पायपीट करूनही विद्यार्थी ‘ऑनलाइन’ होईना

आदिवासी अतिदुर्गम कुमशेत येथील शेतकऱ्यांची मुले ऑनलाइन शिक्षणासाठी रोज सकाळी १० किलोमीटर पायपीट करून वाकड डोंगरावर जातात.
agro
agro

अकोले, जि. नगर : आदिवासी अतिदुर्गम कुमशेत येथील शेतकऱ्यांची मुले ऑनलाइन शिक्षणासाठी रोज सकाळी १० किलोमीटर पायपीट करून वाकड डोंगरावर जातात. मात्र धुके, वारा, पाऊस यामुळे चार तास प्रयत्न करुनही केवळ अर्धा तास रेंज येते व त्या वेळात ही मुले अभ्यास करतात.  कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून सर्व कॉलेज, शाळा बंद असल्याने सरकारने व शिक्षण विभागाने ऑनलाइन शिक्षण सुरु केले. त्यासाठी ॲंड्रॉइड मोबाईल पाहिजे. मुले हट्टाला पेटलेली, मोबाईल नाही तर शिक्षण नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी भात, तांदूळ विकून, उसनवारी करून दहा-दहा हजाराचे मोबाईल मुलांना घेऊन दिले. परंतु, कुमशेत गावात रेंज नसल्याने ही मुले रोज भाकरी बांधून वाकड डोंगरावर ५ किलोमीटर पायी जाऊन दगडाचे मचाण करून बसतात. शिक्षकांशी संवाद साधून अभ्यासाचे धडे गिरवतात. मात्र नेटवर्क व्यवस्थित येत नसल्याने चार तासात केवळ अर्धा ते पाऊण तास अभ्यास होतो.  धुके व वारा आला कि रेंज जाते. पाऊस आला कि जवळच असलेल्या दगडाच्या गढीत बसतात. पाऊस गेला कि पुन्हा रेंज मिळते त्या ठिकाणी जाऊन अभ्यास सुरु होतो. या विद्यार्थ्यांचा हा रोजचाच उपक्रम ठरलेला आहे.

प्रतिक्रिया गावात रेंज नसल्याने १० विद्यार्थी सकाळी साडेआठ वाजता जेवणाचे डबे घेऊन ५ किलोमीटर पायी वाकड डोंगरावर येतो. मात्र पाऊस व धुके असल्याने रेंज धरसोड करते, दिवसभरात एक तासच अभ्यास होतो. त्यामुळे सरकारने या भागात टॉवर्स उभे करावेत, अन्यथा आम्हाला शाळाबाह्य होण्याची वेळ येईल.  - नितीन अस्वले, विद्यार्थी

मी अकोले कॉलेज मध्ये एस वाय बी.ए. शिक्षण घेते. वडिलांनी उसने पैसे घेऊन मोबाईल घेऊन दिला. मात्र दहा किलोमीटर प्रवास करून केवळ अर्धा ते एक तास अभ्यास होतो. सरकारने शिक्षणासाठी किमान सुविधा देणे आवश्यक आहे. गावातील २५ मुले मोबाईल नसल्याने शिक्षणापासून वंचित आहेत.  - मनीषा अस्वले, विद्यार्थिनी

सरकारने शिक्षण पद्धतीत बदल केला. मात्र, आदिवासी भागातील शेतकरी, मजूर यांना रोजगार नाही,  पोटाला घास नाही, मग महागडे मोबाईल घेऊन खायचे काय? नि जगायचे कसे? असा प्रश्न पालकांसमोर आहे. - सयाजी अस्वले,  सरपंच, कुमशेत

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com