चिकाटी, आर्थिक नियोजनातून पोल्ट्री व्यवसाय केली किफायतशीर

वांजोळी (जि. नगर) येथील ३८ वर्षे वयाच्या अमोल पागिरे या युवकाने कोरोनाचे संकट हीच संधी मानली. आपल्या लेअर कोंबड्यांच्या फार्ममधून लॉकडाऊनच्या काळात दररोज सुमारे तीनहजार अंड्यांची स्वतः विक्री करीत उल्लेखनीय आर्थिक उलाढाल केली.
Poultry business of Amol Pagire
Poultry business of Amol Pagire

वांजोळी (जि. नगर) येथील ३८ वर्षे वयाच्या अमोल पागिरे या युवकाने कोरोनाचे संकट हीच संधी मानली. आपल्या लेअर कोंबड्यांच्या फार्ममधून लॉकडाऊनच्या काळात दररोज सुमारे तीनहजार अंड्यांची स्वतः विक्री करीत उल्लेखनीय आर्थिक उलाढाल केली. व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, मेहनत, चिकाटी, तंत्रज्ञान वापर या गुणांच्या आधारे आदर्श पोल्ट्री व्यवसायात तो वाटचाल करीत आहे. नगर जिल्ह्यातील वांजोळी (ता. नेवासा) येथील ३८ वर्षे वयाच्या अमोल पागिरे हा युवक घरची शेती सांभाळून पोल्ट्री व्यवसायही पाहतो आहे. त्याचे वडील काशिनाथ यांनी कृषी विभागात पुणे विभागात नोकरी केली. परभणी येथील कृषी विद्यापीठातून कुलसचिव म्हणून ते सेवानिवृत्त झाले. नोकरी सोडून शेती

  • मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील पदविका घेतलेल्या अमोल यांची १४ वर्षे औरंगाबाद येथे खाजगी कंपनीत नोकरी
  • दोन बंधू असून तेही नोकरीला. तिघेही नोकरीला असल्याने घरची २१ एकर शेती कोणी करायचा हा प्रश्न होता.
  • अखेर अमोल नोकरी सोडून शेतीत रमले.
  • जोडव्यवसाय असावा म्हणून लेअर्स पक्षी संगोपन व्यवसाय निवड. त्यात सुमारे १४ महिन्यांचा अनुभव तयार झाला.
  • पोल्ट्री व्यवसाय दृष्टिक्षेपात

  • पोल्ट्री शेडसाठी एकाही बँकेने मदत केली नाही. अखेर घरचे व उसने पासने करून आधुनिक दोन मजली शेड बांधले. लांबी ११० फूट, रुंदी ४० फूट. मध्यभागी २३ फूट तर बाजूची उंची २३ फूट.
  • दहा फूट उंचावर पिंजरे. कोंबड्यांची विष्ठा दहा फुटांवरून खाली शेडच्या पृष्ठभागावर जमा.
  • खाद्य वर घेऊन जाणे, अंडी भरलेले ट्रे खाली आणणे यासाठी इलेक्र्टिक मोटरवर चालणारी लोखंडी ट्रॉली
  • पिंजरा पद्धतीचा अवलंब

  • पिंजरा पद्धतीने संगोपन. व्यवस्थापनासाठी ही सोपी पद्धत. पक्षांची हालचाल कमी होत असल्याने खाद्य कमी लागते. मजुरीवरील खर्च कमी. विष्ठा आणि पक्षांचा संपर्क न आल्याने रोगराई पसरत नाही. औषधांवरील खर्च कमी.
  • तीन ओळीत पिंजरे. रुंदी आठ फूट तर उंची पाच फूट.
  • एका ओळीची लांबी १०० फूट. प्रति पिंजऱ्यात पाच कोंबड्या. एका ओळीत ५८ पिंजरे.
  • एकूण ५, ४०० पक्षांचे संगोपन करणे शक्य. सध्या ४,९०० पक्षी.
  • पिंजऱ्याच्या पुढे खाद्य ठेवण्यासाठी पन्हाळी.
  • पाणी व्यवस्था

  • निपल पद्धती. पक्षाने चोचीने निपल दाबले की हवे तेवढे पाणी पिता येते. ते खाली सांडत नाही व रोगराई पसरत नाही.
  • दोन हजार लीटरची पाण्याची टाकी. निर्जंतुकीकरणासाठी ब्लिचिंग पावडर व वॉटर सॅनिटायझर
  • पक्षांची खरेदी

  • आघाडीच्या कंपनीकडून प्रति पक्षी १९५ रुपयांप्रमाणे ५, १०० पक्षांची खरेदी.
  • अंड्याचे उत्पादन जास्त, वजनाने कमी, खुडूक लवकर न होणाऱ्या, कमी अन्नात जास्त उत्पादन देणाऱ्या कोंबड्या.
  • साधारणतः १९ आठवड्यानंतर अंडे देण्यास सुरुवात. ७२ ते ८० आठवड्यापर्यंत व चांगल्या व्यवस्थापनाआधारे ९० आठवड्यांपर्यंत अंडी उत्पादन क्षमता.
  • प्रति दिन होणाऱ्या अंडी उत्पादनाला एकूण पक्षांच्या संख्येने भागले की की अंडी देणाऱ्या कोंबड्यांची टक्केवारी मिळते.
  • खाद्य

