ऑनलाइन प्रक्रियेमुळे सरकारचे हजार कोटी वाचले ः सहकारमंत्री देशमुख

विधीमंडळ अधिवेशन
विधीमंडळ अधिवेशन

नागपूर : बँकांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जमाफी केली असती, तर बँकांचेच भले झाले असते, शेतकऱ्यांचे नाही. कर्जमाफीच्या ऑनलाइन प्रक्रियेमुळे बँकांच्या गैरप्रकारावर अंकुश बसला. त्यामुळे प्रथमदर्शनी सरकारचे यात सुमारे एक हजार कोटी वाचल्याचे सांगून, शेवटच्या पात्र शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेपर्यंत योजना सुरू राहील, असे आश्वासन सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी (ता. ११) दिले.

विरोधकांच्या २९३ अन्वये प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. कर्जमाफीच्या अनुषंगाने विरोधकांनी केलेल्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देत त्यांनी विरोधकांवर चौफेर राजकीय टोलेबाजी केली. या वेळी मंत्री देशमुख म्हणाले, की राज्यस्तरीय बँकर्स समितीने ८९ लाख शेतकऱ्यांकडे ३४ हजार कोटींचे कर्ज थकल्याची माहिती दिली होती. प्रत्यक्षात, ऑनलाइन अर्ज भरून घेतल्यानंतर बँकांकडील माहितीमध्येही मोठी विसंगती आढळून आली. राष्ट्रीयीकृत, व्यापारी बँका, तसेच जिल्हा बँकांची आकडेवारी तफावतीसह त्यांनी सभागृहापुढे ठेवली. यामुळे प्रथमदर्शनी सुमारे एक हजार कोटी रुपये सरकारी तिजोरीचे वाचल्याचे त्यांनी सांगितले.  

१० जुलैपर्यंत राज्यात चौदा हजार कोटींचे पीक कर्ज वितरित केल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले. २० लाख शेतकऱ्यांना कर्जवाटप केले आहे. यात राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँकांनी ४ लाख १० हजार शेतकऱ्यांना ५५०० कोटी, जिल्हा बँकांकडून १४ लाख ३७ हजार शेतकऱ्यांना साडेसात हजार कोटी, ग्रामीण बँकांनी ८५ हजार शेतकऱ्यांना ७१० कोटी वितरित केले आहेत. तूर आणि हरभऱ्याची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार बाजार समित्यांकडे आहेत. मात्र, संगनमतामुळे व्यापाऱ्यांवर कारवाई होत नाही, असा टोला मंत्री देशमुख यांनी विरोधकांना हाणला.

येत्या काळात डाळी, कडधान्याला किमान दर बंधनकारक करणारा कायदा केला जाईल. राज्यात यंदा ३३ लाख क्विंटल तूर खरेदी आणि १९ लाख क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे. तसेच, खरेदी न झालेल्या तूर, हरभऱ्यासाठी प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान जाहीर केले आहे. तुरीचे २३५ कोटी आणि हरभऱ्याचे ६४४ कोटींचे चुकारे येत्या १५ दिवसांत दिले जातील, अशी घोषणाही त्यांनी केली.

श्री. देशमुख यांच्या उत्तरानंतर राज्यमंत्री सदाभाऊ खोत कृषीवरील उत्तर देत होते. मात्र, त्याचवेळी शिवसेना सदस्यांनी ‘नाणार’वरून विधानसभेत घोषणाबाजी सुरू केली. त्यावरून सभागृह दिवसभरासाठी तहकूब झाले. त्याआधी शिवसेनेचे आमदार राजन साळवी, प्रताप सरनाईक आणि काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी राजदंड पळवण्याचा निष्फळ प्रयत्न केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com