकारला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, शेतकरी संघटना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, प्रहार संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सीटू कामगार, वाहतूक व वकील संघटनेने शेतकरी आंदोलनास पाठिंबा दिला. जिल्हाभरात कृषी निविष्ठा केंद्रेही बंद राहिली. नाशिक ॲग्रो डिलर्स असोसिएशनचाही बंदला पूर्ण पाठिंबा मिळाला. 

जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्याही बंदमध्ये सहभागी झाल्या. त्यामुळे कुठेही शेतमालाची आवक झाली नाही. कांदा, भाजीपाला व भुसार मालाचे कोट्यवधी रुपयांचे लिलाव ठप्प होते. दररोज मध्यरात्रीपासूनच जिल्हाभरातून मोठ्या संख्येने शेतकरी शेतमाल घेऊन नाशिक बाजार समितीत येतात. मात्र, बंदच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसह व्यापारी, मापारी, आडते, हमाल व मजूर यांनीही बाजार समितीकडे पाठ फिरविली. बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बंदला १००  टक्के प्रतिसाद मिळाल्याचे चित्र होते. 

शहरात व ग्रामीण भागात या कृषी कायद्यांचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. प्रहार शेतकरी संघटनेने पाटोदा (ता. येवला) येथे या आंदोलनात सक्रिय सहभागी होऊन अन्यायकारक कृषी कायद्यांच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या पुतळ्यास बेशरमच्या फुलांचा व चपलांचा हार घालून निषेध केला. केंद्र सरकारविरोधी घोषणाही देण्यात आल्या.

‘स्वाभिमानी’कडून कृषी कायद्यांची होळी 

केंद्र सरकारने केलेले हे नवे कायदे शेतकऱ्यांना उद्योगपतींच्या घशात घालणारे आहेत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे आहेत. त्यामुळे ते रद्द झाले पाहिजेत, अशी मागणी करत स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी चिंचखेड(ता. दिंडोरी) येथे शेतकऱ्यांसमवेत शेतकरी विरोधी कृषी कायद्यांची होळी  केली. या वेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

भाजप पदाधिकाऱ्यांचा अप्रत्यक्ष सहभाग? 

देशभरात भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून कृषी कायद्यांचे समर्थन केले जात आहे. असे असताना भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्यासह सटाणा भाजप तालुकाध्यक्ष संजय भामरे, सुवर्णा जगताप या नेत्यांच्या ताब्यात असलेल्या देवळा, नामपूर, सटाणा व लासलगाव  यांसह जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद राहिल्या. त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांचा बंदमध्ये अप्रत्यक्ष सहभाग असल्याच्या चर्चा आंदोलकांमध्ये रंगल्या.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com