पावसाच्या दमदार हजेरीने टंचाई हटली

पावसाच्या दमदार हजेरीने टंचाई हटली
पावसाच्या दमदार हजेरीने टंचाई हटली

पुणे : अखेरच्या टप्प्यात बरसलेला मॉन्सून, मॉन्सूनोत्तर पावसाने लावलेली दमदार हजेरी टंचाईग्रस्त भागाला लाभदायक ठरली. महिनाभरात विभागातील साडेपाचशेहून अधिक टॅंकर बंद करण्यात आले आहेत. पुणे, साताऱ्यातील टंचाई मिटली असून, कोल्हापुरात यंदाही टंचाई भासली नाही. तर सोलापूर आणि सांगलीतही टंचाई कमी झाली आहे. गुरुवारपर्यंत (ता. २४) पुणे विभागातील २४ गावे आणि ६३ वाड्यांना २४ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले.    

यंदा कोकण, घाटमाथ्यावर पावसाने दमदार हजेरी लावल्याने विभागातील सर्वच धरणे ओसंडून वाहिली. पावसाचा जोर अधिक असल्याने नद्यांना अभूतपूर्व महापूर आले. दुसरीकडे मात्र दुष्काळी भागातील टंचाई पावसाळ्यातही वाढतच होती. सोलापूर जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांत टंचाईच्या झळा वाढल्या, तर सांगलीतही टंचाई वाढल्याचे दिसून आले. पुणे, साताऱ्याच्या कोरडवाहू पट्ट्यातही टॅंकरची धावाधाव सुरू होती. महिनाभरापूर्वी २३ सप्टेंबर रोजी विभागातील चार जिल्ह्यांच्या ४९९ गावे ३ हजार १२९ वाड्यांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल ५८३ टॅंकर सुरू होते. 

महिनाभरात झालेल्या दमदार पावसाने दुष्काळी भागात मुसळधार हजेरी लावली. पुण्यातील बारामती, पुरंदर, साताऱ्यातील माण तालुक्यांमध्ये नद्यांना अनेक वर्षांनी पूर आले. सातत्याने पडणाऱ्या पावसाने नद्यांसह ओढे, नाले खळाळून वाहिल्याने छोटेमोठे बंधारे, तलाव भरून वाहिले. जलसंधारणाच्या कामामध्येही मुबलक पाणी साचले. यामुळे भूजल पातळीत वाढ होऊन पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांनाही पाझर फुटल्याने महिनाभरातच टंचाई हटली. सर्वाधिक टंचाई सोसणाऱ्या सोलापूर जिल्ह्याला पावसाने मोठा दिलासा दिल्याने तेथील तब्बल सव्वातीनशे टॅंकर बंद करण्यात आले. 

गुरुवारपर्यंत (ता. २४) विभागातील पुणे, साताऱ्यातील पाणीटंचाई पूर्णपणे निवळली होती. तर सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ तालुक्यातील १९ गावे १० वाड्यांमधील ५६ हजार लोकसंख्या आणि १९ हजार जनावरांना १९ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. तर सांगलीच्या जत तालुक्यातील ५ गावांमधील १२ हजार लोकसंख्येला ५ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता. तर विभागातील उर्वरित सर्वच तालुक्यांमध्ये पाणीटंचाई हटली असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले.

महिनाभरातील टॅंकरची तुलनात्मक स्थिती 
जिल्हा २३ सप्टेंबर २४ ऑक्टोबर 
पुणे ५० ० 
सातारा ९९ ० 
सांगली ९० ५ 
सोलापूर ३४४ १९ 
कोल्हापूर ० 
एकूण ५८३ २४ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com