agriculture news in marathi success story of agro tourism center in indapur district pune | Agrowon

कृषी पर्यटन केंद्र बनलंय तंत्रज्ञान प्रसार प्रक्षेत्र

मनोज कापडे 
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

कुंभारगाव (ता.इंदापूर,जि.पुणे) येथील प्रयोगशील शेतकरी कुंडलिक किसन धुमाळ यांनी परिसरातील निसर्ग आणि शेतीमधील प्रयोगशीलता जपत कृषी पर्यटन केंद्र सुरू केले.  

कुंभारगाव (ता.इंदापूर,जि.पुणे) येथील प्रयोगशील शेतकरी कुंडलिक किसन धुमाळ यांनी परिसरातील निसर्ग आणि शेतीमधील प्रयोगशीलता जपत कृषी पर्यटन केंद्र सुरू केले. केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता शेतीमधील प्रयोग  शेतकऱ्यांच्याबरोबरीने शहरी ग्राहकांनाही पटवून देण्यासाठी त्यांची शेती  तंत्रज्ञान प्रसार केंद्र बनले आहे.

सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीवर बांधलेले उजनी धरण कोणत्याही कारणाने सतत चर्चेत असते. मात्र, कुंभारगावातील प्रयोगशील शेतकरी कुंडलिक किसन धुमाळ यांना भेटल्यानंतर उजनी केवळ ‘वरदान’ नव्हे तर ‘मनःशांती देणारा परिसर’ असल्याचं सिद्ध होते. आतापर्यंत वीस हजार पर्यटकांनी भेट दिलेल्या ‘उजनी पार्कः कृषी पर्यटन व फ्लेमिंगो दर्शन’ या नावाने कुंभारगावमध्ये उभारलेल्या एकमेव कृषी पर्यटन केंद्रात स्वतः कुंडलिक बापू व त्यांची पत्नी वैशाली, आई श्रीमती देवईबाई, मुलगी ज्ञानेश्वरी, मुलगा ज्ञानराज तसेच बापूंचे बंधू पांडुरंग आणि वहिनी सौ.रूपाली असे सर्व जण राबताना दिसतात. एकत्रित कुटुंबाच्या साथीने त्यांनी पर्यटन केंद्राच्या बरोबरीने शेतीदेखील चांगल्या प्रकारे विकसित केली आहे.

कृषी पर्यटनाच्या दिशेने 
मूळ कुंभारगाव खरं तर उजनी धरणात बुडालं. सरकारने पुनर्वसन केलेल्या नव्या गावात शेतकऱ्यांना प्रगतीला साधनं नव्हती. कुंडलिक बापूंचे वडील ज्वारी, बाजरी, करडई अशी पिके काढून जगत होती. ११०० लोकसंख्येच्या कुंभारगावात आता ४६८ शेतकरी आहेत.

“आम्ही दोघे भाऊ फार काही शिकलो नाही. वडिलोपार्जित कोरडवाहू शेती परवडत नव्हती. आम्ही जोडधंदा म्हणून प्लंबिंग मेटेरियल विक्रीचे दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला, पण कर्ज काढूनही हाती जास्त पैसा येणार नाही आणि सर्वात म्हणजे आम्ही शेतीपासून तुटून बाजूला जाऊ, अशी भीती वाटली. या द्विधा मनःस्थितीत असताना २०१३ साली सकाळमध्ये कृषी पर्यटन प्रशिक्षण वर्गाची जाहिरात होती. त्यांच्याशी संपर्क करून प्रशिक्षण घेतले आणि २०१४ मध्ये माझ्या स्वप्नातील पर्यटन केंद्र माझ्या स्वतःच्या शेतीमध्येच सुरू केले,” असे कुंडलिक बापू सांगतात. 

शेती हाच पर्यटनाचा केंद्रबिंदू 
पर्यटन केंद्र ही गावकरी आणि नातेवाईकांसाठी वेगळी संकल्पना होती. लोक वेड्यात काढत असले, तरी कुंडलिक बापू कुदळ-फावडं घेत पर्यटन केंद्र उभारणीचे काम करीत होते. मित्र व नातेवाईकांकडून पैसा उभारला. बंधू पांडुरंग आणि सर्व परिवाराने बापूंना चांगली साथ दिली. “आपण शेती करू आणि जोडधंदा म्हणून पर्यटन केंद्र देखील चालवू. मात्र, या केंद्राच्या माध्यमातून आपण लोकांना शेतीविषयी आवड निर्माण करू,” असा मंत्र बापूंनी कुटुंबाला दिला. आज सर्व जण त्याप्रमाणेच कामे करतात. 

