द्राक्षशेतीत परीक्षणानंतर व्यवस्थापनातून यश ः डॉ. उपाध्याय

माती, पाणी, पान व देठ परीक्षण ही मुख्य अट लागू होते. परीक्षणानंतर बागेतील व्यवस्थापन कामे ठरणारे सर्व शेतकरी द्राक्षशेतीत यशस्वी झालेले आहेत,’’ असे मत राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. के. उपाध्याय यांनी व्यक्त केले.
Success in management after testing in vineyards: Dr. Upadhyaya
Success in management after testing in vineyards: Dr. Upadhyaya

पुणे ः ‘‘अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन उत्तमरीत्या केल्यास द्राक्षशेतीतून शाश्‍वत उत्पादन घेता येते. मात्र त्यासाठी माती, पाणी, पान व देठ परीक्षण ही मुख्य अट लागू होते. परीक्षणानंतर बागेतील व्यवस्थापन कामे ठरणारे सर्व शेतकरी द्राक्षशेतीत यशस्वी झालेले आहेत,’’ असे मत राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. के. उपाध्याय यांनी व्यक्त केले. 

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या वार्षिक अधिवेशनात ‘द्राक्ष बागेतील अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन’ या विषयावर ते बोलत होते. ‘‘आपली बाग १० ते १२ टन उत्पादन देणारी, १२ वर्षे टिकणारी आणि नफा देणारी असावी, असे ध्येय शेतकऱ्याचे असते. मात्र आपली द्राक्षशेती पर्यावरणपूरक देखील हवी. त्यासाठी पाणी आणि पीक संरक्षण साधनांचा जादा वापर अजिबात करू नये. त्यामुळे शेतजमिनीचे आरोग्य धोक्यात येतेच. परंतु भरमसाट जादा खते दिल्याने शिवारातील नैसर्गिक पाणी स्त्रोत्र कायमचे बाधित होतात,’ असे डॉ. उपाध्याय यांनी स्पष्ट केले. 

प्रत्येक बागेत शिफारशी बदलतात ‘‘द्राक्ष बागेत अन्नद्रव्ये व पाणी वापराबाबत सरसकट एक शिफारस कधीही लागू होत नाही. प्रत्येक जिल्हा, तालुका, गावच नव्हे तर बागेच्या प्रत्येक प्लॉटनुसार शिफारशी बदलतात. कुठेही माती एकसमान नसल्याने शिफारशी एकसारख्या असूच शकत नाहीत. त्यामुळे माती, पाणी, पानदेठ परीक्षण करूनच बागेचे पाणी व अन्नद्रव्य पुरवठ्याचे नियोजन करावे. मातीचा प्रकार, खोली, बागेची अवस्था, सामू, क्षार, पाण्यातील क्षार, सोडियम, नत्र, कॅल्शिअम हे घटक अन्नद्रव्य व्यवस्थापनात उपयुक्त ठरतात,’’ असे डॉ. उपाध्याय म्हणाले.  वेल व्यवस्थापन असे ठेवा, की ३० टक्के सूर्यप्रकाश जमिनीवर पडलाच पाहिजे. मातीमधील कॅल्शिअम कार्बोनेट स्थिर करून पीएच कमी ठेवण्यासाठी सल्फर, अमोनिअम थायोसल्फेट, पोटॅशिअम थायोसल्फेटचा वापर करावा. त्यासाठी बोध फोडणे, शेणखताचा वापर उपयुक्त ठरतो.  कोणत्याही खताचा वापर करताना कंपनीने त्यात अन्नद्रव्याचे प्रमाण किती ठेवले आहे आणि माझ्या बागेची अवस्था कशी आणि तिची मागणी  किती, या मुद्द्यांचा बारकाईने विचार करावा. तसे न केल्यास खतांचे स्थिरीकरण होऊन वेगळ्याच समस्या उद्‍भवतात, असा इशाराही त्यांनी दिला.

  प्रयोगशाळेच्या अहवालांचाही अभ्यास करा ‘‘पाणी आणि मातीमधील घटकांची कमतरता किंवा अतिरिक्तपणा पाहून आपल्याला बागेचे व्यवस्थापन करावे लागते. त्यासाठी प्रयोगशाळेकडून तपासणी अहवाल क्रमप्राप्त असतात. मात्र काही वेळा प्रयोगशाळेतच गोंधळ झालेला असू शकतो. एकाच बागेचे नमुने दोन प्रयोगशाळांमधून तपासल्याचे त्यांचे अहवाल वेगवेगळे येतात. यातून बागेचे संपूर्ण व्यवस्थापन कोलमडून पडते. त्यामुळे अहवालांचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि चुकीच्या परीक्षण अहवाल देणाऱ्या प्रयोगशाळांकडे जाणे टाळा,’’ असा मोलाचा सल्ला डॉ. उपाध्याय यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com