बाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजन

ट्रॅक्टरने मशागत करताना सौ. कुलकर्णी
ट्रॅक्टरने मशागत करताना सौ. कुलकर्णी

आष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला मकरंद कुलकर्णी यांनी बाजारपेठ लक्षात घेऊन पीक पद्धतीचे नियोजन केले. प्रयोगशील शेतकरी आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन विविध भाजीपाला पिकांसह ऊस, हळद, केळी लागवडीवर त्यांचा भर असतो. पिकांची फेरपालट, बाजारपेठेनुसार पीक लागवडीतून त्यांनी आर्थिक प्रगतीकडे वाटचाल सुरू केली आहे. 

सांगली-इस्लामपूर राज्यामार्गावर आष्टा (ता. वाळवा) हे गाव आहे. या गावात प्रामुख्याने हळद, ऊस आणि केळी या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होते. याच गावात सौ. मृदुला मकरंद कुलकर्णी यांची २७ एकर शेती आहे. सौ. मृदुला यांचे शिक्षण एम.ए. पर्यंत झाले आहे. त्यांचे पती मर्चंट नेव्हीत कॅप्टन म्हणून कार्यरत आहे. पती सातत्याने परदेशातच असल्याने कुलकर्णी या माहेरी म्हणजेच आष्टा गावी रहातात. कुलकर्णी यांची आष्टा तसेच सासरी किणी येथे देखील शेती आहे. शेती नियोजनाबाबत सौ. मृदुला कुलकर्णी म्हणाल्या की, माहेरी शेती असल्याने मला पीक व्यवस्थापनाची पहिल्यापासून सवय होतीच. लग्नानंतर सुरवातीच्या काळात आष्टा येथील शेती करारपद्धतीने करण्यास दिली होती. परंतु त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे मी स्वतः शेती व्यवस्थापन करण्याचा निर्णय घेतला. सध्या सात एकर शेती मी स्वतः पहाते. उर्वरित शेती भागाने करायला दिली आहे. मला पारंपरिक शेती करायची नव्हती. त्यामुळे विविध पिकांची माहिती घेण्यास प्रारंभ केला. सुधारित पद्धतीने शेती करण्याचा निर्यण घेतला आणि शेतीचा प्रवास सुरू झाला.

सुधारित तंत्रावर दिला भर  शेती नियोजनाबाबत सौ. मृदुला कुलकर्णी म्हणाल्या की, सन २००७ मध्ये मी सात एकर शेतीची सूत्रे हाती घेतली. पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने शेती केली जायची. परंतु या पिकातून अपेक्षित उत्पादन मिळत नव्हते. उसाचे केवळ एकरी ४० ते ५० टन उत्पादन मिळायचे. यामुळे पारंपरिक शेतीतून उत्पादन वाढ होणार नाही असे लक्षात आले. आष्टा परिसरात अनेक प्रयोगशील शेतकरी आहेत. त्यांच्याकडून माहिती घेत पीक व्यवस्थापनात बदल केले. सुरवातीच्या काळात केळी, कलिंगड, झेंडू अशा विविध पिकांची लागवड केली. त्याची व्यापाऱ्यांच्या माध्यमातून मुंबई बाजारपेठेत विक्री केली. आमच्या भागात हळदीचे दर्जेदार उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. त्यांच्याशी चर्चाकरून कोणत्या जातीची लागवड करायची याचा सल्ला घेतला. मागील वर्षी दोन एकरावर हळदीच्या सेलम जातीची लागवड केली. याचे बेणे सेलम येथून विकत आणले. सुधारित पद्धतीने पीक व्यवस्थापन केल्याने पीक चांगले आहे. या काळात बाजारपेठ लक्षात घेऊन मी हळद वाळून विकण्यापेक्षा व्यापाऱ्यांच्या मदतीने मुंबईत ओली हळद विकण्याचा निर्णय घेतला. ओल्या हळदीचा वापर लोणचे आणि भाजी करण्यासाठी होत असल्याने २५ रुपये किलो प्रमाणे त्याची विक्री केली. हळकुंडे केल्यापेक्षा मला ओल्या हळदीतून चांगला नफा मिळाला. सध्या चार एकरांत ऊस लागवड आहे. याचबरोबरीने दोन एकर ढोबळी मिरची, २० गुंठे पॉलिहाऊस आहे त्यामध्ये येत्या आॅक्टोबरमध्ये ढोबळी मिरची लागवडीचे नियोजन आहे. याचबरोबरीने हंगामानुसार कोबी, फ्लॉवर, हळद, झेंडू, केळी लागवडीचे नियोजन असते. शेतीही व्यापारी पद्धतीने केली तरच फायदेशीर ठरते. माझे पती मर्चंट नेव्हीमध्ये असल्याने ते परदेशात दौऱ्यावर असतात. तरी दररोज माझ्याशी सोशल मीडियावरुन संपर्क करून शेतीमधील कामकाजाचा आढावा घेतात. तसेच पीक व्यवस्थापनात करावयाचे बदल देखील सांगतात. संपूर्ण क्षेत्र ठिबक सिंचनावर   कुलकर्णी यांनी को ८६०३२ या जातीच्या उसाची दोन एकर आणि  १०००१ या जातीच्या उसाची दोन एकर लागवड साडेपाच फुटांच्या सरीत केली आहे. को-८६०३२ या जातीची एक डोळा पद्धत आणि १०००१ या जातीची रोप पद्धतीने लागवड केली आहे. संपूर्ण ऊस शेतीला ठिबक सिंचन केले आहे. माती परीक्षनानुसार खतांची मात्रा दिली जाते. ऊस उत्पादनात अग्रेसर असलेल्या शेतकऱ्यांचे सातत्याने मार्गदर्शन घेत असल्याने त्यांना उसाचे एकरी ९० ते १०० टन उत्पादन मिळते. अ‍ॅग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या यशोगाथा, तांत्रिक लेखांच्या मार्गदर्शनातून कुलकर्णी यांनी आंतरपिकांच्या लागवडीस सुरवात केली. शेतकरी तसेच तज्ज्ञांशी संपर्क साधून तांत्रिक सल्ला घेतला जातो. आंतरपिकातूनही चांगला आर्थिक नफा त्यांना मिळत आहे. शेती कामासाठी दोन मजूर जोडपी त्यांनी ठेवलेली आहेत.