कृषी पर्यटन केंद्राच्या उभारणीबाबत बापू म्हणाले की, माझी आता तीस एकर शेती आहे. त्यामध्ये दहा एकर ऊस,तीन एकर डाळिंब आणि सात एकरावर कृषी पर्यटन केंद्र आहे. बाकी क्षेत्रावर हंगामी पिके असतात. सात एकरांपैकी पाच एकरावर सेंद्रिय पद्धतीने पीक उत्पादन घेतले जाते. दोन एकरावर पर्यटकांना राहण्याची सोय केली आहे. मला पर्यटन केंद्र म्हणजे नुसती घरं आणि बाग उभारून लोकांना व्हेज-नॉन व्हेज जेवण देत पैसा कमवायचा नव्हता. आम्हाला शेती, निसर्ग, पशू-पक्षी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्याविषयी शहरी नागरिकांमध्ये आस्था तयार व्हावी, असा हेतू आहे.

मी त्याच आधारे २०१३ मध्ये काम सुरू केले. सर्वात आधी शेतीभोवती आंबा, चिंच, नारळ, संत्री, मोसंबी, केळी,जांभूळ, सफरचंद, रक्तचंदन, साग, हनुमानफळाची लागवड केली. त्याच बरोबर पाणफुटी, तुळस, अश्वगंधा, कोरफडीसारख्या वनौषधींची  लागवड केली. आम्ही मूळ शेती सोडली नाही. पाईपलाइनकरून पडीक जमीन बारमाही केली.  सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला व फळभाज्या लागवडीस सुरूवात केली. हाच भाजीपाला पर्यटन केंद्रातील पाहुण्यांसाठी भोजनात वापरला जातो. पाहुण्यांना सेंद्रिय शेतीचे प्रयोग सांगितले जातात. पर्यटक  उत्साहाने ताजा भाजीपाला विकत नेतात. आम्ही शेतात ऊस, केळी, मका, गहू, वांगे, टोमॅटो, लसूण,रताळे अशी नानाविध पिके घेतो. आमच्या कुटुंबाचा दिवस पहाटे पाचला सुरू होतो आणि रात्री दहा पर्यंत कामकाज सुरू असते.  

पिके, पक्ष्यांनी नटलेला परिसर
पर्यटन केंद्रात सेंद्रिय पिके आणि विविध पक्षी बघण्यास मिळतात.चिमणी,कावळा, फ्लेमिंगोसह २०० प्रकारचे पक्षी या भागात दिसतात. त्यामुळे पर्यटक खूष होतात. पर्यटन केंद्रामुळे पंचक्रोशीत पर्यावरण रक्षणाचा संदेश आपोआप जातो. लोकांनी वृक्षतोड, पशुपक्ष्यांना इजा करण्याचे थांबवले आहे. गावशिवारात लोकसहभागातून दीड हजार रोपांचे संवर्धन झाले आहे. वृक्ष लागवड, सेंद्रिय शेती, मधुमक्षिका पालन या संकल्पनांची गावकरी आणि पर्यटकांमध्ये जागृती होते आहे. 

असे आहे कृषी पर्यटन केंद्र

 • पर्यटक येताच गंध टिळा लावून, फुलांनी स्वागत.उसाचा ताजा रस किंवा गावरान गायीच्या दुधाचे ताक दिले जाते. 
 • केळीच्या पानावर गावरान शाकाहारी भोजन.  उजनी धरणातील माशांच्या प्रसिद्ध कालवणाचीही सोय. हुरडा पार्टी. वनभोजन, बाजेवर भोजन, तंबूत राहणं, आकाश निरीक्षण, पक्षी निरीक्षणाचा आनंद.
 • बैलगाडी सफारी, बफेलो सफारी, घोडागाडी, शिवारफेरी, पीक प्रात्यक्षिकांना भेटी. कोंबडीपालन,शेळीपालन,गोपालनाबाबतही माहिती. 
 • विहिरीत पोहणं, रेन डान्स, स्वीमिंग टॅंक, चिखलात हुंदडणं, धरणाकाठी भटकंती, शेकोटीची देखील सोय. 

तयार करतोय शेतकऱ्यांचे पाठीराखे... 
बापू सांगतात की, आम्ही केवळ पर्यटक नव्हे तर शेतकऱ्यांचे पाठीराखे तयार करतो. यासाठी पर्यटकांना शिवारफेरी, पीक प्रात्यक्षिके,गांडूळखत, जीवामृत, शेतातील मित्र कीटक, मित्रपक्षी यांची माहिती दिली जाते. एवढेच नव्हे तर मुंगी, मधमाशांची माहिती दिली जाते. यामुळे पर्यटक शेती संकल्पनेशी एकरूप होतात. 

 • पर्यटकांशी गप्पा करताना आधुनिक शेतीचा विषय निघाल्यानंतर 'अॅग्रोवन वाचा' असा संदेश बापू आवर्जून देतात.
 • बापूंचे शेतीवरील प्रेम पाहून कृषी विभागाचे अभ्यासवर्ग पर्यटन केंद्रात होतात. कृषी कंपन्यांच्या बैठका, वार्षिक वर्ग, स्नेहमेळाव्यासाठी केंद्राला पसंती. 
 • शेती आणि शेतकऱ्यांचे प्रक्रिया उद्योग कळावेत म्हणून साखर कारखाना,दूध डेअरीची भेट. 

