पारंपरिक बांबू लागवडीचा अभ्यास

study of traditional bamboo cultivation  
study of traditional bamboo cultivation  

पारंपरिक पद्धतीत बांबू लागवड स्थानिक वृक्षांच्या आधाराने केली जाते. लागवड क्षेत्रातील सर्व स्थानिक मोठी झाडे राखली जातात. झाडांच्या सोबत केलेली लागवड व मोकळ्या ठिकाणी केलेली लागवड यात मोठा फरक दिसून येतो. जगभरातील १,६४२ बांबू जातींपैकी भारतात १२८ प्रजाती आढळतात. पूर्व व ईशान्येकडील राज्ये, मध्य भारतातील काही भाग आणि सह्याद्री पर्वतरांगा भारतातील प्रमुख बांबू उत्पादक प्रदेश आहेत. सह्याद्री पर्वत रांगांत साधारण २२ प्रजाती आढळतात. माणगा (Dendrocalamus stocksii) ही दक्षिण भारतातील तिसरी सर्वाधिक वापरली जाणारी स्थानिक प्रजात आहे. तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा हा माणगा बांबू उत्पादनातील अग्रेसर आहे. जिल्ह्याचे एकूण बांबू अर्थशास्त्र सुमारे ६० कोटींच्या आसपास जाते. ‘माणगा’ ही केवळ मानवाकडून संवर्धित केलेली प्रजात आहे. इतर बांबूच्या प्रजातीप्रमाणे माणगा जंगलात आढळत नाही. एक झाड- एक बांबू

  • बागायती पिकांसाठी ज्याप्रमाणे लागवडीपूर्वी त्या क्षेत्रातील झाडांची सरसकट तोड केली जाते, तसे बांबू लागवडीसाठी केले जात नाही. पारंपरिक पद्धतीत बांबू लागवड स्थानिक वृक्षांच्या आधाराने केली जाते. लागवड क्षेत्रातील सर्व स्थानिक मोठी झाडे राखली जातात. झाडांच्या सोबत केलेली लागवड व मोकळ्या ठिकाणी केलेली लागवड यात मोठा फरक दिसतो.  
  • बांबूला झाडांच्या सावलीत सूर्यप्रकाश मिळविण्याकरता स्पर्धा करावी लागते, परिणामी काठ्या अधिक उंची गाठतात. झाडाच्या फांद्यांचा आधार असल्याने वाऱ्यामुळे काठ्या वाकत नाहीत. नवीन येणारे कोंब मोडत नाहीत. झाडे आपल्या सोटमुळांनी खोल जमिनीतून शोषलेली अन्नद्रव्ये सुकलेल्या पानांकरवी जमिनीवर आणतात. या कुजणाऱ्या पालापाचोळ्यातून बांबूच्या वाढीसाठी आवश्यक ती पोषक मूलद्रव्ये मिळतात. या नैसर्गिक आच्छादनामुळे उन्हाळ्यात जमीन थंड रहाते. वृक्षांची सावली अती दाट असल्यास झाडांच्या पसरलेल्या फांद्या छाटल्या जातात. बांबू लागवडीस किमान ५० टक्के ऊन मिळणे आवश्यक असल्याचे शेतकरी सांगतात.  
  • बांबूसोबत आढळणाऱ्या स्थानिक वृक्षांच्या यादीत प्रामुख्याने फणस, जांभूळ, चारोळी, आंबा, कोकम, वट सोल, तिसळ, असणा, अर्जुन, बेहडा, बिवळा, खैर, सातवीण, सावर, पळस, कुंभा, सुरमाड, शिवण, धामण, नाणा, बकुळ, कुसुम, बिब्बा, हरडा, ऐन, किंजळ, काजरा, जांभा अशा विविध बहुपयोगी वृक्षांचा समावेश आहे. बांबूखेरीज या वृक्षांपासूनदेखील अधिकचे आर्थिक उत्पन्न मिळते. तसेच स्थानिक वृक्ष प्रजातींचे आणि एकूणच स्थनिक जैवविविधतेचे संवर्धनदेखील होते. अशा प्रकारच्या बांबू लागवडीतून पाचव्या वर्षीपासून प्रतिवर्षी एकरी किमान एक ते सव्वा लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. काही वृक्षांच्या खोडांवर गावठी मिरीचे वेल शेतकऱ्यांस अधिकचे आर्थिक उत्पन्न देतात.
  • कंद खणून काढणे 

