प्रतिकूल स्थितीतही बसवली शेतीची आर्थिक घडी

जालना जिल्ह्यातील देवीदास शिंगाडे व त्यांच्या अर्जुन व गजानन या मुलांनी पारंपरिक पिकांसोबत दैनंदिन खर्चासाठी भाजीपाला पिकांची लागवड व आठवडी बाजारातील विक्री मेळ घातला आहे. लॉकडाऊनच्या स्थितीतही हातपाय न गाळता परिसरातील वीस गावांमध्ये फिरून ५० टन कलिंगडांची विक्री केली. या जिगरबाज शेतकऱ्यांने प्रतिकूल स्थितीत शेतीचे उत्तम आर्थिक नियोजन बसवल्याने तग धरणे शक्य झाले.
The Shingade brothers harvested the watermelons but due to the lockdown situation sale becomes difficult
The Shingade brothers harvested the watermelons but due to the lockdown situation sale becomes difficult

जालना जिल्ह्यातील देवीदास शिंगाडे व त्यांच्या अर्जुन व गजानन या मुलांनी पारंपरिक पिकांसोबत दैनंदिन खर्चासाठी भाजीपाला पिकांची लागवड व आठवडी बाजारातील विक्री मेळ घातला आहे. लॉकडाऊनच्या स्थितीतही हातपाय न गाळता परिसरातील वीस गावांमध्ये फिरून ५० टन कलिंगडांची विक्री केली. या जिगरबाज शेतकऱ्यांने प्रतिकूल स्थितीत शेतीचे उत्तम आर्थिक नियोजन बसवल्याने तग धरणे शक्य झाले. शिंगाडे पोखरी (ता. जि. जालना) येथील देवीदास शिंगाडे यांची १० एकर शेती आहे. खरिपात पारंपरिक कापूस, सोयाबीन, मुग, तर रब्बीमध्ये गहू, ज्वारी, हरभरा ही पिके ते घेतात. १९७८ पासून किमान एक एकर भाजीपाला करून त्यांची विक्री करत आहेत. आता त्यांची दोन मुले अर्जुन व गजानन यांनीही वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत शेतीसह आर्थिक नियोजनाचे धडे गिरवले आहेत. त्यामुळे त्यांच्या एकत्रित कुटुंबाचे प्रयत्न परिसरातील अन्य शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायक ठरतात. दरवर्षी सर्व कौटुंबिक गरजा पूर्ण झाल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या एक ते दीड लाख रुपयांतून शेतीमध्ये सुधारणा करण्याचे धोरण ठेवले आहे. गेल्या पाच वर्षात शेतात ३ विहिरी घेतल्या असून, संपूर्ण शेतात पाइपलाइनने पाणी नेले आहे. सुमारे ४ एकर क्षेत्रासाठी ठिबक सिंचन केले आहे. गेल्या वर्षी नवीन एक एकर शेती विकत घेतल्यामुळे सर्व शिल्लक संपून गेली. या वर्षी उन्हाळी लागवडीसाठी पैशांची तजवीज होत नव्हती. तसे प्रत्येक वर्षी राष्ट्रीयकृत बॅंकेकडून त्यांना कर्ज उपलब्ध होते. मात्र, या वर्षी वरील कारणांमुळेच खाते थकीत झाले होते. त्यातच यंदा कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे उन्हाळी हंगामातील कलिंगड लागवडीसाठी कर्ज मिळत नव्हते. यावर उपाय म्हणून देवीदास शिंगाडे यांनी आपल्या मुलांना ``घरातील सोने अशावेळी कामी येणार नाही, तर कधी``, असा सवाल केला. तेव्हा अर्जून शिंगाडे यांनी स्वतःचे सोने पतसंस्थेमध्ये गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यातून गरज पूर्ण होत नव्हती. मग पत्नी सौ. सीमा हिने तिचे दागिनेही त्वरित दिले. अशा प्रकारे एक लाखाच्या मूल्याच्या सोन्यावर ७५ हजार रुपये गोल्ड लोन ११ टक्के व्याजदराने मिळाले. या कर्ज रकमेतून कलिंगडाची लागवड केली. पुढे लॉकडाऊनच्या स्थितीमध्येही हातपाय न गाळता विक्रीसाठी प्रचंड धडपड केली. अवघ्या ७० दिवसात शिंगाडे कुटुंबाने कर्जफेड करतानाच सुमारे दोन लाख रुपये निव्वळ नफा मिळवला. अर्जुन शिंगाडे म्हणाले की, कर्ज हाती पडल्यानंतर शिंगाडे परिवाराने झटून शेतीकामाला सुरुवात केली. आधीचे कपाशीचे दोन एकर रान तसेच होते. त्यातील एक एकर रान साफ करून त्यातील ड्रीपच्या नळ्या काढून घेतल्या. याच ड्रीपचा वापर कलिंगडाच्या शेतीला करण्यात आला. साधारणतः एकरी दहा हजार झाडे बसली. कलिंगड शेतीत अडचण आल्यास हाती दुसरे पीक हवे म्हणून वांगे देखील लावले. वांग्याची एक हजार झाडे होती. त्यासाठी मशागत खर्च ३० हजार रुपये आला. वांग्यातून खर्च वजा जाता निव्वळ उत्पन्न ४० हजार रुपये मिळाले. कामाचे नियोजन