मामाचं हरवलेलं पत्र सापडलं...

 • ‘लॅपटॉप, मोबाइल’च्या जमान्यात मुले देशी खेळ विसरून गेले आहेत. बापूंनी या खेळांचे स्मरण करून देण्यासाठी कृषी पर्यटन केंद्राचा अनोखा वापर केला. माझ्या मामाचं पत्र हरवलं, हा खेळ मुलांसाठी या ठिकाणी आवर्जून खेळून दाखवला जातो.
 • विटीदांडू, गोट्या, कॅरम, संगीत खुर्ची असे खेळ या ठिकाणी चालतात. त्यामुळे मुले खूष होतात. 
 • मुलांना निसर्ग, झाडांची लागवड, पक्षी निरिक्षण, आकाश दर्शन कसे करावे याविषयी माहिती दिली जाते. 
 • शहरी महिला याठिकाणी पाटा वरवंटा, उखळ,मुसळ, जात्यावरील दळणाचा अनुभव घेतात.

बेरोजगारांना मिळतोय रोजगार

 • पर्यटन केंद्राच्या माध्यमातून शेतमजूर, महिलांना रोजगार. 
 • गावातील बेरोजगारांना घोडागाडी, बैलगाडीचालक, सुतार, गवंडी, रंगारी, वायरमन, नावाडी, गाइड, रखवालदार ही कामे. 
 •  पर्यटन केंद्र शेतात असले तरी गावाची संपत्ती. त्यात आलेला पैसा गावातील घरांमध्ये जावा, ही बापुंची भावना. 
 • पर्यटन केंद्रातील भेळविक्रेते, भाजी विक्रेते, धान्य विक्रेते हे शेतकरीच. त्यांच्याकडून शुल्क न घेता व्यवसायाला प्रोत्साहन. 
 • महिलादिनी कामगार भगिनींना साडी चोळी तर कामगारदिनी सर्वांना मेजवानी. 

संपर्कः कुंडलिक धुमाळ, ८६२५८६२५८६


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
लोक सहभागातून जैवविविधता, पर्यावरण...ग्रामीण भागातील जैवविविधतेच्या संवर्धनामध्ये पाच...
चॉकलेट्‌स......नव्हे गुळाचे जॅगलेट्‌सकोल्हापुरी प्रसिद्ध गूळ देश-परदेशातील बाजारपेठेचा...
‘जय सरदार’ कंपनीची उल्लेखनीय घोडदौडमलकापूर (जि. बुलडाणा) येथील ‘जय सरदार’ शेतकरी...
भाजीपाला, कणगर, दुधातून उंचावले...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता.वेंगुर्ला)...
पोतेकरांची देशी केळी वर्षभर खातेय भावसातारा जिल्ह्यातील शेंद्रे (ता. जि. सातारा) येथील...
पावसाच्या पाण्यावर फुलवलेली दर्जेदार...निमगाव घाणा (ता. जि. नगर) येथील रामदास रघुनाथ...
आधुनिक गुऱ्हाळाद्वारे केवळ चार गुंठ्यात...कोल्हापूर शहरापासून काही किलोमीटरवरील कणेरी...
संयुक्त कुटुंबाचे शेती, पूरक उद्योगाचे...यशवंतवाडी (जि. लातूर) येथील पाच भाऊ व एकूण ४०...
व्यावसायिक दृष्टिकोनामुळेच यशस्वी...पुणे जिल्ह्यात अति पावसाच्या मावळ तालुक्यातील...
दुष्काळी स्थितीतही द्राक्षाने दिले...सांगली जिल्ह्यातील वायफळे (ता. तासगाव) येथील...
फळबागेला प्रक्रिया उत्पादनांची जोडशेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ...
ग्राम, शेती विकासाला ‘रोटरी’ची साथनाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ...
दोघे युवामित्र झाले जिरॅनिअम तेल उद्योजकनाशिक जिल्ह्यातील कृषी पदवीधर सौरभ जाधव व...
रब्बीत मोहरीचे पीक ठरतेय वरदानमेहकर (जि. बुलडाणा) तालुका परिसरात मोहरी...
गावाने एकी केली अन् जमीन क्षारपडमुक्ती...वसगडे (ता. पलूस, जि. सांगली) या उसासाठी प्रसिद्ध...
ऊसपट्ट्यात केळीतून पीकबदलतुंगत (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील शिवानंद...
अंजीर पिकात मास्टर अन् मार्गदर्शकहीपुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील निंबूत येथील...
आधुनिक यंत्राद्वारे खूर साळणी झाली सोपीदुधाळ जनावरांमध्ये खूरसाळणीला मोठे महत्त्व आहे....
सेंद्रिय प्रमाणित मूल्यवर्धित मालाला...नांदेडपासून सुमारे पंधरा किलोमीटरवरील मालेगाव...
डांगी गायींचे संवर्धन करण्याचे व्रतआंबेवाडी (ता. अकोले, जि. नगर) येथील बिन्नर...