मराठवाडी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाशिवाय पाणीसाठा केल्यास संघर्ष

Struggle for water supply without rehabilitation of Marathwadi dam affected
Struggle for water supply without rehabilitation of Marathwadi dam affected

ढेबेवाडी, जि. सातारा ः मराठवाडी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे अनेक प्रश्‍न प्रलंबित असतानाही पाटबंधारे विभागाने धरणात पाणीसाठा वाढविला आहे. पुनर्वसन कायद्याचे हे पूर्णतः उल्लंघन आहे. सर्व धरणग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण झाल्याशिवाय धरणात पाणीसाठा करू नये. अन्यथा आंदोलन उभारू, असा इशारा राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे संचालक जगन्नाथ विभुते यांनी निवेदनाद्वारे सातारा जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

तातडीने अधिकारी व धरणग्रस्तांची बैठक न बोलविल्यास संघर्ष अटळ असल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. निवेदनातील माहिती अशी ः वांग, मराठवाडी धरणांतील अनेक धरणग्रस्त आजही पुनर्वसनापासून वंचित आहेत. तरीही पाटबंधारे विभागाने पुन्हा वाढीव पाणीसाठा करण्याची प्राथमिक तयारी सुरू केली आहे. मात्र पुनर्वसन बाकी असताना पुन्हा पाणीसाठा करायला आमचा विरोध आहे. तरीही प्रकल्पाचे काम सुरू केल्यास त्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागेल. त्यातून संघर्ष उद्‍भवणार आहे, याची नोंद घेऊन बैठकीचे आयोजन करावे. आधी आमच्या समस्या सोडवाव्या. मेंढ आणि उमरकांचनमधील तिन्ही नवीन पुनर्वसित गावठाणांतील नागरी सुविधा पूर्ण कराव्या. 

मेंढ, उमरकांचन, जाधववाडी, जिंती या गावातील धरणग्रस्तांना अद्यापही जमिन मिळालेली नाही. त्यांना जमिनी किंवा रोख रकमेचे पॅकेज द्यावे. जिंती येथील ११ धरणग्रस्तांच्या जमिनी काढून घेतल्या, पण त्यांच्या मागणी प्रमाणे पूर्तता केलेली नाही, ती करावी. मेंढ, उमरकांचन, मराठवाडी येथील काही धरणग्रस्तांना त्यांच्या मागणीनुसार जमिनीऐवजी मंजूर रोख रकमेचे वाटप करावे. स्थलांतरितांच्या जमिनीला अद्यापही पाणी उपलब्ध नाही. त्यांना अन्य उत्पन्नाचे साधन नाही. 

कायद्यानुसार दरमहा तीन हजार भत्ता द्यावा. लाभक्षेत्रातील म्हणून वाटप केलेल्या जमिनी प्रत्यक्ष लाभक्षेत्रातल्या नाहीत. त्यांना चारपट जमीन द्यावी किंवा पाणी मिळेपर्यंत भत्ता द्यावा. प्रकल्पाच्या पाणी साठ्यावर आधारित विविध व्यवसाय सुरू करून द्यावेत. देय जमिनीचे आदेश काढले तरी त्याची सात बाराला नोंद होत नाही आणि हद्दी निश्‍चित न करता वाटप केलेल्या जमिनीच्या वहिवाटीत अडचणी येत आहेत त्या दूर कराव्यात, आदी विविध मागण्या निवेदनात नमूद आहेत. 

संबंधितांनी त्याची पूर्तता करूनच धरणाचे बांधकाम सुरू करावे, अन्यथा तीव्र संघर्षाची आमची तयारी असल्याचाही इशारा दिला आहे. निवेदनावर श्री. विभूते यांच्यासह देवराज देशमुख, जितेंद्र पाटील, आनंदा मोहिते, तानाजी सावंत, सीताराम साठे, सुनील पवार आदींच्या सह्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com