गाळ उपसण्यासाठी गावकऱ्यांचे ‘एकीचे बळ'

गाळ उपसण्यासाठी गावकऱ्यांचे ‘एकीचे बळ'
गाळ उपसण्यासाठी गावकऱ्यांचे ‘एकीचे बळ'

संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी : ‘एकीचे बळ मिळते फळ’ या म्हणीचा प्रत्यय संगमेश्‍वर तालुक्यातील असुर्डे गावात आला. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या मदतीची वाट न पाहता गावातील जॅकवेल, बंधारा आणि तळ्यातील गाळ ग्रामस्थांनी एकत्रित येऊन उपसला. या उपक्रमातून नवा आदर्श ग्रामस्थांनी घालून दिला आहे.

शुक्रवारी (ता. १७) सकाळी ८.३० वाजल्यापासून सर्व ग्रामस्थ एका ठिकाणी जमले. हातात जागृती फलक घेऊन गावातील मुले आणि ढोल-ताशे घेऊन तरुण, तर श्रमदानाचे साहित्य घेऊन ग्रामस्थांनी वाजतगाजत मिरवणूक काढली. सकाळी १० वाजता गावात श्रीफळ वाढवून श्रमदानाला सुरवात झाली. 

संगमेश्‍वर तालुक्यातील मौजे असुर्डे गावात सध्या पाणीटंचाई जाणवत आहे. नळपाणी योजनेसाठी जो बंधारा आहे, त्यात पाण्याची पातळी फारच कमी आहे. परिणामी, पाच-सहा दिवसांनी ग्रामस्थांना पाणी मिळते. गावातील विहिरीही आटल्या आहेत. तळही कोरडे पडू लागले होते. त्यामुळे शिल्लक पाण्याचा योग्य वापर आणि पाणीसाठा वाढविण्यासाठी ग्रामस्थांचे प्रबोधन व्हावे म्हणून मुंबईकर मंडळाने पुढाकार घेतला. 

पाणी फाउंडेशन आणि जलसंधारणातून समृद्ध झालेल्या राळेगणसिद्धी, हिवरे बाजार, पाटोदा, अजनाले या गावांतील व्हिडिओ ग्रामस्थांना दाखविण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांची एकजूट झाली. तळ्यासह विहीर आणि बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी एक दिवस महाश्रमदान करण्याचे निश्‍चित केले. त्यानुसार शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत शेकडो ग्रामस्थांनी यामध्ये सहभाग घेऊन गाळ उपसण्याचे काम केले.

सरबत, स्नेहभोजनाचाही आनंद श्रमदान करताना उन्हाचा त्रास होऊ नये आणि कुणालाही कंटाळा येऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीने ५ हजार, तर ग्रामस्थांनी १५०० रुपयांची देणगी दिली. यातून काम चालू असताना थंड पाण्याचा पुरवठा सुरू होता. मध्यंतरात थंडगार सरबत व इतर पदार्थ दिले जात होते. याशिवाय दुपारी एक तास विश्रांतीच्या सत्रात सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com