सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात दमदार पाऊस

सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात दमदार पाऊस
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात दमदार पाऊस

सातारा ः माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यांना बुधवारी दमदार पाऊस झाला आहे. या पावसाने टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र, पश्चिम भागातील पिकांना या पावसाने धोका निर्माण होणार आहे. जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत सरासरी १८.७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.  

अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरवर व जनावरांच्या चाऱ्यासाठी छावणीवर अवलंबून असणाऱ्या माण तालुक्‍यासह खटाव, फलटण तालुक्‍यांत झालेल्या दमदार पावसाने दिलासा दिला. तर साताऱ्यासह कोरेगाव तालुक्‍यातही काही ठिकाणी पावसाने चांगली हजेरी लावली. दुष्काळी माण तालुका यंदाही चारा, पाण्यासाठी व्याकूळ झाला आहे. आज येईल, उद्या येईल या पावसाच्या प्रतीक्षेवर असलेल्या माणदेशी जनतेला पावसाने सतत हुलकावणीच दिली. पूर्ण गणेशोत्सव कोरडा गेल्याने दुष्काळाचे ढग गडद होऊ लागले होते. मात्र, बुधवारी दुपारी साधारण चारच्या सुमारास माणच्या पूर्वेकडे म्हसवडसह परिसरात पावसाने सुरवात केली. त्यानंतर हा पाऊस गोंदवले, दहिवडी, मलवडी असा पश्‍चिमेकडे सरकला. 

अगदी माणच्या पश्‍चिमेकडील बोथे येथे सुद्धा पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी साधारण अर्धा तास, तर काही ठिकाणी तासभर थांबून, थांबून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अत्यंत आवश्‍यकता असताना पडलेल्या पावसाने माणदेशी जनतेसह बळिराजाला दिलासा दिला आहे. फलटण तालुक्‍याच्या पश्‍चिम भागामध्ये जोरदार पावसाचे आगमन झाले. तरडगाव, काळज, कुसुर, माळवाडी, पाडेगाव, रावडी, सासवड, तडवळे, मुरूम, काळज, साखरवाडी परिसरात जोरदार पाऊस झाला. 

खटाव तालुक्यातील मायणी परिसरात दुपारी तीनच्या दरम्यान पावसाला सुरवात झाली. मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाने सर्वत्र पाणी झाले. तसेच या तालुक्‍यातील पुसेसावळीसह बुध, डिस्कळ, वडूज, कातरखटाव परिसरात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील ओढे, नाले खळखळून वाहिले आणि खटावनजीकच्या दोन प्रमुख ओढ्यांसह येरळा नदीलाही पाणी आले. याशिवाय सातारा, जावळी, पाटण, कोरेगाव, वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्‍यांतही काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. पश्चिमेकडे या अगोदर पाने पिवळी पडली होती. आता पिके जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com