  • शिंगाडे कुटुंबीयांनी कामे वाटून घेतली आहेत. गजानन शिंगाडे हे कलिंगड, वांग्यांची मशागत, फवारणी, कीडरोड, पाणी व खत व्यवस्थापनाची जबाबदारी पाहतात.
  • घरातील महिला सौ. शारदा आणि सौ. सीमा यांनी खुरपणी, काढणीची जबाबदारी घेतली. वडील गजाननराव यांनी आर्थिक नियोजनाचे काम पाहिले, तर अर्जुन शिंगाडे यांनी मालाच्या विक्रीची जबाबदारी घेतली होती.
  • विक्रीतील अडचणींवर काढला मार्ग 

  • अर्जुन शिंगाडे यांनी सांगितले, की कलिंगड तयार झाल्यानंतर मी स्वतः मुंबई येथील वाशी मार्केटमध्ये माल विक्रीसाठी नेला. त्यासाठी २५ हजार रुपये गाडी भाडे देत १६ टन कलिंगड लोड केले. त्याला १४ रुपये प्रतिकिलो प्रमाणे एकूण दोन लाख रुपये मिळाले. त्याचा घरात सर्वांना आनंद झाला. मात्र, हा आनंद जास्त दिवस टिकला नाही. कारण कलिंगडाच्या प्लॉटमध्ये भरपूर माल असताना अचानक कोरोना आणि लॉकडाऊनचे संकट आले. बाजार बंद पडले. माझ्यावर विक्रीची जबाबदारी असल्याने मी बैचेन झालो. मात्र, वडील व आमचे परिचित सत्यनारायण राठी यांनी धीर दिला. आजूबाजूच्या गावांमध्ये विक्री करण्याचा सल्ला दिला.  
  • अर्जुनरावांनी लॉकडाऊनमध्ये कलिंगड विकण्यासाठी अक्षरशः युद्धपातळीवर काम केले. “बाजार समित्या बंद असताना कलिंगड विकण्यासाठी गावोगाव फिरण्याचा निर्णय मी घेतला. तसे केले नसते तर वडिलांनी बसवलेले आर्थिक गणित कोलमडून पडले असते. एक हजार रुपये प्रतिदिन दराने मालवाहू पिकअप गाडी भाड्याने घेतली. लॉकडाऊनच्या कालावधीत आजूबाजूच्या वीस गावामध्ये एकूण १२०० किलोमीटर फिरलो. साधारणतः दीड हजार ग्राहकांना प्रति नग ४० ते ५० रुपये या दराने कलिंगडाची विक्री केली. सर्व ५० टन माल विकला. गहाण ठेवलेले दागिने १७ एप्रिल रोजी सोडवून घरी आणल्याचेही अर्जुनरावांनी आनंदाने सांगितले.
  • कलिंगडाचे गणित 

    लागवड एक एकर
    उत्पादन ५० टन.
    खर्च मशागत, व्यवस्थापन व अन्य ८५ हजार रुपये.
    गाडी भाडे ५० हजार रुपये.
    एकूण उत्पन्न तीन लाख २७ हजार रुपये.
    निव्वळ नफा एक लाख ९२ हजार रुपये.

    एकूण शेतीचा ताळेबंद

    पीक क्षेत्र (एकर) उत्पादन (क्विंटल प्रति एकर) दर (रुपये प्रति क्विंटल) उत्पादन खर्च (रुपये प्रति एकर)
    खरीप
    कापूस ४ ते ५ एकर १४ ६००० ९०००
    सोयाबीन ३ एकर ३८०० ५०००
    मुग १ ते १.५ एकर ७००० ४०००
    रब्बी
    गहू १ एकर ११ ३५०० ६०००
    ज्वारी २ ते ३ एकर ३६०० ७०००
    हरभरा १ एकर ४२०० ६०००

    वर्षभर एक एकर क्षेत्रामध्ये मेथी, चवळी, भेंडी, गवार, टोमॅटो, कोबी, शेपू, कारले, दोडके असा विविध प्रकारचा भाजीपाला करतात. या भाज्यांची विक्री आठवडी बाजारामध्ये अर्जुन शिंगाडे करतात. या भाज्यांच्या विक्रीतून दर आठवड्याला १२ ते १३ हजार रुपये येतात. त्यातून कुटुंबाचा दैनंदिन खर्च चालतो. येत्या खरिपाची तयारी सुरू केली आहे. गावातील शेतकऱ्याकडून टँकरने पाणी आणून मिरचीची १० हजार रोपे तयार केली आहेत. त्यातून एक एकर मिरची, एक एकर भाजीपाला, चार एकर कापूस आणि तीन एकर सोयाबीन लागवडीचे नियोजन आहे. अजूनही कर्जमाफी न मिळाल्याने बँक खाते थकबाकीतच आहे. खरिपातही कर्ज मिळेलच, याची हमी नसल्याचे कलिंगड आणि वांगे विक्रीतून मिळालेला नफा खरिपासाठी भांडवल म्हणून वापरण्याचा निर्णय घेतला आहे. - अर्जुन शिंगाडे, ९७६३५७१७७७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com