योग्य नियोजनातून दर्जेदार हापूस उत्पादन

Makarand kane
Makarand kane

बदलत्या हवामानामुळे कोकणात हापूस आंबा व्यवस्थापनामध्ये अडचणी येत आहेत. त्यांना सामोरे जात योग्य नियोजन आणि सुधारित व्यवस्थापनाचे तंत्र रिळ (ता. जि. रत्नागिरी) येथील मकरंद काणे व कुटुंबीयांनी विकसित केले आहे. गेल्या तीन पिढ्यांपासून हापूस आंबा बागेची सूत्रे यशस्वीपणे सांभाळत  प्रक्रिया उद्योगाची जोड त्यांनी दिली आहे. 

रिळ (ता. जि. रत्नागिरी) येथील काणे कुटुंबीयांची दीडशे वर्षापासून आंबा लागवड आहे. मकरंद काणे यांच्या पणजोबांनी तीनशे कलमे लावल्यानंतर आजोबा कमलाकर आणि वडील दिगंबर यांनी आणखी एक हजार कलमांची लागवड केली. केवळ फळ उत्पादनावर न थांबता रसावर प्रक्रिया करत विक्रीस देखील सुरवात केली.   २०१४ मध्ये मकरंद यांनी बीएस्सीनंतर हॉटेल मॅनेजमेंट पूर्ण केले. कॅम्पस मुलाखतीमध्ये सिंगापूर येथील नोकरीसाठी त्यांची निवड झाली. त्यावेळी वडिलांशी चर्चा केली असता त्यांनी पूर्ण विचार करून नोकरी किंवा व्यवसाय यातील एकाची निवड करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या मते, आता काही वर्षे नोकरी करून पुन्हा शेती किंवा व्यवसाय करण्यामध्ये ही वर्षे वाया जातात. मग पूर्ण विचार केल्यानंतर मकरंद यांनी नोकरीपेक्षा शेती आणि पिढीजात व्यवसाय निवडला. सध्या मकरंद यांच्याकडे पूर्वीची साडेतीन हजार कलमे असून, नव्याने एक हजार हापूस कलमांची लागवड केली आहे.  आंबा बागांचे व्यवस्थापन

  • जुलै, ऑगस्टमध्ये आंबा बागेची स्वच्छता केली जाते. साचलेला पालापाचोळा कलमांच्या आळ्यांमध्ये साचवून त्यावर ताक, गोमूत्र, काळा गूळ, शेण यांचे द्रावण तयार करून टाकले जाते. त्यामुळे पांढऱ्या मुळ्या चांगल्या प्रकारे वाढतात. अन्नद्रव्यांच्या व्यवस्थापनासह जमिनीच्या सुपीकतेसाठी जीवामृत, शेणखत, पोल्ट्री खत यांचा वापर केला जातो. दर्जेदार आंबा उत्पादनासाठी मकरंद यांना वडीलांच्यासह आंबा बागायतदार डॉ. विवेक भिडे, उदय जोग, काका मुळ्ये, बापू जोशी यांचे मार्गदर्शन मिळते.
  • पाऊस गेल्यानंतर कलमांना पालवी फुटते. नव्या पालवीवर किडी रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेऊन फवारणीचे नियोजन केले जाते. 
  • पालवीनंतर साधारण पंधरा दिवसांमध्ये मोहोर येतो. या काळात ढगाळ वातावरण राहिल्यास भुरी आणि तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढतो. तुडतुड्याच्या विष्ठेवर वाढणाऱ्या बुरशीमुळे मोहोर काळवंडण्यासह कैरीवर डाग पडतात. त्याचप्रमाणे अळीचाही धोका असतो. मोहोरासोबत कैरीचा देठ पोखरल्याने गळ होते. जानेवारीत फूलकिड्यांचा प्रादुर्भाव होतो. त्यांच्यामुळे फळाची साल खरवडली जाते. चकाकी कमी झाल्यामुळे दर मिळत नाही. हे लक्षात घेऊन काणे यांनी कीड,रोगाच्या नियंत्रणासाठी फवारणीचे काटेकोर वेळापत्रक तयार केले.  
  • डिसेंबर महिन्यात मोहोर आला की पुढे चार महिन्यांनी आंबा तयार होतो. त्यापुढे एक महिना उशीर झाला तर पुढील तीन महिन्यात आंबा तयार होतो. फळ सुपारी आकाराचे झाल्यानंतर कैरी साफ करण्यासाठी कलमे हलवली जातात. सुकलेला मोहोर, खराब झालेली कैरी खाली पडते. हा सुकलेला मोहोर घासून फळे खराब होऊ शकतात. हे टाळण्यासाठी आंबा तयार होईपर्यंत दोन ते तीन वेळा कलमे हलवली जातात. 
  • नियमित उत्पादनासाठी खतांच्या व्यवस्थापनासोबतच दोन वर्षातून एकदा शिफारशीनुसार पॅक्लोब्युट्राझोलचा वापर करत असल्याचे काणे यांनी सांगितले.
  • अनेक कलमे ४० ते १५० वर्षे जुनी आहेत. त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी सध्या छाटणी केली जात आहे. अशी कलमे पाच वर्षानंतर पुन्हा फळ उत्पादनास येतात. 
  • गुणवत्तापूर्ण आंबा उत्पादन

  • फळाचा आकार गोल झाला आणि देठाला खड्डा पडला की तो आंबा काढण्यायोग्य झाला हे बागायतदारांचे सूत्र आहे. आंबा काढल्यानंतर पक्वतेची प्रक्रिया सुरू होत असल्याने अधिक काळजी घ्यावी लागते. 
  • प्रतवारी करताना मार लागलेले, काळे डाग असलेले आंबे वेगळे काढले जातात. पाच डझनच्या पेटीला सर्वसाधारणपणे २०० ते २२५ ग्रॅम वजनाचा आंबा लागतो. या वजनाच्या आंब्याला बाजारपेठेमध्ये सर्वाधिक मागणी आहे. आंब्याचे वजन २५ ग्रॅमच्या पटीत कमी-जास्त केले जाते. 
  • व्यवसायातील अडचणी

