हमीभाव न देणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करा: सुभाष देशमुख

सुभाष देशमुख
सुभाष देशमुख

सोलापूर : हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाना रद्द करण्याबाबत कायद्यानेच कृषी उत्पन्न बाजार समितीत्यांना अधिकार दिले आहेत. पण बाजार समित्या व्यापाऱ्यांच्या हितसंबंधांमुळे कारवाईस टाळाटाळ करतात, पण यापुढे ते चालणार नाही, भविष्यात आम्हाला त्याबाबत पुढील कारवाईचा विचार करावा लागेल, अशा शब्दांत सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी (ता. २३) बाजार समित्यांना ताकीद दिली. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या शेतमाल तारण कर्ज योजना आणि ई-नाम योजनेच्या पुरस्कारांचे वितरण सहकारमंत्री देशमुख यांच्या हस्ते येथे झाले. त्या वेळी ते बोलत होते. राज्य कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक दीपक शिंदे, व्यवस्थापकीय संचालक सुनील पवार, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, सोलापूर बाजार समितीचे संचालक शहाजी पवार, अप्पासाहेब पाटील, श्रीमंत बंडगर, धामणगाव बाजार समितीचे मोहन इंगळे, दोंडाईचाचे नारायण पाटील, आटपाडीचे भाऊसाहेब गायकवाड, उमरेडचे रुपचंद्र कडू, शहर उपनिबंधक कुंदन भोळे आदी उपस्थित होते. श्री. देशमुख म्हणाले, की शेतकऱ्यांना भाव मिळावा यासाठी बाजार समितीची स्थापना करण्यात आली. मात्र बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळत नाही. त्यामुळे बाजार समितीच्या बाबत काही सुधारणा कराव्या लागल्या. बाजार समित्यांमध्ये लिलाव आणि व्यवहारामध्ये चुकीच्या प्रथा पडल्या. त्या दुरुस्ती करण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. नियमनमुक्ती हा त्याचा पहिला टप्पा होता, पण यापुढेही कठोरातील कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्याशिवाय ही यंत्रणा सुधारणार नाही.  ‘‘राज्यातील जास्तीत जास्त बाजार समित्यांनी ई-नाम योजनेत सहभागी व्हावे, यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न आहेत. कारण ई-नाम योजनेत सहभागी झाल्यामुळे शेतकऱ्यांना देशभरातील बाजारपेठ खुली झाली आहे. त्यामुळे स्पर्धा होऊन शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो आहे,’’ असेही देशमुख म्हणाले. राज्य कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील पवार यांनी प्रास्ताविक केले. सरव्यवस्थापक दीपक शिंदे यांनी आभार मानले. या बाजार समित्यांचा झाला गौरव शेतमाल तारण योजना प्रभावीपणे राबविल्याबद्दल ''अ'' वर्गातील बाजार समित्यांमधून धामणगाव रेल्वे (जि. अमरावती), ''ब'' वर्गातील बाजार समित्यांमधून मोर्शी (जि. अमरावती), ''क'' व ''ड'' वर्गातील बाजार समित्यांमधून गोंडपिंपरी (जि. चंद्रपूर) या बाजार समित्यांना प्रथम पुरस्कार मिळाला. ई-नाम कार्यप्रणाली प्रभावीपणे राबविल्याबद्दल परभणी बाजार समितीला प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. ''अ'' वर्गातील बाजार समितीचा द्वितीय पुरस्कार अमरावती, तृतीय पुरस्कार सोलापूरला मिळाला आहे. ''ब'' वर्गाच्या बाजार समितीमधील द्वितीय पुरस्कार गडचिरोली समिती व तृतीय पुरस्कार भिवापूर (जि. नागपूर) समितीला जाहीर झाला आहे. ''क'' व ''ड'' वर्गातील बाजार समित्यांसाठी दिल्या जाणाऱ्या द्वितीय पुरस्कारासाठी एकही समिती पात्र ठरली नाही. तृतीय पुरस्कार पोंभुर्णा (जि. चंद्रपूर) समितीला जाहीर झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com