  • पारंपरिक लागवड कंद पद्धतीने केली जाते. बांबू बेटामधील एक वर्ष वयाच्या काठ्या ओळखण्यासाठी काठीच्या प्रत्येक पेरावर असलेले संरक्षक पर्ण व काठीचा रंग यांचा आधार घेतला जातो.  
  • कंद आणि मातृबेट यांना जमिनीतून जोडणाऱ्या निमुळत्या भागास ‘कंदाची मान’ म्हणतात. सुरुवातीला कंदाभोवती जमीन खणून घेतली जाते. कंदाची मुळे मोकळी केल्यानंतर कोयता किंवा कुऱ्हाड वापरून कंद मानेपासून वेगळा केला जातो. कंद काठीची उंची साधारण उंची १२ ते १६ फूट राखली जाते.  
  • कोकणात कंद काढणी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात केली जाते. हा कालावधी मृग नक्षत्रादरम्यान असतो.  
  • खणून काढलेल्या कंदावर शेकडो तंतुमय मुळे असतात. कांदाच्या दोन्ही बाजूचे मिळून सहा ते दहा सुप्तावस्थेतील डोळे असतात. याच डोळ्यांपासून नवीन कोंब जन्माला येतात. कंद काढणीसाठी महिनाभर उशीर झाल्यास नवीन येणाऱ्या या कोंबाना इजा होऊ शकते. उशिरा लागवड केलेल्या कंदांना बऱ्याचदा पुढील वर्षी कोंब येतात किंवा कित्येक वेळा २५ ते ३० टक्के मर संभवते.
  • लागवडीचे नियोजन

  • कंद खणून काढल्यापासून एक ते दोन दिवसांत लागवड होणे आवश्यक आहे. पावसाळ्यात अगोदर खड्डा खणून ठेवल्यास त्यात पाणी साचते आणि कोकणातील अतिपावसामुळे कंद कुजू शकतो. मात्र मोठी लागवड करायची असल्यास पूर्वमशागत पावसाळ्यापूर्वीच केली जाते. बांबूची मुळे जमिनीत दोन फुटांपेक्षा जास्त खोल जात नसल्याने खड्डा खोलीपेक्षा रुंदीस जास्त ठेवला जातो. त्यात कुजलेले शेणखत, लेंडीखत, पालापाचोळा इ. भरून वरती मातीचा शंकू केला जातो.  
  • लागवड खड्डा सरासरी एक फूट खोल व दीड फूट रुंद खोदला जातो. लागवड करतेवेळी कंद काठी झाडाच्या बुंध्यापासून किमान ५ फूट अंतरावर झाडाच्या खोडास तिरकी उभी करून लावली जाते. बांधाने लागवड करतेवेळी किमान ६ ते ७ फूट अंतर राखले जाते. सलग क्षेत्र लागवड करतेवेळी दोन रोपातील अंतर किमान ७ फूट तर दोन ओळीतील अंतर किमान १२ फूट ठेवले जाते.  
  • लागवडीसाठीच्या कंद काठीची उंची १२ ते १६ फूट ठेवण्यामागे शेतकऱ्याचा एक आर्थिक विचारदेखील असतो. लागवडीनंतर पुढील तीन वर्षात बेट तयार झाल्यावर ही मूळ काठी तोडून चालू बाजारभावाने शेतकरी विक्री करतात. मोकळ्या जागेत लागवड करतेवेळी कंद काठीची उंची ४ ते ६ फूट एवढीच ठेवून दक्षिण दिशेकडे तोंड करून थोडी तिरकस लावली जाते. सूर्य दक्षिणायन अवस्थेत असताना कंद काठीस उष्णतेचा त्रास थोडा कमी होतो, तसेच तिरक्या पडणाऱ्या सावलीमुळे मुळाकडील माती तापत नाही.
  • संपर्कः मिलिंद पाटील, ९१३०८३७६०२) (लेखक कोकणातील शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com