पॉलिहाऊसमध्ये रंगीत ढोबळी मिरची  पॉलिहाऊसमधील शेतीबाबत सौ. कुलकर्णी म्हणाल्या की, शेतीमध्ये नवेनवे तंत्रज्ञान येत आहे. हे तंत्रज्ञान आपण देखील आत्मसात करायला हवे, असे वाटत होते. पॉलिहाऊस मधील रंगीत ढोबळी मिरची लागवड करण्याच्या दृष्टीने मी कर्नाटकातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या पॉलिहाऊसला भेट दिली. त्यांच्याकडून माहिती घेऊन २०१५ मध्ये २० गुंठ्यात पॉलिहाऊस उभारले. या पॉलिहाऊस मध्ये पिवळ्या आणि लाल रंगाची ढोबळी मिरचीची लागवड केली आहे. या लागवडीतून  २५ टन मिरचीचे उत्पादन मिळाले. मुंबई येथील व्यापाऱ्याला ५० रुपये किलोप्रमाणे विक्री केली. पॉलिहाऊसमधील मिरची संपल्यानंतर कोथिंबीर,मेथी लागवड केली. या कोथिंबीरीची विक्री आष्टा आणि कोल्हापूर येथे ५०० ते ७०० रुपये शेकडा या दराने केली. या पिकातूनही चांगला फायदा झाला. येत्या आॅक्टोबरमध्ये पुन्हा रंगीत ढोबळी मिरचीची लागवड करणार आहे.

मार्केट शोधले  

 उत्पादित शेतमाल विक्री करणे सर्वात मोठे आव्हानात्मक असते. बाजारपेठेत कोणत्या भाजीपाल्याला किती दर असतो आणि कधी लागवड करायची याची माहिती होणे तितकेच महत्त्वाचे असते. सौ. कुलकर्णी यांनी मुंबई, कोल्हापूर येथील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांशी स्वतः दराबाबत चर्चा केली. याचबरोबरीने कोणत्या महिन्यात कोणत्या प्रकारचा भाजीपाला, फुले, यांची मागणी असते याची माहिती घेतली. त्यानुसार पीक पद्धती ठरवली. यामुळे चांगला दर मिळत आहे.

शेती व्यवस्थापनाची सूत्रे 

  •   प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सल्ल्याने पीक नियोजन.
  •   माती परीक्षणानुसार खतांची मात्रा, पाण्याची तपासणी.  
  • जमीन सुपिकता टिकवण्यासाठी शेणखत, हिरवळीच्या पिकांची लागवड.  
  • घरच्याच ऊस बेण्याचा वापर. संपूर्ण शेतीत ठिबक सिंचन.  
  • यांत्रिकीकरणाचा अधिकाधिक वापर.  
  • बाजारपेठेच्या मागणीनुसार भाजीपाला आणि फुल पिकांची लागवड.  
  • आंतरपीक पद्धत, जीवामृताचा वापर, एकात्मिक कीड- रोग नियंत्रणावर भर.  
  • व्यापाऱ्यांशी चर्चा करून भाजीपाल्याची तोडणी
  • - सौ. मृदुला कुलकर्णी, ९९६०२०८५८१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com