  • जास्तीत जास्त पक्षी अंडी देण्याचे मूळ उत्कृष्ट व्यवस्थापनामध्ये.
  • नामवंत कंपनीचे खाद्य देतात. ते थोडे महाग पडले तरी अंड्यांचे उत्पादन वाढते असा अनुभव.
  • हे खाद्य पचायलाही सोपे. पहाटे प्रति पक्षी ७० ग्रॅम व संध्याकाळी साडेपाच वाजता ४० ग्रॅम असे एकूण ११० ग्रॅम खाद्य.
  • फॉगर आणि एफएम संगीत

  • उन्हाळ्यात पक्षांना हीट स्ट्रोक बसण्याची शक्यता. जास्त तापमानात पक्षी कमी खातात. वजन घटून अशक्त होतात. शेडमध्ये तापमान नियंत्रित राहावे म्हणून फॉगर्स सिस्टीम. (प्रत्येक तासाला)
  • कोंबड्या जोराचा आवाज झाला तरी विचलित होतात. त्याचा परिणाम अंडी उत्पादनावर होतो. मोठे पक्षी, गाड्यांचा आवाज कानी पडू नये म्हणून रेडिओवर एफएम स्टेशन लावून गाणी लावली जातात.
  • विक्री व्यवस्थापन

  • सुरुवातीस व्यापारासोबत करार
  • पुढे पुणे-औरंगाबाद महामार्गावर शेडपासून दोन किलोमीटरवर आऊटलेट
  • किरकोळ विक्रीसह १५ किलोमीटर परिसरातील किराणा दुकानदार, हॉटेल व ढाबेबाले अंडी घेऊन जाऊ लागले.
  • पुढे घरपोच डिलीव्हरीला मागणी
  • मग मोटारसायकलला पाठीमागे लोखंडी कॅरिअर करून घेतले. यात एक हजार अंडी ट्रेमध्ये ठेवून वाहतूक करता येते.
  • स्वतः विक्री केल्याने ३० टक्के नफ्याचे प्रमाण मिळते.
  • वर्षभरात एक हजार बॅग कोंबडी खत उपलब्ध. ऊस, आले, डाळिंब आदी उत्पादकांना ५० किलो बॅगेची ३०० रुपयांप्रमाणे विक्री.
  • कोरोना काळातील धडपड कोरोना काळात काहीही झाले तरी अंडी उत्पादन करणे सोडायचे नाही असे ठरवल्याने अमोल आज फायद्यात आहेत. कोरोनापूर्वी साडेतीन ते चार रुपयाला विकले जाणारे अंडे त्याकाळात एक रुपयाला विकण्याची वेळ आली. खाद्याचे भाव मात्र कमी झाले नव्हते. त्यामुळे अंडी उत्पादन खर्च साडेतीन रुपये झाला. सुरुवातीच्या काळात दररोज दोन ते अडीच हजार रुपयांचे नुकसान व्हायचे. पण हार मानली नाही. पुढे अंड्यांना मागणी वाढली. या काळात परिसरातील सुमारे दहा गावांमधील व्यावसायिकांना मोटरसायकलवरून अंडी घरपोच देणे सुरू केले. प्रत्येक गावात चार दुकाने असायची. झालेला फायदा

  • दररोज ३००० ते ३५०० अंड्यांची विक्री
  • दर प्रति नग ४ रुपये २० पैसे.
  • मासिक उत्पन्न- किमान एक लाख २० हजार रुपये
  • सध्या दर ३ रुपये ६० पैसे. विक्री व मागणी कायम.
  • एकूण उत्पन्नाच्या २० टक्के फायदा.
  • घरगुती कोल्ड स्टोरेज

  • कोरोना काळात अंडी घ्यायला व्यापारी येत नव्हते. आले तरी पूर्ण अंडी उचलत नव्हते.
  • एकवेळ ६० हजार अंड्यांचा साठा झाला.
  • अधिक तापमानात अंडी खराब होऊ नयेत म्हणून नियंत्रित तापमानाची खोली निर्मिती.
  • छतावरील ॲस्‍बेस्टॉसच्या पत्र्यावर ज्वारीचा कडबा. चारी बाजूंच्या भिंतींवर बारदान बांधून हिरव्या रंगाचे शेडनेट
  • दिवसातून तीन वेळा कडबा व भिंतींवरील पोत्यावर पाणी फवारणी
  • खिडक्या उघड्या ठेवून फॅन लावून आतील गरम हवा बाहेर काढली.
  • अशा पद्धतीने अडचणीच्या काळात एकही अंडे खराब होऊ न देता सर्व अंड्याची विक्री केली.
  • संपर्क- अमोल पागिरे - ९०४९९८८७९९ (लेखक औरंगाबाद येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com