कृत्रिम रेतनातून देशी गोवंश गुणवत्ता वाढीला यश

गोवंश
गोवंश

औरंगाबाद: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत औरंगाबाद - पैठण रस्त्यावरील कृषी विद्यालयाच्या प्रक्षेत्रावरील गोठ्यात अवर्गीकृत गोवंशाची गुणवत्ता वाढ करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या अंतर्गत कृत्रीम रेतनाच्या माध्यमातून विद्यालयाच्या गोठ्यात नुकताच गीर जातीच्या वासराचा जन्म झाला. कृषी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. टी. जाधव म्हणाले, ''कृषी विद्यालयाच्या प्रक्षेत्रावरील गोठ्यामध्ये अवर्गीकृत देशी गोवंशाच्या सुमारे ४२ गायी होत्या. या गायींपासून दूध उत्पादन कमी आणि संवर्धनावर खर्च जास्त अशी परिस्थिती होती. ती बदलण्यासाठी गोठ्यातील गायींची संख्या कमी केली. केवळ १३ गायी ठेवल्या. त्यांच्यापासून जातिवंत देशी गोवंश पैदास करण्यासाठी गीर गोवंशाच्या रेतमात्रेचा वापर करण्यात आला. त्याद्वारे एका गाईला कृत्रीम रेतन करण्यात आले.'' ''कृत्रिम रेतनासाठी भारतातील नामांकित जातिवंत गीर गोवंशाची रेतमात्रा औरंगाबादमधील खडकेश्वर येथील प्रयोगशाळेतून उपलब्ध झाली. या प्रयोगास यश मिळून गुरुवारी (ता. ३०) सकाळी या गाईने गीर जातीच्या नर वासराला जन्म दिला. अशाप्रकारे गोठ्यातील अवर्गीकृत गाईंना कृत्रिम रेतन करून देवणी व इतर देशी गोवंशाची पैदास आणि संवर्धनाचे काम हाती घेण्यात येईल,'' असेही डॉ. जाधव यांनी सांगितले.   ''विद्यापीठाने देवणी व एचएफ जातीच्या संकरातून विकसित केलेली 'होलदेव' जातीची गाय कृषी विद्यालयाच्या प्रक्षेत्रावरील गोठ्यात आणली आहे. देशी गोवंशाच्या माध्यमातून दुधाची उत्पादन क्षमता वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवाय, जन्माला आलेल्या होलदेव आणि गीर गोवंशाच्या वासरांसाठी कोणतीही विशेष व्यवस्था नाही. ते आपल्या भागातील वातावरणाशी किती समरस होतात, याचाही अभ्यास केला जात आहे,'' अशी माहिती डॉ. जाधव यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com