परभणी कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे धरणे तूर्त स्थगित

student agitation
student agitation

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या विद्यापीठस्तरावरील मान्य केलेल्या मागण्या १५ दिवसांच्या आत अमलात आणण्याचे तसेच शैक्षणिक व वसतिगृह शुल्क वाढ रद्द करण्यासाठी राज्य शासन तसेच महाराष्ट्र कृषी शिक्षण, संशोधन परिषदेकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन विद्यापीठ प्रशासनाने दिल्यानंतर सोमवारी (ता. १०) सहाव्या दिवशी विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन तूर्त स्थगित केले. शैक्षणिक शुल्क तसेच वसतिगृह शुल्कवाढ रद्द करण्यात यावी. पदव्युत्तर पदवी, कृषी पदवीस व्यावसायिक पदवीचा दर्जा बहाल करावा. बंद केलेल्या शिष्यवृत्ती पूर्वलक्षी प्रभावाने सुरू करण्यात याव्यात. सत्रांत परीक्षांचे निकाल वेळेवर लावावेत. वसतिगृहामध्ये सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आदी मागण्यांसाठी कृषी पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी प्रशासकीय इमारतीसमोर बुधवारी (ता. ५) बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. मागण्यांसंदर्भात ठोस तोडगा निघत नसल्यामुळे आंदोलन सुरूच होते. पाथरीचे आमदार सुरेश वरपुडकर, तलसीलदार विद्याचरण कडावकर यांनी रविवारी (ता. ९) आंदोनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या तसेच समस्या जाणून घेतल्या. स्थानिक पातळीवरील समस्या तत्काळ मार्गी लावाव्यात. राज्य सरकारकडील तसेच एमसीएआरकडील प्रलंबित मागण्यांबाबत कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासमेवत संयुक्त बैठक आयोजित करावी, अशी सूचना वरपुडकर यांनी या वेळी केली. त्यानंतर कुलसचिव रणजित पाटील यांच्याशी चर्चा झाली. परंतु, विद्यार्थ्यांचे समाधान न झाल्यामुळे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु, सोमवारी (ता. १०) विद्यापीठस्तरावरील मागण्या येत्या १५ दिवसांत अमलात आणण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन तूर्त स्थगित केले. शैक्षणिक, वसतिगृह शुल्कवाढ रद्द करण्यात यावी. कृषी पदव्युत्तर पदवीला व्यावसायिक पदवीचा दर्जा बहाल करावा आदी मागण्यांसंदर्भात  राज्य शासन तसेच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडे पाठपुरावा करावा. या मागण्या मंजूर न केल्यास परत तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे या विद्यार्थ्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com