  • काणे यांच्याकडे ३५ मजुरांना वर्षभर काम उपलब्ध आहे. मात्र, सध्या प्रशिक्षित मजूर उपलब्ध होत नाहीत. 
  • मजुरीचे दर खूप वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. 
  • कीडनाशकांवरील विविध करांचा फटका बागायतदारांना बसतो आहे. 
  • कॅनिंगला शेतीपूरक व्यवसाय म्हणून मान्यता नसल्याने अडचणीत वाढ झाली आहे. 
  • सेंद्रिय पद्धतीचा प्रयोग   काणे यांनी संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने आंबा उत्पादनाचा प्रयोग गेल्या तीन वर्षापासून १०० कलमांवर सुरू केला आहे. पहिल्या वर्षी रोगकिडीच्या प्रादुर्भावामुळे विक्रीयोग्य फळांचे उत्पादन मिळाले नाही. दुसऱ्या वर्षी (२०१७) उत्तम दर्जाची १५ टक्के फळे मिळाली, तर तिसऱ्या वर्षी ४० टक्के फळे मिळाली. फळांची चकाकी,वजन वाढले. काढणीनंतर ही फळे नऊ दिवसांपर्यंत टिकतात. (तुलनेसाठी पारंपरिक पद्धतीतील फळे सहा दिवसांपर्यंत टिकतात.) सेंद्रिय आंब्याला ८०० ते ९०० रुपये डझन या प्रमाणे दर मिळाला. सेंद्रिय व्यवस्थापनासाठी कृषी विभागाचा आत्मा विभाग आणि कृषी अधिकारी आरिफ शहा यांची मदत झाली. 

    दृष्टिक्षेपात आंबा व्यवसाय

  • साडेतीन हजार कलमे. एक वर्षाआड उत्पादन.
  • १० ते १५ वर्षांच्या कलमांपासून ३ ते ५ पेटी उत्पादन मिळते. 
  • प्रति वर्ष सरासरी साडेचार ते पाच हजार पेटी आंबा उत्पादन.
  • मिळणारा दर प्रति पेटी सरासरी ९०० ते १३०० रुपये. 
  • खर्च वजा जाता २५ टक्क्यांपर्यंत नफा राहतो.
  • १५ मेपर्यंत पेट्या भरून पुणे, मुंबई बाजारपेठेत पाठवल्या जातात. त्यानंतर कॅनिंगसाठी आंबा दिला जातो. दरवर्षी सुमारे २० टन आंब्याचे कॅनिंग केले जाते. कॅनिंगसाठी दिलेल्या आंब्याला प्रति किलो २५ ते ३५ रुपये दर मिळतो.
  •   दरवर्षी साधारण २०० टन आंब्यावर प्रक्रिया करून गराची (पल्प) निर्मिती केली जाते. उत्तम प्रक्रिया युनिटचा पुरस्कार दिगंबर काणे यांना मिळाला आहे. सध्या हा व्यवसाय बंधू मनोज काणे बघतात. 
  • काळजीपूर्वक भरली जाते पेटी आंबा बाजारपेठेमध्ये पाठविण्यासाठी लाकडी पेटीचा वापर होतो. कोरुगेटेड बॉक्समध्ये एकमेकांच्या वजनामुळे फळे दबली जाण्याचा धोका असतो. पेटी भरताना खाली व प्रत्येक थरामध्ये भाताचा पेंढा वापरतात. वाहतुकीमध्ये आंब्याचा देठ तुटणार नाही याची काळजी घेतली जाते. आंबा काढल्यानंतर तो बारा तासात बाजारपेठेमध्ये पोचवण्याचे काणे यांचे नियोजन असते. दरवर्षी मुंबई, पुणे येथील ठरावीक व्यापाऱ्यांकडे आंबे विक्रीला पाठविला जातो. 

    आंब्याच्या १७ जातींची लागवड

  • काणे यांनी हापूस सोबत सुमारे १७ आंबा जातींची बागेत लागवड केली आहे.
  • केशर, पायरी, तोतापुरी, निलम, दशहरी, राजापुरीची लागवड.
  • सूवर्णरेखा (आंध्र प्रदेशात सुंदरी नावाने ओळख, लालसर, मध्यम आकार, लांब कोय)
  • आम्रपाली (चव देवगड हापूसप्रमाणे, फळे उशिरा १५ मे ते जूनमध्ये येतात.)
  • मल्लिका (आकाराने मोठे फळ, गरामध्ये तंतूंचे प्रमाण कमी)
  • निरंजन (मध्यम आकाराची फळे, अनियमितपणे, पण भरपूर उत्पादन देणारी जात.)
  • दूधपेढा (आंबट-गोड वैशिष्ट्यपूर्ण चव) 
  • नारळ, सुपारीसह भातशेती लागवड

  • काणे यांच्याकडे नारळाची २५० झाडे आहेत. एका नारळापासून प्रति वर्ष सुमारे ७० नारळ मिळतात. प्रति नारळ १५ ते २० रुपये दर मिळतो. 
  • सुपारीची ४०० झाडे असून, प्रति झाड दीड ते दोन किलो सुपारी मिळते. प्रति किलोला १०० रुपये दर मिळतो. 
  • तीन एकर भातशेती असून गुंठ्याला ८० किलो भात उत्पादन घेतले जाते. 
  • - मकरंद काणे, ९९७०२०२०१०, ०२३५७ -२४३४३९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com